शैलगृहांच्या विश्वात – महाराष्ट्रातील शैलगृहांची सुरुवात

>> डॉ. मंजिरी भालेराव

शुंग-सातवाहन काळात शैलगृह तयार करण्याची परंपरा अधिक विस्तृत होत गेली. महाराष्ट्रात सातवाहन काळात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये शेकडो शैलगृहे खोदली गेली. यातील सर्वात प्राचीन शैलगृहांमध्ये भाजे, अजिंठा क्र. 10, पितळखोरा या ठिकाणच्या चैत्यगृहांचा समावेश होतो.

भारतात शैलगृहे तयार करण्याची परंपरा जरी मौर्य काळात सुरू झाली असली तिला बहर मात्र शुंग-सातवाहन काळात (इ.स.पूर्व पहिले शतक ते इ.स. तिसरे शतक) आला. या काळात पश्चिम महाराष्ट्रात विशेषत सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये शेकडो शैलगृहे खोदली गेली. तसेच या काळात ओडिशा, आंध्र प्रदेश या प्रांतातही जैन आणि बौद्ध धर्माच्या श्रमणांसाठी शैलगृहे तयार झालेली दिसतात. ओदिशातील उदयगिरी-खंडगिरी आणि आंध्र प्रदेशातील गुंटुपल्ली या ठिकाणी इ.स. पूर्व 2 या शतकापासून लेणी तयार करायला सुरुवात झाली होती.

बौद्ध भिक्षूंना वर्षाकालीन निवासासाठी विहारांची निर्मिती करण्यात आली. प्रार्थनागृह म्हणून स्तूप असलेली चैत्यगृहे तयार करण्यात आली. त्याचबरोबर सभागृह, भोजनगृह, स्नानपोढी (अंघोळीच्या पाण्याची टाकी), कोढी (पूजेचे कोनाडे), स्मशाने इ. सुद्धा कोरले गेले. डोंगर खोदून जी शैलगृहे तयार केली, ती खरे तर दगड, विटा, माती आणि लाकूड यांच्या सहाय्याने ज्या इमारती बांधल्या जायच्या, त्यांचीच प्रतिकृती होती.

मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे खुद्द गौतम बुद्धांच्याच हयातीत अशा प्रकारचे विहार, संघाराम बांधायला सुरुवात झाली होती. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्तूप उभारले गेले. जेव्हा हे स्तूप एखाद्या इमारतीत असत तेव्हा त्या इमारतींना चैत्यगृह म्हणत. अशा चैत्यगृहांची आणि विहारांची दगडात केलेली नक्कल म्हणजे ही पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध शैलगृहे किंवा गुंफा.

वर उल्लेख केल्याप्रमाणे सातवाहन राजे जेव्हा महाराष्ट्रावर राज्य करत होते तेव्हा गुंफा तयार करण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर झाले. त्यांच्या निर्मितीला केवळ सातवाहन राजेच कारणीभूत होते असे नाही, तर या प्रदेशातील आणि इथे बाहेरून येणारे निरनिराळे व्यापारी, शेतकरी, भिक्षू आणि इतर अनेक बौद्ध धर्माचे अनुयायी हेदेखील आश्रयदाते होते. या गुहांमध्ये आढळणाऱया ब्राह्मी लिपीतील आणि प्राकृत भाषेतील दानलेखांमध्ये या आश्रयदात्यांची नावे आणि त्यांचे व्यवसाय यांचीही नोंद दिसते. ही लेणी सर्वसाधारणपणे तत्कालीन व्यापारी मार्गांच्या जवळपास खोदलेली आढळतात. त्यामुळे या व्यापाऱयांनाही या गुहांबद्दल माहिती करून घेणे आणि आपल्या भक्तीचे प्रतीक म्हणून त्यांना दान देऊन पुण्य मिळविणे सोपे गेले.

शैलगृह खोदताना कारागिरासमोरची सर्वात मोठी आव्हाने म्हणजे तयार होणाऱया गुहेचा संपूर्ण आराखडा तयार करणे आणि गुहेसाठी योग्य डोंगर/खडक निवडणे. या बाबतीत कलाकारांना बांधकाम करणाऱयांचा अनुभव कामाला आला असावा. इमारतीच्या प्रत्येक घटकाची बारीकसारीक नोंद घेऊन पूर्वी ज्या इमारती उभ्या राहत असत, तशाच योजना या शैलगृहांसाठी करून त्यांची निर्मिती झालेली दिसते. म्हणूनच बांधीव स्थापत्यात आढळणारे सर्व घटक या शैलगृहांमध्ये जसेच्या तसे दगडात कोरलेले आणि काही वेळा लाकडाच्या सहाय्याने तयार केलेले आढळतात.

