
>> महेंद्र पाटील
परवा संध्याकाळी असंच काहीसं लिहीत होतो. सुरुवातीला शब्द सापडत नव्हते आणि विषयसुद्धा मनात नव्हता. पण हळूहळू लेखणी पुढे सरकत गेली आणि मनाच्या एका कोपऱयात दडून बसलेले शब्द एकेक करून बाहेर येऊ लागले. तुझ्याबद्दल पुन्हा ते काहीतरी बोलू लागले. प्रत्येक शब्द व्यक्त व्हायला आतुर होता. पण मलाच असं वाटलं, किती दिवस लिहायचं तुझ्यावरच आणि तुझ्याबद्दल? जर मी असंच लिहीत गेलो तर उद्या लोक म्हणतील, तुझ्याशिवाय मला काही लिहिताच येत नाही. म्हणून विचार केला की, आज थोडंसं वेगळं लिहावं. ज्यात तू नसशील. शब्दातही कुठेच नसशील आणि मी लिहू लागलो. आता तुझ्या आठवणीतली संध्याकाळ नव्हती. तुझ्या गोष्टी नव्हत्या. तुझ्या अनोख्या अदा, आणि कातरवेळी नदीकिनारी वाट पाहणंही नव्हत. तुझ्या गोड भेटीची चाहूलसुद्धा नव्हती आणि तू आली नाहीस म्हणून मनात उगाच वेडी हुरहूरसुद्धा नव्हती. तुझं हसणंसुद्धा नव्हतं. तुझं रुसणंसुद्धा नव्हतं. तुझं लाजणं, तुझ्या डोळ्यातली निरागसता अन् चेहऱयावरले निष्पाप भावसुद्धा नव्हते. तुझी बडबड, तुझ्या गप्पा, तुझ्या मनातली स्वप्नांची क्षितिज, तुझ्या कवितेतली व्याकुळता काहीच नव्हतं. तुझ्या केसातल्या मोगऱयाचा मंद दरवळ, तुझ्या हळव्या आठवणी, तुझ्या मनातले माझ्या आठवणींने व्यापलेले कप्पे… अशा कित्येक गोष्टी नव्हत्या. पण तरीही मी लिहीत गेलो खूप काही…
पण आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती तुझ्याविना मी काही लिहू शकतो का, याची. सर्वजण वाचतील तेव्हा वाचतील; पण तू मात्र एकदा वाच आणि बघ तुझ्यावाचून पहिल्यादांच काहीतरी लिहिता लिहिता प्रत्येक शब्द हा फक्त तुझ्यावरच लिहिला गेला आहे. मला माहितीये तुला आनंद होईल. तुझं मनसुद्धा बहरेल. पण विचार करता करता असं लक्षात आलं की, तुझ्याविना हा निसर्ग, ही पहाट, ही संध्याकाळ, सृष्टीतले सारे प्रहर… सगळं काही अधुरं आहे. पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी सुरू होणारा दिवस, रात्रीच्या अंधाराच्या नीरव शांततेत चांदण्यांनी केलेली गर्दी फक्त तुझ्यामुळेच जमते आणि प्रत्येक कवीला तुझ्यामुळेच कल्पना सुचतात. प्रत्येक शब्दाला अर्थ तुझ्यामुळेच येतो. दाहीदिशांत जिकडेतिकडे तूच आणि तू… आणि तुझी चाहूल असते. म्हणून उपमा देताना कधी तुला निसर्गाची देता येते तर कधी निसर्गाला तुझी. निसर्ग आणि तुझ्यातली समरसता माझ्या मनाला नेहमीच भावते. म्हणून माझ्या शब्दात तू आणि निसर्ग कायम असशील… जोपर्यंत हे चंद्र, सूर्य, तारे, नद्या, सागर असतील तोपर्यंत तुझं अस्तित्व टिकून राहील. तुझ्या मनाचा प्रहर कुणाला कळत नसला तरी वेडय़ा कवी कल्पनेत तूच असतेस. जशी मंदिराच्या गाभाऱ्यातली प्रसन्न मूर्ती असावी अगदी तशी…
म्हणून माझ्याही लेखणीत तू उतरली आहेस, शब्दाशब्दातून… तू नसलीस कधी तरी माझ्या मनातली कविता मात्र अशीच असते…
तू नसताना काल पुन्हा गं
येऊन गेली सांज,
भाव कोवळे तुझ्यासारखे
देऊन गेली सांज






























































