
>> मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
साधारणपणे माऊली हे नामानिधान वारकरी संप्रदायात वापरलं जातं. पंढरीची वारी करणारे स्त्री-पुरुष एकमेकांना याच नावाने संबोधतात. वारी न करणारेही वारकऱ्यांना माऊली म्हणूनच साद घालतात. या नावात एक सोज्वळ, सात्विकपणा जाणवतो. निष्पाप, निरागस, कुणाचेही भले चिंतणारा म्हणजे माऊली. मनात विठूरायाचे नामस्मरण आणि ओठात गोडवा म्हणजे माऊली असे हे समीकरण आहे. साधारण वारकरी म्हणजे धोतर, शर्ट, डोईवर मुंडासे, हातात भगवी पताका असेच चित्र डोळय़ांसमोर उभे राहते. निदान माझ्या तरी. पण इथे राहायला आल्यापासून माझे हे चित्र बदलून गेले! ज्या माऊलीचा मी उल्लेख करतो आहे, ती व्यक्ती आधुनिक पेहरावातली निघाली! व्यवस्थित पँट-शर्ट घालणारी, चारचाकी वगैरे ड्राइव करणारी, सकृतदर्शनी सर्वसामान्य माणसासारख्या दिसणाऱया या गृहस्थांना सगळे माऊली का म्हणतात, हे कळायला मला थोडा काळ जावा लागला.
ज्ञानेश्वर लांडे हे आमच्या सोसायटीचे अध्यक्ष. पण हे नाव फक्त डॉक्युमेंटेशन पुरतेच. एरव्ही हे माऊली या सुटसुटीत नावानेच ओळखले जातात. एरव्हीही प्रत्यक्ष ज्ञानेश्वरसुद्धा माऊली या नावातच सामावलेले! त्यामुळेच की काय, हे ज्ञानेश्वरही त्याच नावाची जबाबदारी स्वीकारून आहेत, तेही समर्थपणे! एवढय़ा मोठय़ा सोसायटीचे अध्यक्ष म्हटल्यावर माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य फ्लॅटधारकाचा त्यांच्याशी संबंध येणे हे क्वचितच. पण हे संबंध आले तेही घनिष्ठ. अर्थातच याचं श्रेय त्यांच्याकडेच जातं म्हणा. प्रत्येकाची जातीने विचारपूस करणे, सगळय़ांची नावे, फ्लॅट नंबर माहीत असणे, एवढेच नाही तर सुखदुःखाच्या प्रसंगी आस्थेवईकपणे चौकशी करणे या कारणांमुळे कितीही माणूसघाणा मनुष्य यांच्यापुरता ‘आपला’ होऊन जाणे साहजिकच!
सणसणीत उंची, डोईवरचे हटू लागलेला केशसंभार व्यवस्थित सांभाळलेला, आपुलकी साठलेले डोळे, सरळ नाकाच्या खाली किंचितशी मिशी, हसू पेरलेली जिवणी, अंगात बहुतेक वेळा शुभ्र किंवा अत्यंत फिक्या रंगाचा बुश शर्ट, पँट बहुधा डार्क रंगाची. पायात पॉलिश्ड चप्पल, बस, झाले माऊली तयार! वय तसे मध्यम. पन्नास ते साठच्या मध्ये. गावाकडची शेती, इथला व्यवसाय आणि तोंडी लावण्यापुरते राजकारण! सौम्य प्रकृतीचे दिसत असले तरी जनमानसात त्यांचा दरारा प्रसंगी लक्षात येऊन जायचा. कुठलेही क्षेत्र, कुठलेही खाते असो, तिथे माऊलींची दखल आवर्जून घेतलीच जाते हे आम्ही कित्येकदा अनुभवले आहे.
सोसायटीत कुठलाही कार्यक्रम असो, उत्सव असो, त्याचा जुगाड करून सगळय़ांना पुढे करून आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात वावरणार! कुणाच्या घरी एखादा दुःखद प्रसंग असला तर त्या घरच्या वडीलधाऱयांची भूमिका पाडणार, कुणाचा साधा वाढदिवस असला तरी आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार. त्यांच्या व्यस्त आयुष्यातून हे एवढा वेळ कसा काढत असतील, तेच जाणोत! याव्यतिरिक्त त्यांचा भाविकपणा! महिन्यातून ते आळंदीला, देहूला किती वेळा जातात याचा हिशोब घालणे मी सोडून दिलंय! बरं, जाणार ते एकटे नाही, त्यांच्या त्या प्रचंड गाडीत दोन-चार जणांना सोबत घेऊन जाणार!
परवा त्यांच्या एका नवीनच पैलूचा शोध लागला. गाणे! आम्ही काही जणांनी एकत्र येऊन गाण्याचा बेत ठरवला होता. तिथे माऊली हजर. मला उत्सुकता होती, ते या किशोर, रफीच्या गलबल्यात कोणतं गाणं म्हणणार. माऊलींनी माइक हातात घेतला आणि ‘विठू माऊली तू’ सुरू केलं! त्यांचे बंद डोळे, कपाळावर पडलेली एक रेघ! पाहता पाहता माझे डोळे कधी मिटले कळालेच नाही! तादात्म्य पावणे काय असते याचा तो झालेला साक्षात्कार होता.
मी आतापर्यंत अनेक व्यक्तिचित्रे लिहिली, प्रत्येकामध्ये मला वेगवेगळे रंग दिसत आले, पण ज्ञानेश्वर लांडे हे नाव धारण करणाऱ्या आमच्या माऊलीमध्ये सातही रंगांचे इंद्रधनुष्य दिसून गेले! लहान वयाच्या या ‘वडीलधाऱया’ माणसामध्ये मला आधार गवसला!
[email protected]




























































