अभिव्यक्ती – बाईपण भारीच असतं!

>> डॉ. मुकुंद कुळे

हिंदुस्थानी पुरुष दांभिक आहे. एकीकडे स्त्रीला देवता, माता मानायचे आणि दुसरीकडे तिच्यावर जेवढे वर्चस्व गाजवता येईल तेवढे गाजवायचे, हाच कायम या हिंदुस्थानी समाजपुरुषाचा खाक्या राहिलेला आहे. कधी गोड बोलून, तर कधी दहशतीने त्याने कायमच स्त्रीला आपल्या काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु वेळ आलीच तर डोईवरचा पदर कंबरेला खोचून प्रतिकार करणाऱ्या महिलांची कमी नाही. हे पूर्वापार चालत आलेय. शेवटी बाईपण भारी असतेच, फक्त ते निभावता आले पाहिजे!

नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीचा उत्सव. विश्वाची तारिणी, जगत्जननीचा उत्सव. स्त्रीभक्तीचा, स्त्रीतत्त्वाचा आणि स्त्रीशक्तीचाही उत्सव. किंबहुना स्त्री आणि भूमीच्या प्रसवतेचा म्हणजेच सर्जनशीलतेचाच उत्सव. अर्थात असा हा उत्सव हिंदुस्थानात बारा महिने, तेरा त्रिकाळ या ना त्या कारणाने सुरूच असतो अन् तरीही आज आठ महिन्यांच्या बालिकेपासून 80 वर्षांच्या वृद्धेपर्यंत कुणीही पुरुषाच्या वासनेतून, जाचातून सुटत नाही. कारण हिंदुस्थानी पुरुष दांभिक आहे. एकीकडे स्त्रीला देवता, माता मानायचे आणि दुसरीकडे तिच्यावर जेवढे वर्चस्व गाजवता येईल तेवढे गाजवायचे, हाच कायम या हिंदुस्थानी समाजपुरुषाचा खाक्या राहिलेला आहे. कधी गोड बोलून, तर कधी दहशतीने त्याने कायमच स्त्रीला आपल्या काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण न जाणो स्त्री आपल्याला वरचढ झाली तर…! अशी त्याला कायमच भीती वाटत आलीय आणि ती भीती आताची नाही सनातन म्हणजे आदिम आहे. जेव्हा त्याला स्त्रीच्या जांघेतून स्त्रवणाऱ्या लाल, काळ्या, निळ्या स्त्रावाचं पहिलं दर्शन घडलं तेव्हापासून.

निसर्गाची कोडी न सुटलेल्या त्या आदिम काळात स्त्रीच्या जांघेतून महिन्या-महिन्याला अचानक वाहू लागणाऱया स्त्रावाचं त्यालादेखील सर्वप्रथम भयच वाटलं. केवळ स्त्रावाचंच नाही, तर हा स्त्राव आणि तो स्त्राव धारण करणाऱ्या स्त्रीविषयीदेखील तो भयकंपित झाला. काही तरी अद्भुत निसर्गतत्त्व या स्त्रावाच्या ठिकाणी आहे हे त्याने जाणलं आणि म्हणूनच आदिम काळातील अनेक यात्वात्मक (जादूटोण्यासदृश) क्रियांमध्ये स्त्रियांच्या मासिक धर्मातील स्त्रावाचा समावेश आहे. त्यांच्यासाठी स्त्री देहातून वाहणारा हा लाल, काळा, निळा स्त्राव म्हणजे एकाच वेळी तारक आणि मारक अशा दोन्ही शक्ती असलेला चैतन्य तत्त्व होता. यामुळेच तर आदिम काळातील पुरुष स्त्रीपुढे कायम दबलेलाच राहिला. म्हणूनच तेव्हा स्त्रीच कोणत्याही समूहाची, टोळीची प्रमुख होती.