शैलगृहे खोदताना आधी डोंगराचा पृष्ठभाग सरळ आणि सपाट करून घेत असत. त्यावर गुहेच्या मुखदर्शनाची बाह्य रेषा आखून घेत असत. मुखदर्शनाचे सगळ्यात वरचे टोक जिथे असेल तिथून खडकात बोगद्यासारखे खणत जात. जिथे स्तंभशीर्ष किंवा मूर्ती किंवा नक्षीकाम करायचे असेल तेवढी जागा सोडून उरलेला डोंगर पोखरत खाली येत जेवढी उंची हवी असेल तेवढी मिळवीत. नंतर जे आवश्यक ते बारीक-सारीक कोरीव काम किंवा चित्रकाम करीत, पण हे सर्व आधी व्यवस्थित ठरवून घेऊनच करत. कारण एकदा तोडलेला दगड त्या ठिकाणी पुन्हा बसविता येणार नाही हे माहीत होते. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत आणि दख्खनचे पठार हे ज्वालामुखीजन्य आहेत. लाव्हारसाचे थर एकमेकांवर बसून ते तयार झाले आहेत. जवळपास 90 फूट जाडीचे एकसंध थर एकावर एक रचले गेलेले दिसतात. त्यामुळे या थरांमध्ये गुहा खोदणे शक्य होते. प्राचीन कारागिरांना या खडकांच्या रचनेचा चांगला अंदाज होता, पण क्वचित काही ठिकाणी हा अंदाज चुकलेलाही दिसतो. कारागिरांना या बाह्य स्वरूपावरून खडकाच्या अंतर्रचनेचा अंदाज काही वेळेस आला नाही हे आपल्याला अजिंठा, जुन्नर, नाशिक इ. आणि इतर अनेक ठिकाणच्या अपूर्ण शैलगृहांवरून लक्षात येते. कधी कधी गुहेच्या भिंती आणि छतामध्ये मोठय़ा भेगा असत व त्यातून इतके पाणी गळत असे की, ती गुहा अर्धवट सोडण्याशिवाय पर्याय नसे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अपूर्ण खोदकाम दिसते.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शैलगृहांमध्ये भाजे, अजिंठा क्र. 10, पितळखोरा या ठिकाणच्या चैत्यगृहांचा समावेश होतो. इ.स.पूर्व दुसऱया शतकात यांची निर्मिती झाली होती. ज्या चैत्यगृहात लाकडी कामाचा जास्त वापर तसेच ज्याची रचना अगदी बांधीव चैत्यगृहांसारखी, ते चैत्यगृह जास्त प्राचीन असा साधारण ठोकताळा यांचा काळ ठरविण्यासाठी वापरला जातो. वर उल्लेखिलेल्या चैत्यगृहात तर चक्क लाकडाच्या तुळय़ाच लावलेल्या होत्या. बांधीव स्थापत्यात लाकडी कमानी छताच्या वजनाने खांब जसे थोडे कलत असत, तसेच या दगडात कोरलेल्या चैत्यगृहातही दाखविले आहेत. याशिवाय मुखदर्शनात लाकडी सज्जे, त्यांना आधार देणारे हस्त हेसुद्धा दगडात कोरलेले दिसतात.

महाराष्ट्रातील कोरीव लेणी हा प्राचीन भारतीय स्थापत्याच्या अभ्यासकांचा अतिशय आवडता विषय आहे. या विषयावर परदेशी, भारतीय आणि स्थानिक मराठी अभ्यासकांनी ज्या विपुल प्रमाणात लेखन केले आहे, त्यावरून याचा सहज अंदाज येतो. महाराष्ट्रातील बौद्ध लेणी ही प्राचीन काळातील स्थापत्य कसे होते हे सांगणारे एकमेव शिल्लक पुरावे आहेत असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या या वैशिष्टय़ांमुळे त्या लेणींचा अभ्यासकांनी विविध अंगांनी विचार केला आहे. त्यांच्या कालानुक्रमासाठीही अनेकांनी स्वतंत्रपणे अभ्यास करून आपापली मते मांडली आहेत. यामध्ये फर्ग्युसन आणि बर्जेस यांचे नाव प्रथम घेतले पाहिजे. या दोघांनी 1881 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया’ या ग्रंथातून त्यांना तेव्हा माहीत असलेल्या भारतातील सर्व महत्त्वाच्या लेणी समूहांचा आढावा घेऊन त्यांचा कालानुक्रम ठरवण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांच्या नंतरही अनेक संशोधकांनी या विषयावर काम करून त्यांची मते मांडली. त्यामुळे काहींच्या मते भाजे येथील चैत्यगृह सर्वात जुने, तर काहींच्या मते जीवदानी हे विरारमधील लेणे, काहींच्या मते मुंबईमधील अंधेरीतील कोंडीवते किंवा महाकाली हे लेणे सर्वात जुने आहे, परंतु अशा प्रकारे पक्के पुरावे नसताना असा काही ठोस निष्कर्ष काढणे अतिशय अवघड आहे. आज सर्वमान्य मतांमध्ये भाजे येथील चैत्यगृह सर्वात जुने असावे असे मानले जाते. त्याची नेमकी करणे काय आहेत आणि त्या स्थळाची इतर वैशिष्टय़े काय आहेत हे पुढच्या लेखात जाणून घेऊ.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)

[email protected]