आपला माणूस : जादूचे किमयागार

>> मेधा पालकर

जितेंद्र हे जादूचे किमयागार म्हटल्या जाणाऱया रघुवीर कुटुंबाच्या तिसऱया पिढीचे प्रतिनिधी आहेत आणि ‘जादू’चा वारसा सांभाळत आहेत. रघुवीर यांचे आतापर्यंत 27 देशांत 15 हजार 382 प्रयोग झाले आहेत. जितेंद्र यांनी स्वतः 2100 प्रयोग पूर्ण केले आहेत.

मान कापूनही जिवंत राहिलेला तरुण, अनेकदा रिकामी केली तरी घागरीत पुन्हा येणारे पाणी, पोकळ पाइपमधून निघणाऱया विविध वस्तू अशा विविध प्रकारच्या जादू पाहताना भारावून जाणारे प्रेक्षक हे चित्र दिसते जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या प्रयोगात. काळानुसार बदल करून ती जादू प्रेक्षकांना मनापासून कशी आवडेल याची किमया त्यांनी साधली आहे. आज रघुवीर यांची तिसरी पिढी, जितेंद्र रघुवीर जादूचे प्रयोग करून रसिकांचे मनोरंजन करत आहे. जितेंद्र यांचे आजोबा जादूगार रघुवीर यांनी सादर केलेला पहिला जादूचा प्रयोग खूप लोकप्रिय झाला. राजस्थानी राणा नावाच्या एका माणसाकडून ते ‘जादू’ शिकले. त्यानंतर स्वतः ही कला त्यांनी विकसित केली. गावोगावी जादूचे प्रयोग केले. त्याचदरम्यान हिराबाई बडोदेकर यांच्यासोबत लंडनमध्ये जादूचे प्रयोग केले. तिथूनच प्रयोगासाठी लागणारा troop तयार झाला. मग गावोगावी, देशविदेशात जादूचे प्रयोग होऊ लागले. पुण्यातल्या भिकारदास मारुतीशेजारी आजोबांनी त्याकाळी बांधलेल्या बंगल्यात टाळी वाजवली की दिवे लागायचे. हा बंगला पाहण्यासाठी लोक यायचे. त्यांनी मग जादूची शाळा सुरू केली. जादूला लोकप्रिय करण्यात रघुवीर यांचे योगदान या देशात खूप मोठे आहे. नंतर मोठय़ा रघुवीर यांच्यासोबत त्यांचा मुलगा विजय प्रयोग करू लागले. ते बीई असल्यामुळे जादूचे प्रयोग करताना त्यांनी तंत्रज्ञान आणि कला याची योग्य सांगड घातली. प्रयोग जरी पिढय़ान् पिढय़ा चालत आले असले तरी त्यात नावीन्य कसे राहील याचा विचार केल्यामुळे प्रेक्षकवर्ग मिळत गेला. प्रेक्षक पुनः पुन्हा हे प्रयोग पाहण्यासाठी कसे येतील यासाठी त्यात काळानुसार बदल केले. नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला. शिवाय दरवर्षी नवीन प्रयोग आणले. जितेंद्र हे जादूचे किमयागार म्हटल्या जाणाऱया रघुवीर कुटुंबाच्या तिसऱया पिढीचे प्रतिनिधी आहेत आणि ‘जादू’चा वारसा सांभाळत आहेत. रघुवीर यांचे आतापर्यंत 27 देशांत 15 हजार 382 प्रयोग झाले आहेत. जितेंद्र यांनी स्वतः 2100 प्रयोग पूर्ण केले आहेत. या वर्षी त्यांनी जादू आणि जिम यांचे फ्युजन आणले. हा नवीन प्रयोग प्रेक्षकांना आवडला. यामध्ये जिम nyastik सादर करताना रिकाम्या खोक्यातून व्यक्ती बाहेर कशी येईल यांचे अचूक टायमिंग साधता आले पाहिजे. माणसाचे दोन तुकडे हा वर्षानुवर्षे चालणारा प्रयोग असला तरी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यामध्ये कुतूहल आणण्याचा प्रयत्न जितेंद्र यांनी केला. त्यामुळे आजही हा प्रयोग प्रेक्षकांना आवडतो. सतत नवीन दिले पाहिजे म्हणजे ती कला रसिकांपर्यंत पोहचते. आता जादूचे केवळ व्यावसायिक प्रयोग न करता बऱयाच शाळा, रुग्णालय, मंदिर यांच्या मदतीसाठी ते केले आहेत. शाळेतील मुलांना जादूचे प्रयोग शिकवून त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण होणार नाही याबाबत जनजागृती केली जाते. अलीकडे जादूचे प्रयोग जात निर्मूलनासाठी आम्ही करतो. शिक्षण आणि जादू यांचा उपयोग करून शिक्षकांना नुकतेच प्रशिक्षण दिले. यामुळे मुलांना गणित, विज्ञान हे विषय शिकताना गोडी निर्माण होण्यास मदत झाली. वकीलसुद्धा क्रिमिनल सायकॉलॉजिसाठी, डॉक्टरानी पेशंटसाठी या प्रयोगाचा उपयोग केला तर पेशंटला बरे कसे वाटेल हे सांगितले जाते. जादूच्या प्रयोगाला भाषेचे बंधन नाही. त्यामुळे ती सर्वत्र पोहोचते. चितळे यांची नवीन मिठाई आणली तेव्हा ती सादर करताना जादूचे प्रयोग करून तिचे सादरीकरण केले. ‘पीएनजी’ यांच्या हिऱयाचे दागिनेसुद्धा असेच जादूने सादर केले. हे प्रयोग लोकांना खूप आवडले. जादू आता सर्व क्षेत्रांत पोहोचली आहे. जादू ही कला आहे. ती पुढे नेताना त्यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतच राहावा लागतो. आता रघुवीर कुटुंबाची चौथी पिढी म्हणजे जितेंद्र यांचा मुलगा ईशान जादूचे प्रयोग करतो आहे. तो आता सहावीत आहे. कला पुढे नेण्यासाठी ती दिली पाहिजे. तर ती आपोआप पोहोचते. त्याप्रमाणे जादूचे प्रशिक्षण देणारे वर्ग, कार्यशाळा यामधून ती शिकविली जाते. जादूच्या प्रयोगाचा विश्वविक्रम कसा करता येईल या दृष्टीने सध्या जितेंद्र रघुवीर प्रयत्न करत आहेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या