फाइव्ह–जी; अफवा आणि वास्तव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश कोळी

टू-जी, थ्री-जी, फोर-जीनंतर आता सुपरफास्ट हायटेक फाइव्ह-जी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिकांश लोकांना कुतूहल आहे. परंतु त्याचबरोबर या तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक अफवाही जगभरात पसरू लागल्या आहेत. या अफवांमध्ये खरोखर तथ्य आहे का? या अफवांच्या पार्श्वभूमीवर फाइव्ह-जी तंत्रज्ञान आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी येणार का? अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह.

एप्रिल-मे 2020 मध्ये जेव्हा कोरोनाचा महासंसर्ग पूर्ण जगभरात पसरला होता, त्याच वेळी हिंदुस्थानपासून ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स आणि इटली अशा युरोपीय देशांपर्यंत अनेक ठिकाणी फाइव्ह-जी तंत्रज्ञानाविरुद्ध लोकांचा संताप उफाळून आला होता, हे सर्वांना आठवत असेलच. कोरोना हे दुसरे तिसरे काही नसून, तो फाइव्ह-जी मोबाईल तंत्रज्ञानाच्या चाचणीचा परिणाम आहे, अशा बातम्यांनी सोशल मीडिया भरभरून वाहत होता. सर्वसामान्य किंवा कमी शिकलेले लोकच नव्हे तर चांगले शिकले-सवरलेले लोकही या बातम्यांवर विश्वास ठेवत होते. या बातम्यांचाच परिणाम म्हणून ब्रिटनमध्ये लोकांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 77 मोबाईल टॉवरना आगी लावल्या होत्या.

मोबाईल फोनच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने त्याही वेळी स्पष्ट केले होते आणि त्यानंतरही एकदा सांगितले होते. परंतु त्या काळात अशा कोणत्याही स्पष्टीकरणाचा लोकांवर काही परिणाम होत नव्हता, हेही वास्तव आहे. यासंदर्भात संशय घेणारे लोक संख्येने कितीतरी अधिक आहेत, कारण जर असे नसते तर आजही सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवांची गर्दी दिसली नसती. आजही सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा दिसून येतात, की फाइव्ह-जी तंत्रज्ञानामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. माहितीच्या स्फोटाचे हे युग असून, त्यामुळे अफवा केवळ लवकर आणि दूरवर पसरतात असे नाही, तर लोक योग्य माहिती स्वीकारण्यासही कचरतात. उदाहरणार्थ, जागतिक आरोग्य संघटनेकडून वारंवार असे सांगण्यात आले आहे की, दारू पिणे आणि प्रक्रियाकृत मांस खाण्याने कर्करोग होण्याची शक्यता वाढते. परंतु तरीही प्रक्रियाकृत मांस खाणे लोक बंद करत नाहीत आणि दारूची विक्रीही कमी होताना दिसत नाही.

फाइव्ह-जी हे थ्री-जी आणि फोर-जी तंत्रज्ञानाची दिशाच आणखी पुढे नेणारे तंत्रज्ञान आहे. याला ‘नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञान’ असेही म्हटले गेले आहे. फाइव्ह-जी आणि थ्री-जी, फोर-जी यांच्यात फरक एवढाच आहे की, फाइव्ह-जी हे तंत्रज्ञान एकाच वेळी अनेक यूजर्सना सहाय्यभूत ठरते. त्याचबरोबर डेटा हाताळण्याची सुविधाही देते. फोर-जी तंत्रज्ञानात रिस्पॉन्स टाइम अवघ्या 30 मिली सेकंदांचा असतो, तर फाइव्ह-जी तंत्रज्ञानात तो अवघा 5 मिली सेकंद एवढा असतो. आपल्या सर्वांच्याच दैनंदिन जीवनात आता व्हिडीओचे महत्त्व वाढले आहे; परंतु थ्री-जी, फो-जी इंटरनेट तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हिडीओ हाताळण्यात थोडी अडचण येते. कारण एकाच वेळी लाखो, कोट्यवधी लोक एकमेकांकडे व्हिडीओची देवाणघेवाण करीत असतात. थ्री-जी आणि फोर-जी तंत्रज्ञान ही प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळू शकत नाही. अशा वेळी फाइव्ह-जी तंत्रज्ञान गरजेचे बनले आहे. वस्तुतः थ्री-जी आणि फोर-जी तंत्रज्ञानात 6 गिगाबाईटपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो तर फाइव्ह-जी तंत्रज्ञान 30 ते 300 गिगाबाईट फ्रिक्वेन्सीमध्ये काम करते.

