DONN!!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद शिंदे

विजू माने… आंतरराष्ट्रीय किर्तीचा डॉन व्हायचं होतं त्याला… दहावीनंतर तेच साध्य होतं डोळय़ांसमोर… पण अचानक फ्लॅश पडला आणि दिशा बदलली….

वात्सल्य फाऊंडेशन विक्रोळी अनाथ आश्रमाचं दार विजू मानेनं उघडलं. दाराचा आवाज ऐकून एक अतिशय लहान मुलगी ‘बाबा आले, माझे बाबा आले… माझे बाबा मला न्यायला आले’ असं बोलत विजू मानेला येऊन बिलगली… आणि पुन्हा तेच म्हणत होती माझे बाबा आले मला न्यायला… मी जाणार आता माझ्या बाबांबरोबर. माझ्या बाबांच्या घरी… छातीला बिलगल्यावरही ती मुलगी तेच बोलत होती. तिच्या श्वासोच्छवासाचा स्पर्श विजूच्या छातीला जाणवत होता. त्याचं हृदय आणखी द्रवत होतं. सगळ्यांनी मिळून तिला विजूपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, वेगळं केलंही पण तिचा स्पर्श, तिचा गंध, विजू मानेपासून कसा वेगळा करणार? विजू तिथं अडकला. त्या मुलीला परत जाताना पहात राहिला… गलबललं काळीज, तुटत राहिलं बराच वेळ. आठवत राहिले त्याला तेच ते त्या लहानगीचे शब्द… घुमत राहिले. विजू विचार करत राहिला…

विजू माने पूर्वी इतका हळवा नव्हता… दहावीला 87 टक्के मार्क मिळवूनही तो गुंडगिरीकडे कसा खेचला गेला ते त्याला नीटसं आठवत नाही. पण त्यात तो ओढत चालला होता. मारामाऱया, राडे हे त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग झाले होते. त्यात त्याला फारसं वावगं किंवा चुकीचंही काही वाटत नव्हतं… घरचा आर्थिक स्तर अतीनिम्नच… ते आणखीनच त्याला गुंडगिरीकडं ओढू लागलं… तो त्यात रमायलाही लागला होता. त्यावेळेचे सगळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुप्रसिद्धीचे गुंड, डॉन हे त्याचे आदर्श होते. त्याला त्यांच्यासारखं व्हायचं होतं, तो स्वतःचे त्यांच्या पोजमध्ये फोटो काढून घेत असे… बस्स… हेच व्हायचंय आपल्याला त्यानं ठरवलंच होतं… डॉन… मोठ्ठा डॉन… या प्रस्तुत डॉनला एकजण भेटला. राजू लोखंडे त्याचं नाव… या राजू लोखंडेनं विजूचं काय बौद्धिक घेतलं कुणास ठाऊक, पण विजूचा दृष्टिकोन बदलला. रस्ताही आणि वाटही. पण राजू लोखंडे हे क्षणिक अवतरले. त्यांनी ज्ञान दिलं ते परत दिसलेच नाहीत. ते नंतर दिसले थेट 30 वर्षांनी. जेव्हा विजू माने ‘विजू’ माने झाला होता. विजू मानेसुद्धा या फ्लॅशला खूप महत्त्वाचं स्थान देतो त्यांच्या प्रवासात. एक राजू लोखंडे नावाचा फ्लॅश (चमकतो) आणि आपण योग्य मार्गावर यायला लागतो…

मग बीएससी झालं. भान यायला लागलं. रवी करमरकर भेटला. बघायला, वाचायला शिकायला लागलो. रवीनं माझी भेट नाटकांशी-एकांकिकांशी घालून दिली. मग माझी भेट उन्मेष, आयएनसी यांच्याशी झाली. मी घडू लागलो, मी पाहू लागलो, मला शब्दांचे नवे अर्थ कळू लागले, मग नवे उमगू लागले. मनात शब्द आणखी फुलू लागले… रवी करमरकरनं दाखवलेल्या वाटेवर चालू लागलो. हेमामालिनी यांच्यापर्यंत येऊन पोहोचलो. त्यांची एक मालिका दिग्दर्शित केली. हुरूप वाढला. भवताल नव्यानं समजू लागलं. रंग कळायला लागले. रेखाही भान देऊ लागल्या.

मेघा मेहंदळे यांनी विश्वास दाखवला माझ्यासारख्या अगदी सिनेमाध्यमासाठी नवख्यावर आणि माझा पहिला मराठी सिनेमा आला ‘गोजिरी’ (जे माझ्या मुलीचंही नाव आहे.) ‘गोजिरी’ गाजला, नाव मिळालं गोजिरीला पुरस्कारही खूप मिळाले, कौतुक झालं. समीक्षकांनी गौरविलं आणि विजू माने नाव लोकांच्या, जाणत्यांच्या ओठांवर रुळू लागलं…

