
>> डॉ. मंजिरी भालेराव
कंबोडियातील नीक पीन (किंवा नेक पोन) एक वेगळेच, पण खूप महत्त्वाचे स्थळ बरेचदा पाहिले जात नाही. सिएम रीपपासून 20 किमीवर असलेले अंगकोर थॉम जिल्ह्यातील हे स्थळ. प्रीह खान या मंदिराच्या जवळ असलेल्या जयतटाक बराय (जयतडाग जलाशय) या मोठय़ा जलाशयामध्ये असलेल्या एका कृत्रिम बेटावर हे मंदिर उभारले आहे, पण त्याची मूळ संकल्पना, बांधकामाची रचना आणि तिथे असलेली शिल्पं पाहता अशा प्रकारचे हे एकमेवाद्वितीय स्थळ आहे असे म्हणायला हरकत नाही.
अतिशय भव्य आकाराच्या स्मारकांसाठी प्रसिद्ध असलेल्या कंबोडिया या देशातील मोठमोठी स्थळे पाहायला जगभरातले प्रवासी गर्दी करतात, पण थोडे बाजूला असलेले नीक पीन (किंवा नेक पोन) एक वेगळेच, पण खूप महत्त्वाचे स्थळ बरेचदा पाहिले जात नाही. सिएम रीपपासून केवळ 20 किमीवर असलेले हे स्थळ अंगकोर थॉम या जिह्यात आहे. प्रीह खान या मंदिराच्या जवळ असलेल्या जयतटाक बराय (जयतडाग जलाशय) या मोठय़ा जलाशयामध्ये असलेल्या एका कृत्रिम बेटावर हे मंदिर उभारले आहे, पण त्याची मूळ संकल्पना, बांधकामाची रचना आणि तिथे असलेली शिल्पं पाहता अशा प्रकारचे हे एकमेवाद्वितीय स्थळ आहे असे म्हणायला हरकत नाही.
या मंदिराची मूळ संकल्पना ‘आरोग्यशाला’ म्हणजे आजारी लोकांना बरे करणारे ठिकाण, अशी आहे. जयवर्मन (7 वा) या सुप्रसिद्ध राजाने इ.स. 1191 मध्ये या स्थळाची निर्मिती केली. प्रीह खान या त्याच्या वडिलांच्या स्मारकाजवळ हे स्थळ जलाशयामध्ये तयार केले आहे. काही अभ्यासकांच्या मते हे हिंदुस्थानी परंपरेतील ‘अनवतप्त’ (कधीही गरम न होणारे पाणी असलेला) तलाव याचे प्रतीक आहे. हिंदुस्थानी, विशेषतः बौद्ध परंपरेमध्ये जगाच्या मध्यभागी असणारा हा तलाव आहे, ज्यामधून चार दिशांना पाणी मिळते (किंवा नद्याच तयार होतात). ‘अनवतप्त’ या तलावातून या चार दिशांना पाणी जाण्यासाठी वेगळीच योजना आहे. उत्तरेला सिंह, पूर्वेला हत्ती, दक्षिणेला घोडा आणि पश्चिमेला बैल या प्राण्यांच्या मुखातून हे प्रवाह बाहेर पडतात आणि त्या त्या दिशांना पाणी मिळते. हे प्राणी म्हणजे त्या त्या दिशांचे जे रक्षणकर्ते महाराज आहेत, त्यांचे प्रतिनिधी. या तलावातील पाणी कधीही गरम होत नाही, त्यामुळे जे जीव अग्नीमध्ये पोळत असतात, त्यांचा त्रास हे पाणी शांत करते. तसेच अनेक व्याधीही बऱया करते. नेमक्या याच कल्पनेतून या स्थळाची निर्मिती झालेली दिसते.
ख्मेर साम्राज्यातील जनतेचे आजार दूर व्हावेत, त्यांनी निरोगी आयुष्य जगावे म्हणून राजा जयवर्मन (7 वा) याने त्याच्या काळात 102 ‘आरोग्यशाला’ (रुग्णालये) बांधल्या होत्या असे मानले जाते. अनेक मंदिरांच्या जवळ या ‘आरोग्यशाला’ बांधल्या होत्या. एका शिलालेखात तो असे म्हणतो, “माझ्या स्वतःच्या आजारापेक्षा प्रजेच्या आजारांमुळे मला जास्त वेदना होतात!’’ त्यामुळे त्याच्या साम्राज्यातील प्रजेच्या हितासाठी त्याने अनेक प्रकारची लोकोपयोगी कामे केली. मोठमोठे जलाशय निर्माण केले, आरोग्यशाला बांधल्या, पारंपरिक ख्मेर औषधे देणारे वैद्य नेमले तसेच औषधे पुरवण्यासाठीही अनेक उपाययोजना केल्या. या राजाची बौद्ध धर्मावर श्रद्धा होती. बौद्ध परंपरेमध्ये सर्व पीडितांना मदत करणारा बोधिसत्त्व म्हणजे अवलोकितेश्वर पद्मपाणी किंवा लोकेश्वर. त्याचे मंदिर या ठिकाणी जलाशयाच्या मधोमध तयार केलेल्या कृत्रिम बेटावर बांधले आणि त्याच्या भोवताली चार दिशांना चार पुंडे तयार केली. या परिसरात मुळात आठ किंवा त्याहून जास्त पुंडे असावीत असे आजच्या अवशेषांवरून वाटते.