नंतरच्या मानवी विकसनाच्या प्रक्रियेत मानवाला निसर्गाची कोडी सुटत गेली. त्यातही पुरुषाला निसर्गत आपल्या ठायी असलेल्या शक्तीची जाणीव झाली आणि मुख्य म्हणजे कालांतराने त्याने अनुभवाने बीज-क्षेत्र न्याय प्रस्थापित केला. म्हणजेच स्त्रीचं गर्भाशय हे क्षेत्र म्हणजे जमीन असून जर आपण त्यात आपलं (पुरुषाचं) बीज पेरलं नाही, तर त्यातून काही उगवणारच नाही याची त्याला जाणीव झाली आणि एकप्रकारे तो स्त्रीला दुय्यम लेखू लागला. केवळ स्त्रीलाच नाही तर ज्यामुळे गर्भधारणेसाठी आवश्यक अशी भूमी तयार होते त्या ऋतुस्त्रावालादेखील. विशेष म्हणजे फक्त दुय्यमत्व देऊन तो थांबला नाही, तर त्याने हा ऋतुस्त्राव म्हणजे नरकातली (आता तो नरक कुणी पाहिलाय कोण जाणे) घाण मानली. सर्जनशील असलेल्या स्त्रावाला तो विटाळ मानू लागला आणि त्या मासिक धर्माच्या काळातील स्त्रीला त्याने अस्पर्श्य-अपवित्र ठरवली. केवळ पुरुषांनीच लिहिलेल्या आपल्या धर्मग्रंथांनीही तेच प्रमाण मानलं आणि सांगितलंही. परिणामी तेच परंपरेचं जोखड आपण अद्याप आपल्या खांद्यावर वागवत आहोत.

हे जोखड आपल्या खांद्यावरून आपण आता तरी उतरवलंय का? तर याचं उत्तर शंभर टक्के हो असं कधीच देता येणार नाही. कारण कसलाही आगापिछा ठाऊक नसलेला परंपरेचा गाडा जसाच्या तसा खांद्यावर वागवायला आपल्याला आवडत असतं. आजही देशभरातील विविध मंदिरांत स्त्रियांना मासिक धर्माच्या काळात प्रवेश दिला जात नाही. शुभकार्यप्रसंगी त्यांचा वावर निषिद्ध मानला जातो. अगदी एखाद्या बहरलेल्या झाडाला स्पर्श करायलाही त्यांना मासिक पाळीच्या काळात बंदी घातली जाते. मग शनी-शिंगणापूरच्या शनीच्या ओटय़ावर चढण्यास स्त्रियांना बंदी. म्हणून स्त्रियांनाच आंदोलन करावं लागतं. एवढंच कशाला दिवंगत कवयित्री-लेखिका शांताबाई शेळके आळंदीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या, तेव्हा आळंदीतील प्रसिद्ध अजानवृक्षाच्या ओटय़ावर पुरुषांप्रमाणेच बसून पोथी वाचायला मिळावी म्हणून महिलांना आंदोलन करावं लागलं होतं. तेव्हा कुठे महिलांना त्या ओटय़ावर चढण्याची आणि तिथे पोथी वाचण्याची संधी मिळाली होती. महिलांना ती मुभा अजून आहे की नाही ठाऊक नाही. कारण एखाद्या चुकीच्या प्रथेच्या विरोधात आवाज उठवला, आंदोलन केलं की अनेकदा तेवढय़ापुरती मुभा दिली जाते. मात्र आंदोलनाचा आवाज शांत झाला, आंदोलनकर्त्यांची पाठ फिरली की पुन्हा जैसे थे सुरू राहतं.