अशोक नारकर हे प्रस्थ सगळ्यांना मदत करणारं पण कधी पुढे येणार नाही. अशीच मदत त्यांनी विजूला केली आणि सिनेमा आला ‘खेळ मांडला.’ विजू त्यांना खूप मानतो आणि त्यांचा खूप ऋणीही आहे. एकीकडे चित्रपटाचं द्वार उघडलं होतं. पण जाहिरात हे सृजनविश्वही हाक मारत होतं. ‘ओ’ देऊन मित्र अभिजीत पानसे आणि विजू गेले त्या क्षेत्रात. अगदी लोकल केबल जाहीरातींपासून ते आयसीआयसीआय, रेमंड, फिनिक्स या सगळ्या मोठमोठय़ा कंपन्यांसाठी त्यांनी जाहिरात निर्मिती केली… भान वाढत गेलं, शब्दांशी दोस्ती वाढली. कविता स्फुरू लागली. विजू लिहू लागला. पण किशोर कदम (सौमित्र), जितेंद्र जोशी, सलील या मित्रांसमोर आपली कविता कशी वाचायची कारण ते त्यातल्या त्यात मित्र असले तरी मान्यवर कवी. म्हणून मी कधी कविता त्यांच्यासमोर सादर केलीच नाही. केली तर बुजत… त्यांच्या वकूबाला लाजत… ‘आज माझा कविता संग्रह प्रकाशित झाला असता पण त्या सगळ्या मित्रांमुळं माझा काव्यसंग्रह आला नाही. हे सगळे त्याचे दोषी आहेत’ अशी प्रेमळ तक्रारही विजू करतो…

रवी जाधव, उदय सबनीस यांची स्थापन केलेल्या आणि त्यांचा एक महत्त्वाचा घटक विजू माने असलेली संख्या टीएजी (ठाणे आर्टिस्ट गिल्ड) जोमानं काम करतेय… देशात परदेशात या संस्थेचा परिवार काम करतोय… अविष्कारच्या चळवळीनंतर आणखी एक पाऊल म्हणजे टीएजी. एक पान एक पाऊल पुढचं… बंडू सावंत आणि ठाणे महानगरपालिका यांच्या ‘सिग्नल शाळा’ याचाही विजू अविभाज्य घटक आहे… त्याच शाळेतल्या एका मुलाने दहावीला 76 टक्के मिळवले आहेत याचा आनंद विजू काही केल्या दडवूच शकत नाही.

या दरम्यान एका नाटकानिमित्त (एकांकिका) मॉबमध्ये भेटलेली अनघा कधी दोन पात्री नाटकाची नायिका झाली आणि मग तीच सगळं माने संस्थानं सांभाळू लागली. हे डोळ्यांसमोर घडत होत पण हे विजूच्या जगण्याचं खासगीच पण एक उजवेपण होतं… आपल्या संपूर्ण चढउतारात साथ देणारी अनघा, कधी कधी माझ्यापेक्षाही धाडसानं निर्णय घेणारी अनघा… विजूच्या मनातलं पान. अनघा… ठाण्यातली बंद पडलेले वंदना टॉकीज या दोघांनी चालवायला घेतलीय केव्हढं धाडस. विजय तुला सलाम आहे.

मराठीमध्ये वेबसिरीज आणली ती खऱया अर्थानं विजू माने या सृजनानं… अफाट प्रसिद्धी विजू माने नाव… जनमानसात पसरलं… कर्णेपकर्णी झालं… फॅन्स भेटू लागले… विजूला सार्वजनिक ठिकाणी फिरणं बंद झालं. इतकी अफाट ‘ह्युवरशीप’ स्ट्रगलर झाला या वेबसिरीजला लाभली… अर्थात विजय याचं श्रेय आपल्या सगळ्या सवंगडय़ांनाच देतो… विजू आणि सचिन वाझे एक सिनेमा लिहित होते. त्याची कादंबरी कधी झाली हे त्यांनाही कळंलच नाही तो सिनेमा आधी कादंबरी म्हणून आपल्या सगळ्यांना पहायला मिळेल, खरं तर वाचायला मिळेल… विजूचं पुढचं धाडस तर फार मोठं आणि अफाटही आहे… सावरकर यांच्यावर तो चित्रपट करतोय. पण सावरकर शब्दात पकडायचे, दोन तासांत बघायचे, पोहोचवायचे, हे जितकं अवघड तितकंच त्यासाठी लागणारी आर्थिक रसदही मिळवणं अवघडचं. विजूचं यानिमित्तानं आवाहन आहे की, आपापल्या परीनं यावं आपण सगळे मिळून सावरकर भारतभर नेऊ. कथित राजकारणाच्या पलीकडचे… विजू तुला मनोज्ञ शुभेच्छा…

दोन आया… घरात खायची ददात… धान्य डोळ्यावरून पाच-सात किलोमीटर वहायचं. अंगावरचे कपडे, गरिबी… त्याच वाटेवरून येणारे जाणारे आपल्या शाळेतले सवंगडी मित्र, सहविद्यार्थी… काय वेदना, काय आक्रोश झाला असेल त्या बालमनात? किती धुमसणारा कोलाहल विव्हळत असेल त्या इटुकल्या हृदयात? तो सगळा कोलाहल ते आंदोलन तुझ्या सिनेमातनं आम्हाला पाहू दे विजू.

z [email protected]