भय इथलं संपत नाही…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

संजीवनी आणून देणारा हनुमान कुठेच दिसत नाहीय… कारण पर्वत, डोंगर, टेकडय़ा आधीच खणून काढल्यात- मॉल, शहर हवीयत. जागा जमीन हवी म्हणून वणवे लावून जंगल नष्ट केलीयत. नष्ट करायच्या या धडपडीला विराम नाहीच. असलाच हनुमान तरी त्याला संजीवनी मिळणारच कुठे या बेहोशीतून मृतावस्थेतून जागृतीत आणायला?

सर्व काही प्रश्नचिन्हंच… उत्तर द्यायला कुणीच नाहीये या भयाच्या नगरात…

भयाचं आटपाट नगर होतं.- म्हंजे नगराचं नावच भय होतं… जसं पृथ्वीच्या डोक्यावरच्या गावात 6 महिने दिवस न् 6 महिने रात्र असते तसं भयाच्या या नगरात चोवीस तास बारा महिने रात्रच!

चिंता आणि काळजी या दोन महाराण्यांचा राजा होता यमाचा सख्खा भाऊ. तशी चिक्कार गाव होती नगरात. पण गावाची नाव जबरदस्त – एका गावाचं नाव किंकाळी एकाचं नाव धडधड एकाचं दचक… तर एकाचं घाबरला…!

या नगरातून पाणी वहायचं तेही लालभडक रक्ताच्या रंगाचं… फुलं भाजी सारी काळय़ाकुळकुळीत रंगाची…’

‘‘पुरे पुरे… कर ही गोष्ट… अशी कुठं गोष्ट असते का? पऱया नाहीत राजकुमार नाही-’’

‘‘खूप पूर्वी त्या सुंदर गोष्टी जिवंत होत्या… न् प्रत्येक घरातल्या सुंदर सुरकुत्यांचं जाळं विणत पांढऱयाशुभ्र केसांच्या सुंदर उबदार आज्या त्या गोष्टी आपल्या निरागस चेहऱयाच्या नातवांना सांगायच्या… टिपूर चांदणं पडलेलं… गार वाऱयाच्या झुळका… आईच्या हातचं गरम जेवून नातवांना सुस्ती आलेली – टपोर जांभूळ डोळय़ात निद्रादेवी डोळय़ातल्या डोहात पाय बुडवून झुलत बसलेली न् तरी नातवांना गोष्ट ऐकायची असायची – कारण त्यावेळी त्यांचं जग पण तसंच सुंदर निरागस होतं – गोष्टीतले राक्षस म्हंजे शाळेतले मारकुटे मास्तर – आईचा मऊ मऊ हात म्हंजे साक्षात परीचा हात… जादूची कांडी म्हंजे तिची बोटच!
लाडू म्हटलं की लाडू हजर… मऊतलम पुरणपोळय़ा जिभेवर ठेवताच विरघळणारी-’’

‘‘आता पण आया बदलल्या नाहीत.’’

‘‘मुलं मात्र बदलली… आता त्यांना आई-बाप मागासलेले वाटतात. आता वातावरणात प्राजक्ताचा गंध येत नाही… कुठल्या तरी जहाल जहराचा विषारी वास भरून राहिला आहे. सकाळी गेलेलं माणूस येईल परत याची शाश्वती नाही… शाळेत गेलेली मुलगी थरथरत शाळेत जाते… धडधडत्या श्वासांनी परत येते…’’
‘‘सगळच इतकं काही वाईट चित्र नाही.’’

