अॅथलेटिक्समध्ये उत्तुंग झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेंद्र लोंढे

अॅथलेटिक्स म्हटले की, मायकेल जॉन्सन, कार्ल लुईस, युसेन बोल्ट, मेरीयन जोन्स, येलेना इसिनबायेवा या दिग्गज मंडळींचा मैदानातील थरार डोळय़ांसमोर उभा राहतो. रेसिंग ट्रॅकवर त्यांनी वर्चस्व गाजवले. जगभरातील कोटय़वधी युवकांना प्रेरणा दिली, बळ दिले. एकीकडे अमेरिका, जमैका, रशिया येथून महान खेळाडू जन्माला येत असतानाच दुसरीकडे मात्र हिंदुस्थानची अॅथलेटिक्समधील पाटी तशी कोरीच राहिली. आपलं अॅथलेटिक्स मिल्खा सिंग, पी. टी. उषा, अंजू बॉबी जॉर्जपासून सुरू होते आणि त्यांच्यापर्यंतच येऊन संपते असे सर्रास म्हटले गेले, पण नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे आशेचा किरण दिसू लागलाय. नीरज चोप्रा, हिमा दास, अरपिंदर सिंग, स्वप्ना बर्मन, जिन्सन जॉन्सन, तजिंदरपाल सिंग यांनी पदकांवर मोहोर उमटवून सुवर्ण भविष्याची चाहूल दिलीय.

हरयाणाचा पठ्ठ्या नीरज चोप्रा
हिंदुस्थानच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमधील उत्तुंग झेपेत दोन नावांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. 20 वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा व 18 वर्षीय धावपटू हिमा दास ही त्यांची नावे. हिंदुस्थानला भालाफेकीत सातत्याने सुवर्ण पदक मिळेल असे कोणाला स्वप्नातही वाटत नसेल, पण हरयाणाचा पठ्ठय़ा नीरज चोप्रा याने सर्व समीकरणेच बदलून टाकली. त्याने इवल्याशा कारकीर्दीत एक नव्हे तर चक्क पाच गोल्ड मेडल जिंकून देशाचा झेंडा अगदी रुबाबात फडकवलाय. जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई गेम्स, आशियाई चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई क्रीडा स्पर्धा या पाचही स्पर्धांमध्ये त्याने सोन्याचा भाला फेकला. प्रतिष्ठsच्या समजल्या जाणाऱया ऑलिम्पिकमध्येही तो पदक जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. यासाठी तो जिवाचे रानही करतोय.

आसाम एक्स्प्रेस सुसाट
जमैका, अमेरिका, चीन, केनिया यांसारख्या हमखास पदक विजेत्या देशांतील खेळाडूंना टक्कर देणारी ऍथलीट आशियाई क्रीडा स्पर्धांमधून हिंदुस्थानला मिळाली. आसाममधील ‘ढिंग’ येथे जन्माला आलेल्या हिमा दास हिने महिलांच्या रिले, मिश्र रिले व 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक जिंकताना ऐतिहासिक कामगिरी केली. याआधी तिने 20वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशिपमधील 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडल जिंकून आपण देशाचे नाव आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्सच्या क्षितिजावर चमकवायला आलोय हे दाखवून दिले.

अरपिंदर, जॉन्सन, बर्मनचा धमाका
पंजाब, अमृतसरच्या 25 वर्षीय अरपिंदर सिंग याने तिहेरी उडीत 16.77 मीटर दूर उडी मारत सुवर्ण पदक जिंकले. त्यामुळे 1970 सालानंतर हिंदुस्थानला आशियाई क्रीडा स्पर्धांमधील तिहेरी उडीत गोल्ड मेडल जिंकता आले. एवढेच नव्हे तर त्यानंतर वर्ल्ड कॉण्टिनेण्टल कपमध्येही त्याने कास्य पदक जिंकत आपल्या कामगिरीतील सातत्य प्रकर्षाने दाखवून दिले. धावपटू जिन्सन जॉन्सन याने 800 व 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत पदकांवर हक्क सांगितला. एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकताना त्याने केलेली कामगिरीही काबिल ए तारीफच ठरलीय. 21 वर्षीय स्वप्ना बर्मन हिने हेप्टॅथलॉन या अवघड मानल्या जाणाऱया क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल जिंकून देशासाठी नवा विक्रम प्रस्थापित केला. तिने सात विविध प्रकारांत 6026 गुणांची कमाई करीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती हिंदुस्थानची पहिलीच खेळाडू ठरली.

50 खेळाडू अन् 19 पदके
हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी अॅथलेटिक्समध्ये 50 खेळाडूंची निवड केली. यामध्ये 22 पुरुषांचा तर 28 महिलांचा समावेश होता. हिंदुस्थानने अॅथलेटिक्समध्ये सात सुवर्ण, 10 रौप्य व दोन कास्य यांच्यासह एकूण 19 पदकांची कमाई केली. यामध्ये तजिंदरपाल सिंग (गोळाफेक), सीमा पुनिया (थाळीफेक), नीना वरकील (लांब उडी), सुधा सिंग (अडथळा शर्यत), एम. आर. पुवम्मा, सरिताबेन गायकवाड, विस्मया, मनजीत सिंग, मोहम्मद अनास, द्युती चंद, धरुण अय्यासामी, राजीव अरोकिया, कुन्हू मोहम्मद, पी. यू. चित्रा (सर्व धावपटू) या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

सहा वर्षांच्या मेहनतीचे फळ
हिंदुस्थानच्या खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ऍथलेटिक्स क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादन केले. एका रात्रीत हा चमत्कार घडून आलेला नाही. गेल्या सहा वर्षांपासून केलेल्या नियोजनाचे हे फळ आहे. आमच्या टीमने योजना राबवली. त्यानुसार परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती आणि खेळाडूंना परदेशात ट्रेनिंगसाठी पाठवणे या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. याचा फायदा आता झालाय, असे स्पष्ट मत ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अदिल सुमारीवाला यांनी व्यक्त केले.

टोकियो ऑलिम्पिकसाठी सज्ज
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशानंतर आम्ही आता 2020 सालामध्ये होणाऱया टोकियो ऑलिम्पिकसाठी सज्ज झालो आहोत. आशियाई क्रीडा स्पर्धांमधील देदीप्यमान यशानंतर आता हिंदुस्थानी खेळाडूंकडून मोठय़ा अपेक्षा बाळगल्या जातील, पण ऑलिम्पिकमध्ये आपण किती पदके जिंकू याबाबत आताच मी सांगू शकत नाही. आशियाई क्रीडा स्पर्धांमधील पदकांबाबतही मी तेच म्हणालो होतो. सध्या कोणत्या परदेशी प्रशिक्षकांना नियुक्त करायचेय, कोणाला काढून टाकायचेय, कोणत्या खेळाडूंना कुठे ट्रेनिंगला पाठवायचेय, या सर्व बाबींबाबत निर्णय घ्यावयाचा आहे, असे अदिल सुमारीवालांनी सांगितले.

– [email protected]