हिंदुस्थानी लोकांची एक गंमत बघा, एकीकडे मुलीला मासिक पाळी सुरू झाली की ती स्त्री झाली, वयात आली म्हणून सोहळे-उत्सव केले जातात. मुलीला सजवून झोपाळ्यावर बसवून अगदी तिची साग्रसंगीत ओटी भरली जाते. कुणाला ते पूर्वीचे मुलगी ऋतुमती झाल्याचे सोहळे पाहून किंवा तेव्हाची वर्णनं वाचून वाटावं की, किती तो स्त्रीचा आणि तिच्या मातृत्वशक्तीचा सन्मान. पण प्रत्यक्षात तो सन्मान असतो तिच्या प्रसवा होण्याचा. ती आता मूल जन्माला घालू शकणार याचा. तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा वा सर्जनशीलतेचा नाही. अन्यथा याच समाजाने स्त्रीच्या मासिक पाळीचा आणि ऋतुस्त्रावाचा सन्मान नसता का केला?

हा सन्मान स्त्रीच्या आणि तिच्या मासिक पाळीच्या वाटय़ाला अजून आलेला नाही. आता काळाच्या ओघात स्त्रिया शिकल्यात, वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्व गाजवतायत, प्रसंगी पुरुषालाही मागे टाकून पुढे धावतायत. परिणामी त्यांचं त्यांनीच आपल्या मासिक पाळीचा बाऊ करणं आता सोडून दिलंय. म्हणजे त्या चार दिवसांत त्यांना दुखतं, खुपतंच. त्या काळात जरा निवांतपणा मिळाला तर त्यांना तो हवाही असतो, पण म्हणून त्या काही घरी बसत नाहीत. तसंही पूर्वी ज्या कष्टकरी महिला होत्या, त्या कधीच मासिक पाळीच्या दिवसांत घरी थांबलेल्या, बसलेल्या नव्हत्या. हातावर पोट म्हटलं की, त्यांना त्या मासिक धर्माच्या काळातही शेतात, रानावनात जावंच लागायचं. कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा नसतानाच्या त्या काळात महिला या मासिक शरीरधर्माला कशा सामोऱया गेल्या असतील कोण जाणे!

आता काळ बदललाय खरं, पण सर्जनशील मासिक पाळी आणि ती जिला येते त्या स्त्रीबद्दलची समाजाची मानसिकता बदललीय का? तर त्या बाबतीत समाजात अजूनही अळीमिळी गुपचिळीच आहे.

…आणि म्हणूनच आता स्त्रियांनीच मग त्या कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्तरातील असोत आपल्या क्षमतेची कवाडं उघडली पाहिजेत. ज्ञानाच्या, ताकदीच्या, क्षमतेच्या स्तरावर समाजपुरुषाला धोबीपछाड दिली पाहिजे. तशी उदाहरणं समाजात नसतातच असं नाही, फक्त त्यात वाढ व्हायला हवी. त्यासाठी काही प्रातिनिधिक उदाहरणं घेऊ या.

प्रसंग एक (स्थळ – पुणे)

धायरीहून स्वारगेटकडे जाणारी पीएमटीची बस. साधारणपणे दुपारचे अकरा-बारा वाजलेले. बस पूर्णपणे भरलेली. इतक्यात माणिकबागच्या स्टॉपला बस थांबते. एखाद-दोन प्रवासी उतरतात, तेवढेच चढतात. धावत जाऊन रिकाम्या झालेल्या जागा पकडतात. त्यांच्या पाठोपाठ आपल्या डोक्यावरचा देवीचा जग (देव्हारा) सांभाळत एक पोतराज समाजातील महिला बसमध्ये शिरते. वर्णाने काळी आणि शरीराने काहीशी धष्टपुष्ट. आधी इकडेतिकडे नजर टाकून जागा रिकामी आहे का बघते आणि जागा नसल्याचे बघून पीएमटीने बसच्या मध्यभागी मोकळ्या ठेवलेल्या मोठय़ा जागेत आधी डोईवरचा जग खाली ठेवते. नंतर बसच्या वेगाला सरावल्यावर उभ्याउभ्याच आपल्या नऊवारी लुगडय़ाचा कासोटा नीट करते. मग केस सोडून त्यांचा पुन्हा एकदा बुचडा बांधते. कपाळावरचे रुपयाएवढे कुंकू अंदाजानेच ठाकठीक करते. शेवटी डोईवरून पदर घेऊन देवीला नमस्कार करते. एवढं सारं झाल्यावर एक पाय मुडपून ती अशा काही टेचात त्या मोकळ्या जागेत खालीच बसते की, जणू काही ती संपूर्ण विश्वाची महाराणी असावी. बसमधले इतर प्रवासी तिच्या खिजगणतीतही नसतात. ती तिच्याच विश्वात मश्गुल असते. मात्र ती बसमध्ये चढल्यापासून साऱयांच्या नजरा तिच्यावरच एकटक रोखलेल्या. कारण तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वातूनच तिचं स्वातंत्र्य ओसंडून वाहणारं. खरं तर डोक्यावर देवीचा जग घेऊन आज इथे तर उद्या तिथे अशी रस्तोरस्ती भटकणारी ती. गरिबी आणि दैन्य तिच्या कायमच सोबतीला, पण तिचा आब नि तिची ऐट मात्र अलम दुनियेला आपल्या पदराला बांधून घेतल्यासारखी.