‘‘चित्रकार वाईट नाही. चित्र वाईट झालय… डोरियन ग्रेच्या पोट्रेटसारखं… तो तरुण देखणाच दिसत राहिला वर्षानुवर्षे… पण चित्र मात्र कुरूप, विद्रूप क्रूर दिसू लागलं… तसं… जग सुंदरच आहे, त्यात राहणाऱया माणसांचे विखार विकृती यानं ते जग बिघडलय… आणि हे चित्र दुरुस्त करणारा चित्रकार गायब झालाय! एकजण येतो काळय़ा रंगाचा फराटा ओढतो दुसरा लाल रंग रक्ताचा देतो… तर कोणी बायांच्या किंकाळय़ा न् दहशतीच्या खिळय़ांवर
तडफडणाऱया स्त्रिया ठोकतो… वास्तव पुसून आभास निर्माण करता येतो की पण ते खरं चित्र होणार नाही.’’

‘‘खरं चित्र त्रास देतं.’’

‘‘खोटय़ा चित्रानं डोळय़ाला थोडा वेळ बरं वाटेल पण मेंदूला त्या खोटेपणाचा त्रासच होईल… रात्रीला रात्र आहे म्हणणंच बरोबर आहे…’’
‘‘किमान आभासामध्ये एक भाबडी आशा तरी असते…’’

‘‘आशा… हा पण एक भासच की… कदाचित उद्या सकाळ होईल… कदाचित उद्या हे दुःस्वप्न नाहीसं होईल… पण म्हणून डोळेच उघडले नाही तर कळणार कसं सकाळ झाली की नाही ते?’’

‘‘जीवन आहे तोवर प्रश्न आणि दुःख असणार आहे.’’

‘‘अलबत पण याचा अर्थ असा नाही की ते नष्ट करण्याची धडपडच करायची नाही न् ज्यांनी ते प्रश्न न् दुःख निर्माण केलय त्यांना संपवायचं नाही. जे असं म्हणतात प्रश्न आपण निर्माण करतो… दुःख आपल्यातच असतं ते खोटं बोलतात… या जगात जसे दिवस न् रात्र आहे. तसे सत् न् असत् आहे…. काही विकृत मन स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱयांना दुःखी करतात. आता असं पण की प्रत्येकजण थोडाफार स्वार्थी असतो… पण पण आपल्या स्वार्थामुळे दुसरी व्यक्ती कायमची आयुष्यातून उठणार आहे न् हे जाणवून ते समजल्यावरही ज्याला यत्किंचितही वाईट वाटत नाही; दुःख होत नाही, पश्चात्ताप होत नाही ती व्यक्ती सर्वात जास्त भयंकर विकृत अमानवी…. न् समाजात आज अनेक असे लोक वावरतायत् … म्हंजे असतची संख्या जास्त… आणि सत् मात्र कमी… म्हंजे सगळे जगच असंतुलित झालय – महाभारतात म्हटलंय् कृष्णानं –

‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत

अभ्युत्थानाम् अधर्मस्य! संभवामि युगे युगे…’

पण अजूनही कुणी येत नाही… ही ग्लानी नाही ही बेहोरीअवस्था आहे देशाची… आणि संजीवनी आणून देणारा हनुमान कुठेच दिसत नाहीय… कारण पर्वत, डोंगर, टेकडय़ा आधीच खणून काढल्यात- मॉल, शहर हवीयत. जागा जमीन हवी म्हणून वणवे लावून जंगल नष्ट केलीयत. असलाच हनुमान तरी त्याला संजीवनी मिळवणारच कुठे या भारतवर्षाला बेहोशीतून मृतावस्थेतून जागृतीत आणायला?

सर्व काही प्रश्नचिन्ह… उत्तर द्यायला कुणीच नाही. असं असतानाही आपल्याला परीकथा न छान छान गोष्टी ऐकायच्यात का?’

‘‘नाही- नको- आता झोपतोय आपण-

आपल्या दुःस्वप्नासहित- वास्तवासहित न् उद्याची सकाळ कदाचित चांगली सुखमय सर्वांसाठी असेल असा विश्वास न् आशाही ठेवत डोळे मिटूयात रात्रीच्या अंधाराचा मान ठेवत न् सकाळीचा सन्मान करत!

– [email protected]