अत्यंत धावपळीच्या बनलेल्या सध्याच्या जीवनशैलीत फाइव्ह-जी तंत्रज्ञान अर्थातच आवश्यक आणि दिलासादायक बनले आहे. परंतु या तंत्रज्ञानाची ही जादुई ताकदच लोकांना घाबरवते आहे. लोकांमध्ये या तंत्रज्ञानावरून अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. वास्तविक फाइव्ह-जी तंत्रज्ञानामुळे आपल्याला अगणित फायदे मिळणार आहेत, हे उलटसुलट चर्चा करणाऱयांनाही माहीत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोक एकमेकांशी जलद आणि उत्तम प्रतीचा संवाद साधू शकतील. लोकांना अत्यंत वेगवान नेटवर्कची सुविधा मिळेल. ई-कॉमर्समध्ये या तंत्रज्ञानामुळे आणखी सुविधा मिळणार आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेला तज्ञ आपल्याला देऊ शकणार आहे. या तंत्रज्ञानामुळे ‘रियल टाइम संवाद’ शक्य होणार आहे. फाइव्ह-जी तंत्रज्ञानाच्या आधारे काम करणाऱ्या स्मार्ट डिव्हाइसेसना फोर-जीच्या तुलनेत हजारो पट वेगाने नेटवर्कची सुविधा देता येऊ शकणार आहे. यामुळे संगणक किंवा लॅपटॉपवरून जी कामे सध्या केली जातात, ती स्मार्ट डिव्हाइसेसच्या माध्यमातूनही करता येणे शक्य होईल. उदाहरणार्थ, ईमेल आणि इंटरनेटचा वापर. एकंदरीत फाइव्ह-जी तंत्रज्ञान स्मार्ट डिव्हाइसेसना नवीन आयाम देईल. त्यामुळे आपल्याला आश्चर्यजनक सुविधांचा लाभ घेता येईल. जीवन अधिक सुविधाजनक आणि सुपरफास्ट होईल.

फाइव्ह-जी तंत्रज्ञान मानवासाठी प्रचंड धोकादायक आहे, या जर अफवा असतील तर अखेर त्या कोणत्या कारणाने पसरविल्या जात आहेत? कोणताही ठोस पुरावा नसताना असे का केले जात आहे, हा मुख्य प्रश्न आहे. गेल्या वर्षी जानेवारीत बेल्जियममधील एका वर्तमानपत्राने एका स्थानिक डॉक्टरांची मुलाखत प्रसिद्ध केली होती. या डॉक्टरांचे म्हणणे असे होते की, ‘फाइव्ह-जी तंत्रज्ञानाचा संबंध कोरोनाशी आहे याचा माझ्याकडे कोणताही पुरावा नाही; परंतु असे असू शकते.’ या विषयावरून आकाशपाताळ एक करणाऱ्यांनी त्यांच्या मताच्या पुष्ट्यर्थ या मुलाखतीचा भरपूर वापर केला. वास्तविक, मुलाखतीत डॉक्टरांनी स्पष्टपणे असे सांगितले होते की, आपला दावा शाबीत करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. परंतु फाइव्ह-जी तंत्रज्ञानामुळे कोरोनासारख्या आजाराचा फैलाव होऊ शकतो, असा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला गेला. वास्तविक, तंत्रज्ञानाविषयी माणसाने नेहमीच नकारात्मक मानसिकता ठेवल्याचे दिसून येते. आज जो विरोध फाइव्ह-जीला होत आहे, तसाच विरोध एके काळी टू-जी आणि थ्री-जी तंत्रज्ञानालाही झाला होता.

(लेखक संगणक अभियंता आहेत.)