प्रसंग दोन (स्थळ – कोल्हापूर)

अंबाबाई मंदिराचा गजबजलेला परिसर. साधारण सकाळचा नऊ-दहाचा समय. म्हणजेच कामाला सुरुवात करण्याचा. साहजिकच मंदिराच्या आतबाहेर पर्यटकांची, भक्तांची आणि व्यावसायिकांची गर्दी. जो-तो गर्दीतून कशीबशी वाट काढत चाललेला. कुणी देवीचं वाण घेतंय, कुणी देवीसाठी फुलं नि प्रसाद घेतंय, तर कुणी मंदिराच्या बाहेर आपल्याला हव्या असलेल्या रोजच्या वापरातल्या वस्तू घेतंय. कुणाला कुणासाठी थांबण्यासाठी वेळ नाहीय. प्रत्येक जण आपल्या व्यापात आणि घाईत. संपूर्ण मंदिर परिसरालाच एक द्रुत लय प्राप्त झालेली. ठहराव म्हणून नाहीच आणि तेवढय़ात कुठून तरी जोराचे सूर कानावर पडतात, “ए भाडय़ा आता जातोस का गुमान? तुला काय आया-बहिणी नायत का? कवापासून पिरपिर लावलीय. वस्तू घ्यायची आसंल तर घे नायतर चालायचं बघ. उगाच भाव इचारत बसू नकोस. दर्शन घ्यायचंच आसंल तर त्या मंदिरातल्या देवीचं घे माजं नको.” त्यासरशी जणू त्या परिसरातला व्यवहार क्षणभर ठप्प होतो. साऱयांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळतात. छोटा दगडी पाटा-वरवंटा, खलबत्ता, जातं असं काहीबाही विकणारी एक पस्तीशीतली वडारीण महिला एकावर खेकसत असते. त्यासरशी काहीसा मध्यमवयीन असलेला तो तथाकथित सभ्य गृहस्थ कावराबावरा होऊन गर्दीतून काढता पाय घेतो. एखादी बाई असं चारचौघात काही बोलेल याचा त्याला मुळी अदमासच नसतो.

प्रसंग तीन (स्थळ – सातारा)