हे स्थळ म्हणजे जणू काही ‘अनवतप्त’ तलावाची प्रतिकृतीच आहे. याच्या मधोमध असलेल्या मंदिराच्या भोवती असलेल्या चार पुंडात ‘अनवतप्त’ तलावासारख्या प्राण्यांची म्हणजे सिंह, घोडा, हत्ती आणि बैलाच्या ऐवजी मानवाचे, अशी मुखे आहेत. मुख्य तलाव आणि बाजूची चार कुंडे एकमेकाला जोडण्यासाठी कमानीची छते असलेले लहान लहान कालवे काढलेले आहेत. मुख्य मंदिराच्या भोवती एकावर एक अशा पायऱया बांधलेल्या आहेत. त्यांच्या भोवती दोन मोठे नाग वेटोळे घालून आपला फणा पूर्ण उघडून बसलेले आहेत, असे दाखवले आहे. त्यांच्या शेपटय़ा एकमेकांत गुंतलेल्या आहेत. त्यामुळे नीक किंवा नेक म्हणजे ख्मेर भाषेत नाग आणि नीक पीन म्हणजे ‘एकमेकांत गुंतलेले नाग’ असे नाव या स्थळाला मिळालेले आहे.
पण या स्थळाच्या रूपकात्मक संकल्पनेविषयी काही अभ्यासकांचे मत आहे की, हे पंचमहाभूतांपैकी चार महाभूतांचे प्रतीक आहे, ज्यांच्यापासून मानवी शरीर बनलेले असते. जर यांचा मानवी शरीरातील समतोल बिघडला तर माणूस आजारी पडू शकतो. तो नीट करण्यासाठी त्या त्या तत्त्वांचे प्रतिनिधी म्हणून हे चार प्राणी आणि त्यामध्ये मानवी मुख हे पृथ्वी या तत्त्वाचे प्रतीक आहे. ज्या आजारी लोकांना बरे व्हायचे असेल त्यांनी त्या त्या भागात जाऊन त्या पाण्यात स्नान करावे किंवा जिथून हे पाणी येते तिथून त्याच्या प्रवाहातून ते स्वीकारावे अशी योजना इथे केलेली होती. त्याचप्रमाणे बोधिसत्त्व अवलोकितेश्वराशी संबंधित कथांमध्ये येणाऱ्या ‘बलाह’ (किंवा वलाह) या पंख असलेल्या घोडय़ाचेही शिल्प इथे पाहायला मिळते. समुद्रातून व्यापार करणाऱया तसेच ताम्रद्वीप (श्रीलंका) येथे गेलेल्या लोकांना संकटात असताना या घोडय़ाचे रूप घेऊन अवलोकितेश्वर वाचवतो अशी कल्पना आहे. त्या घोडय़ावर अनेक माणसे चढलेली किंवा त्याला धरून आपला प्राण वाचवत आहेत, अशी दाखवली आहेत. मुख्य मंदिराच्या गाभाऱयाच्या बाह्य भिंतींवर तसेच इतर प्राण्यांच्या छोटेखानी मंदिरासारख्या रचनेच्या बाह्य बाजूवर अवलोकितेश्वर भक्तांना कसा वाचवतो याची शिल्पे कोरली आहेत. मुख्य मंदिराच्या छताच्या बाजूला बुद्धाच्या आयुष्यातले विविध प्रसंग कोरले आहेत. भक्तांना अनेक संकटांपासून वाचवणारा हा महाकारुणिक देव खूप लोकप्रिय झाला होता हे इथेही दिसते. केवळ शारीरिक व्याधींपासून नाही तर ‘पापरूपी चिखल’सुद्धा स्वच्छ करायला मदत करून हा भवसागर पार करायलाही हा अवलोकितेश्वर मदत करतो, अशी भावनाही यामागे असावी. काही अभ्यासकांच्या मते एका अर्थाने राजा जयवर्मन (7 वा) हाच जणू काही अवलोकितेश्वरासारखा सर्वांना मदत करणारा, महाकारुणिक बोधिसत्त्वासारखा राजा होता, हे यातून सुचवायचे असावे.
अशा प्रकारे एक वेगळी संकल्पना घेऊन तयार केलेलं हे स्थळ खूप रमणीय आहे. या ठिकाणी जायचा रस्ता दोन्ही बाजूला असलेल्या जलाशयांमधून तयार केलेला आहे. मंदिराकडे जाताना असे वाटते की, या शांत परिसरात खरोखरच रुग्ण उपचार घ्यायला येत असतील आणि त्यांना त्यांचा लोकेश्वर त्यांच्या सर्व अडचणीतून मुक्त करीत असेल!
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)





























































