जाणिवांचा अवकाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डाॅ कैलास दौंड

कवी मोहन शिरसाट यांचा ‘नाही फिरलो माघारी’ हा पहिलाच कवितासंग्रह असून गेल्या काही वर्षांपासून कविता लेखन करणाऱ्या उमद्या कवीची मुरलेली, पक्व कविता या संग्रहातून वाचकांच्या भेटीस येते. साधी सरळ वाटणारी ही कविता अनेकदा विचारचक्राला गती देते तर कधी सामाजिक लेख्याजोख्याचे भान देते. कवीचे समकालीन भोवतालचे आकलन या कवितामधून सहजच लक्षात येते. कविता उदंड वाढण्याच्या दिवसातील ही कविता असूनदेखील लक्षवेधी ठरली आहे ती तिच्यातील आत्मपरता आणि सामाजिकता यांच्यातील विलोभनीय अनुबंधामुळे. त्यातच ही कविता प्रांजळपणाने समोर येते. भविष्यकालीन समाजजीवनाची आणि व्यक्तिगत जीवनाची वाटचाल खडतर असली तरी ती पुढे चालायची आहे हा कवीचा दृढ निश्चय आहे. संविधानाने दिलेला जगण्याचा विश्वास सागराप्रमाणे विशाल आहे. कवीला याची जाणीव आहे. तो लिहितो- ‘माझे मी सागराचे रूप
न्याहाळतोय आतल्या आत.’

मात्र असे असले तरी नानाविध प्रकारचे शोषक शोषणासाठी सज्ज असतातच. ते संधी शोधून येऊ पाहतात आणि मग कवी ‘आपल्यातले सगुण रान राखण्यासाठी दशदिशात गोफण फिरवत राहतो.

खरं तर हिंदुस्थानातील विविधता ही हिंदुस्थानची वैशिष्टय़पूर्ण ओळख आहे. उच्च आणि निचतेच्या स्वयंघोषित दांडगेपणामुळे शोषितात भीती आणि बदलेपण येते. शिरसाट यांची कविता केवळ सामाजिकतेत अडकून पडणारी खचितच नाही. तिची व्यक्तिगत जाणीवही सजग आहे म्हणूनच तिची सामाजिकताही प्रबळ आहे. ‘नाही फिरलो माघारी’मधील कविता साधी शब्दकळा मिरवणारी, प्रश्न विचारणारी, प्रसंगी आत्मचिंतनाला भाग पाडणारी कविता आहे. भ. मा. परसावळे यांनी केलेले मुखपृष्ठ कवितांना न्याय देणारे आहे. मोहन शिरसाट यांच्या या पहिल्या कवितासंग्रहाचे वाचक, अभ्यासक व समीक्षक निश्चित स्वागत करतील असे वाटते.

नाही फिरलो माघारी कवितासंग्रह
कवी ः मोहन शिरसाट
प्रकाशक ः ग्रंथाली, मुंबई – 16
पृष्ठs ः 114 मूल्य ः 130 रु.
डॉ. कैलास दौंड