एकदा साताऱयाला गेलेलो असताना रस्त्याने एक बाई आपल्या मुलाला झोडत नेताना दिसली. तिच्या हातात उसाचं भरलेलं जड कांडं होतं आणि त्यानेच ती आपल्या वीसेक वर्षांच्या मुलाला झोडपत होती. तो मुलगा तिला प्रतिकार करायचा प्रयत्न करत होता, पण त्याला ते झेपत नव्हतं. तेव्हा रस्त्यानेच जाणारे तीन-चार जण मध्ये पडले आणि त्यांनी तिला अडवलं. तसंच मुलाला मारण्याचं कारणही विचारलं. त्या वेळी तिने दिलेल्या उत्तराने सगळेच अवाक् झाले होते. ती बाई म्हणाली, “हे बेणं दहा वर्षांचं हुतं तवा याचा बाप आम्हाला सोडून गेला. कुठं गेला, का गेला, कुणासाठी गेला काय बी समजलं न्हाय. नवरा सोडून गेला म्हणून सासू-सासऱ्यानं घराबाहेर काढलं. रानातल्या जमिनीचा एक तुकडा तोंडावर फेकला आणि तिकडंच राहा म्हनले. या पोराला घेऊन मी तिथं राह्यले. त्याला वाढवलं, स्वतलाही सांभाळलं. आता शिकून कॉलेजात जायला लागलाय, तर तेवढय़ात त्याचा बाप उपटला तिकडं घरी. आता त्या लोकांना माह्या लेकाची आठवण झालीय आणि वरचेवर याला बोलवायला लागलेत. आन् हा भाडय़ा पण तिकडं गुपचूप जायला लागलाय. एवढी वर्षं जिवाचं पाणी करून ह्ये पोर वाढवलं आणि आता ते त्यांना देऊ होय. मी त्यांना स्पष्ट सांगितलंय पुन्हा माझ्या पोराला बोलवाल व तोही तुमच्याकडं आला तर तुमचं आणि त्याचं सगळ्यांचं तंगडं तोडून हातात देईन. पण हे बेणं माझं ऐकत नाहीय म्हणून याला तिकडनं त्यांच्या घरूनच मारत मारत आणलंय” आणि सगळ्यांसमोर मारताना शेवटी तिनं लेकाला सगळ्यात भयंकर धमकी दिली. ती म्हणाली, “पुन्हा त्यांच्या घरी पाऊल ठेवलंस तर तुझी माय कायमची मेली असं समज. मी ही समजेन की आधी माझा नवरा गेला आणि आता मुलगाही.”

कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करणं हा ग्रामीण भागातील महिलांचा स्थायी भाव आहे. सुख-दुःख या साऱया गोष्टींकडे त्या काहीशा तटस्थपणेच पाहतात. परिणामी कोणत्याही सुखाने त्या अगदी भारावूनही जात नाहीत वा कोणत्याही दुःखाने त्या कोलमडूनही पडत नाहीत. याचा अर्थ त्या कोरडय़ा असतात असा नव्हे, तर परिस्थितीने त्यांना शहाणं केलेलं असतं. त्यांच्या शरीराला आणि मनालाही भक्कम केलेलं असतं. खरं तर वरील शब्द उच्चारताना त्या मायबाईच्या उरात कोणती उलघाल झाली असेल ते तिचं तिलाच ठाऊक.

ही तीनही उदाहरणं काहीशी ग्रामीण आणि निमशहरी भागातील झाली. परंतु मुंबईसारख्या शहरात तर शिकल्या-सवरलेल्या बाया क्षणोक्षणी कधी परिस्थितीशी, कधी कुटुंबाशी, कधी समाजाशी लढत असतात आणि तरीही जगत असतात. मात्र बाई गावाकडची असो वा शहरातली समाजपुरुष कायमच त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पुरुषाच्या या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवण्यासाठीच स्त्री-मुक्ती किंवा स्त्रीवादाची चळवळ जगभर सुरू झाली. या चळवळीच्या मुळाशी पुरुषाने, समाजाने स्त्रीचे माणूस म्हणून अस्तित्व मान्य करणे, तिचे कृती-उक्तीचे स्वातंत्र्य स्वीकारणे हाच हेतू आहे. तसंच तिने आर्थिकदृष्टय़ा सक्षम होणं हाही उद्देश आहे. मात्र ही चळवळ प्रत्येकीपर्यंत पोहोचेलच असं नाही. तेव्हा प्रत्येकीने निसर्गाने जन्मजात दिलेली बाईपणाची ताकद ओळखली पाहिजे आणि ती वापरली पाहजे. अर्थात आपल्याकडे स्त्रीमुक्ती किंवा स्त्रीवाद पूर्वी नव्हताच काय? तर जरूर होता, पण तो संकल्पनात्मक स्वरूपात नव्हता. त्याची संरचनात्मक मांडणी कुणी केलेली नव्हती. संत स्त्रियांपासून ते गावोगावच्या आयाबहिणींनी तो जगण्यात थेट रुजवला होता. संत जनाबाईंनी जेव्हा विठोबाला ठासून सांगितलं होतं की,

