
>> महेंद्र पाटील
नाही नाही म्हणताना यंदा आषाढ चांगलाच बरसला आणि त्याच्या पाठोपाठ येणारा श्रावणसुद्धा बरसतोय… पण यंदाचा श्रावण हा श्रावण असला तरी श्रावणासारखा मला भासत नाहीये. रिमझिम सरी, कोवळं ऊन, कधीतरी संध्याकाळी इंद्रधनूच्या सप्तरंगांनी सजलेलं आभाळ आणि त्या श्रावण ओल्या सरींसोबत येणाऱया जुन्या आठवणी… हे सगळं यंदा असूनही श्रावण नसल्यासारखा का वाटतोय माझ्या मनाला?
सध्या आषाढाच्या धारांसारखाच तो कोसळतोय. बेफाम… बेलगाम… बहुतेक उन्हाची आणि त्याची कट्टी झाली असावी. कारण रिमझिम सरींसोबत अवचित पडणारं ऊन एकदाही दिसलं नाही. बरं वाटायचं हे ऊन. कधीतरी श्रावणातल्या जुन्या भिजल्या आठवणी मनातल्या मनात रेंगाळत असताना, आठवणींच्या ओल्याचिंब प्रदेशाला उबदार क्षण देऊन जायचं. श्रावणातल्या भिजऱया आठवणींना उन्हाचा धाक हवाच नाहीतर आजन्म आठवणींच्या पावसात आपण फक्त भिजत राहू… आणि आठवणींच्या जखमांवर कधीच खपली धरणार नाही. जन्मभर उगाच त्या छळत राहतील मनाला. तसं आठवणींचं आणि माझं अजिबात वैर नाही. कारण कवी हा आजन्म आठवणींच्याच कुबडय़ांवर चालत असतो. पण त्या आठवणींनी येताना जरा हळूवारपणे यावं. मनाच्या अंगणात श्रावणाच्या रिमझिम सरीसारखं बरसावं. म्हणजे सगळ्या आठवणींशी पुन्हा नव्याने बोलता येईल.
काही नव्या आठवणींशी आपली नव्यानेच ओळख होते. काही रुसलेल्या आठवणींचा रुसवा दूर करता येतो. काही हरवलेल्या आठवणी पुन्हा नव्याने शोधता येतात आणि त्या आठवणींच्या गर्दीत मन पुन्हा श्रावणझुले घेऊ लागतं. पण यंदाच्या श्रावणाचं नाव श्रावण असलं तरी त्याचा चेहरा आषाढाचा आहे. श्रावण म्हणून यायचं आणि आषाढासारखं कोसळायचं, ही कुठली रीत? ऋतुगणिक माणसांचे चेहरे बदलतात, स्वभाव बदलतो आणि कालांतराने माणसंच बदलतात. मानवी मनाचा हा गुणधर्म ऋतूंनी स्वीकारायचा ठरवला तर कसं व्हायचं मनाचं? चेहरे बदलणाऱया या दुनियेत आपल्या मनाला फक्त ऋतूंचा आधार असतो. म्हणून तर ग्रीष्माच्या तप्त झळा शमविण्यासाठी कधीतरी अवचित एका संध्याकाळी वळवाचा पाऊस येतो. कधीतरी आषाढातला कोसळणारा धुवांधार पाऊस आपल्या मनातले उन्हाळे वाहून नेतो, तर कधी शरदाच्या चांदण्यात आपलं मन जुन्या आठवणींच्या नव्या कविता लिहू लागतं. प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी नवे क्षण देऊन जातो. प्रत्येक ऋतूचा आनंद वेगळा असतो. प्रत्येक ऋतूची गोष्ट वेगळी असते आणि ही गोष्ट जशी आहे तशीच घडत राहावी, असं आपल्या मनाला लाख वाटत असलं तरी कधीकधी काही ऋतू असे येतात तेव्हा आपल्या मनासारखं काहीच घडत नाही. नेमपं या श्रावणात तेच घडतंय. माझ्या आयुष्यातला हा श्रावण, श्रावणासारखा नाही म्हणूनही असं वाटत असेल कदाचित. या श्रावणाला मला सांगायचंय की तू तुझं रूप बदलू नकोस. तुझा चेहरा बदलू नकोस. तुझे गुणधर्म बदलू नकोस. तू आहे तसाच रहा. माझ्या अंतरीतल्या जुन्या श्रावणासारखा. अजून काही दिवस उरलेत तुझे या मौसमातले. जाता जाता का होईना तुझे जुने रंग उधळ. पुन्हा रिमझिम बरसून बघ. पुन्हा इंद्रधनूच्या सप्तरंगांत आभाळ सजवून जा. पुन्हा एकदा माझ्या मनातल्या जुन्या आठवणी भिजवून जा. कारण माझं मन सारखं सांगतंय की तो श्रावण पुन्हा यावा आणि एखादी नवी कविता तू गेल्यावरही सुचवून जावी. कधीतरी हा श्रावणवेडा परतून पुन्हा येईल का? माझ्यासाठी सांजसकाळी बरसून पुन्हा जाईल का…?




























































