
>> डॉ. मंजिरी भालेराव
मंदिराच्या भोवती असलेल्या ओवऱया हिंदुस्थानातील पुराणातील अनेक गोष्टी दाखवणाऱया भव्य शिल्पांनी शिल्पांकित केलेल्या आहेत, हे आपण मागच्या भागात पहिले. त्यापैकी 3 कथापटांची माहिती पाहिली. आता इतर बाजूंचे शिल्पपट नेमके काय दाखवतात हे थोडक्यात पाहू.
अंगकोरवॅट हे मंदिर जेवढे प्रचंड भव्य आहे, तेवढेच ते देखण्या शिल्पपटांनी सजवलेले आहे. मागील दोन भागांमधून या मंदिराची विविध प्रकारची माहिती आपण घेत आहोत. या भागातही अजून माहिती पाहणार आहोत.
समुद्रमंथन हे पूर्वेकडील ओवरीमधले शिल्प 47 मीटर लांब आहे. मधोमध विष्णू आहे. देव आणि असुर म्हणजेच सुष्ट आणि दुष्ट यांच्या मधला संघर्ष इथे पाहायला मिळतो. पुराणांमध्ये समुद्रमंथनाच्या कथेनुसार क्षीरसागरचे मंथन करून अमृत वर काढण्यासाठी देवांनी असुरांची मदत मागितली. त्यासाठी मंदार पर्वताची रवी तयार केली तसेच पाच फणांचा नाग वासुकी याची दोरी केली. पहिल्यांदाच पर्वत घुसळल्यानंतर तो समुद्रात बुडायला लागला. तेव्हा विष्णूने कूर्म अवतार घेतला. पर्वताला खालून आधार दिला. त्यानंतर मंथन परत सुरू झालं. त्यातून एकेक रत्न बाहेर यायला लागले. ही कथा सांगणाऱया या शिल्पपटाचे तीन भाग आहेत. सर्वात खाली समुद्र- त्यामध्ये मासे, तसेच काही काल्पनिक जलचर, मधोमध कूर्म- त्यावर विष्णू त्यांनी दोन्ही हातांनी नाग धरलेलाही दाखवला आहे. यामध्ये एकूण 92 असुर आणि 88 देव दाखवले आहेत. हिंस्र, भयंकर चेहऱयांचे असुर हे दुष्ट आहेत, हे त्यांच्याकडे बघूनच लक्षात येते. असुरांचा प्रमुख (काहींच्या मते रावण) हा सर्वात डावीकडे दाखवला आहे. त्याने हातात वासुकी नागाचे पाच फणांचे डोके पकडले आहे. उजवीकडे 88 देव हे नागाची शेपटी ओढत आहेत असे दिसते. त्यामध्ये बिभीषण तसेच पाच डोक्यांचा शिव आणि हातात शेपटीचे टोक धरलेला हनुमान हे दिसतात. सर्वात खालच्या पट्टय़ामध्ये समुद्रमंथनामुळे काही प्राणी कापलेले आहेत असेही दिसते. रावण आणि हनुमान मूळच्या गोष्टीमध्ये नाहीत. स्थानिक कथेमध्ये त्यांचा समावेश झालेला दिसतो. हे अतिशय भव्य शिल्प अंगकोरवॅटमधील सर्वात प्रसिद्ध शिल्पांपैकी एक आहे.
विष्णूचा असुरांवर विजय हा पुढच्या शिल्पपटाचा विषय आहे. 50 मीटर लांब भिंतीवर हा शिल्पपट कोरला आहे. इतर शिल्पांपेक्षा याचा दर्जा थोडा कमी प्रतिचा आहे. दोन्ही बाजूने असुर चालून येत आहेत आणि मधोमध विष्णू गरुडावरती उभा दाखवला आहे.
हे पुढील शिल्प कृष्णाचा बाणासुरावर विजय ही गोष्ट सांगणारी आहे. 63 मीटर लांब अशा भिंतीवर हे शिल्प कोरलेले आहेत. हेसुद्धा सोळाव्या शतकात कोरलेले आहे त्यामुळे याही शिल्पपटाचा दर्जा थोडा खालावलेला आहे. गरुडावरती आरूढ झालेला आठ हातांचा कृष्ण, बरोबर प्रद्युम्न, बलराम हे बाणासुराला मारायला जात आहेत असे दाखवले आहे. या संपूर्ण शिल्पपटात गरुडारूढ कृष्ण चार वेळा दाखवला आहे. पुढे जेव्हा बाणासुराच्या वतीने शिव त्याचे जीवदान मागतो, तेव्हा कृष्ण ते मान्य करून शिवाला नमन करताना दाखवले आहे.