डोईचा पदर आला खांद्यावरी,
भरल्या बाजारी जाईन मी
जनी म्हणे देवा झाले मी येसवा,
रिघाले केशवा घर तुझे…

तेव्हा तो स्त्रीमुक्तीचा आत्मस्वरच होता. म्हणजेच समाजपुरुषाला वाटतं म्हणून कायम डोईवरचा पदर डोईवरच घेऊन शांत बसणाऱ्या त्या स्त्रिया नव्हत्या. आपला हक्क मागणाऱया होत्या. तोही केवळ घरादाराच्या संपत्तीतला नाही, तर आपला हक्काचा शरीरसुखातलाही.

काहीएक वर्षांपूर्वी कामासाठी कोकणातल्या एका गावी गेलो होतो, तर तिथे भरदुपारी गावच्या मंदिरात स्त्री-पुरुषांसह गावाची सभा बोलावलेली. ज्यांच्याकडे कामासाठी गेलेलो ते मलाही सोबत गेऊन गेले. सभेचा विषय काय तर एका महिलेने आपल्या नवऱयाकडे काडीमोड मागितलेली. विषय नाजूक असल्यामुळे सारा गाव सभेला लोटलेला. नवरा-बायकोला एकमेकांसमोर उभं केलेलं. नवऱयाला वाटले गावाने काडीमोडाचे कारण विचारल्यावर एवढय़ा लोकांसमोर आपली बायको काही बोलणार नाही. घाबरून गळाठून जाईल आणि मग विषय तिथेच संपेल. येईल पुन्हा नांदायला. परंतु प्रत्यक्षात तसं घडलं नाही. गावाने कारण विचारल्यावर ती बाई न घाबरता थेटच म्हणाली, “माझा नवरा स्वभावानं चांगला हाय, मला चांगलं वागवतो. खायला-प्यायला काहीही कमी करत नाही. पण एवढय़ानं शरीराची भूक भागत नाय नव्हं. ती भागत असती तर माझी काय पण तक्रार नव्हती.”

एवढय़ा लोकांसमोरचं तिचं हे थेट बोलणं जमलेल्या सगळ्यांना चक्रावून गेलं. गावातल्या बऱयाच जणांना याची आधीच कल्पना होती, पण ती थेट बोलेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण ग्रामीण स्त्री होता होईल तो शांत बसते. प्रसंगी सहनही करते. मात्र वेळ येताच तुकडा पाडायला कमी करत नाही. इथे तिचा स्त्रीवादच तर असतो. आपल्या हक्काची झालेली जाणीवच त्या ठिकाणी असते.

वेळ आलीच तर डोईवरचा पदर कंबरेला खोचून घराबाहेर पडणाऱ्या अशा महिलांची ग्रामीण भागातच नव्हे तर शहरांतही कमी नाही आणि हे आत्ता नाही तर पूर्वापार चालत आलंय. नवरा मेला तर त्याच्यामागे त्याची बायको कंबर कसून उभी राहते नि मुलांना वाढवते. मात्र बायको आधी गेली तर तिच्यामागे संसाराचा गाडा हाकताना पुरुषाच्या मात्र नाकी नऊ येतात.

शेवटी बाईपण भारी असतंच, फक्त ते निभावता आलं पाहिजे. बाईला आपली ताकद ओळखता आली पाहिजे आणि वेळप्रसंगी वापरताही आली पाहिजे!

[email protected]
(लेखक लोककला, साहित्य, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत.)

x