देव आणि असुर यांच्यामधले युद्ध हे पुढच्या 94 मीटर लांब ओवरीत पाहायला मिळते. हे कोणते ठरावीक युद्ध नसून चांगले आणि वाईट यांच्यातला हा अखंड चाललेला संघर्ष या शिल्पपटात प्रतिकात्मक रीतीने दाखवला आहे. यामध्ये जवळजवळ 21 देव त्यांच्या वाहनांसकट दाखवले आहेत. यात यक्षावर बसलेला कुबेर, गेंडय़ांच्या रथात बसलेला अग्नी, मोरावरील कार्तिकेय, हत्तीवरील इंद्र, गरुडाच्या पाठीवर विष्णू, रेडय़ांच्या रथात यम, दोन बैलांच्या रथात शिव, हंसावर ब्रह्मा, घोडय़ांच्या रथात सूर्य, पाच फणांच्या नागावर समुद्रदेव वरुण तसेच घोडय़ांच्या रथात कालनेमी असुर, हे सगळे या शिल्पपटात पाहायला मिळतात.
यानंतर सुप्रसिद्ध असलेली रामायणाची गोष्ट सांगणारे शिल्प पुढच्या ओवरीमध्ये पाहायला मिळते. यामध्ये रामायणातला शेवटचा युद्धाचा प्रसंगच दाखवला आहे. येथील कोरीव काम हे अतिशय देखणे आणि सुबक आहे. यामध्ये हनुमानाच्या पाठीवर हातात धनुष्य घेतलेला राम पाहायला मिळतो. त्याच्या बरोबरीने लक्ष्मण, बिभीषण, अंगद, हनुमान, सुग्रीव तसेच वीस हातांचा रावणसुद्धा अतिशय भयंकर अशा सिंहांच्या रथात बसलेला दाखवलेला आहे. या शिल्पपटामुळे अंगकोरवॅटची प्रसिद्धी मोठय़ा प्रमाणावर झालेली दिसते. या ओवऱयांच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सर्व बाजूंनी जिने केले आहेत. वर गेल्यावर चार बाजूला चार मोठी मोठी पाण्याची कुंडे आहेत. सर्वात वर शिखरावर जाण्यासाठी सरळ उभ्या आणि उंच उंच दगडी पायऱया बांधल्या आहेत.
या मंदिराचा कर्ता सूर्यवर्मन 2 रा हा विष्णूचा परमभक्त होता. त्यामुळे मृत्यूनंतर त्याच्या अस्थीही मंदिर परिसरात दफन केल्या गेल्या. आता हे राजाचे स्मारक मंदिर बनले. मृत्यूनंतर त्याला ‘परमविष्णूलोक’ अशी उपाधी मिळाली. तो त्याच्या आराध्य देवतेशी एकरूप झाला. तो साधारणपणे इ. स. 1145 ते 1150 या काळात कधीतरी मृत्युमुखी पडला. त्याच्यानंतर त्याचा मामेभाऊ धरणीन्द्रवर्मन 2 रा गादीवर आला. काळाच्या ओघात जयवर्मन 7 वा जेव्हा गादीवर आला, तेव्हा त्याने बौद्ध धर्म हा त्याचा राजधर्म बनवला. अंगकोरवॅटचेही रूपांतर बौद्ध मंदिरात केले गेले.
या अद्भुत मंदिराची माहिती आपण तीन भागांत अगदी थोडक्यात पाहिली, पण तरीही ती पूर्ण झाली असे वाटणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अवाढव्य आकार तसेच खूप विचारपूर्वक, गुंतागुंतीची केलेली रचना आणि असंख्य शिल्पांनी युक्त असे शिल्पपट. या मंदिराची माहिती इतक्या प्रकाराने घेता येते की, फक्त या मंदिरावरच एक लेखमालिका होऊ शकते!
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)





























































