मन से कोई बात छुपे ना…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलांबरी जोशी

गाजलेल्या ‘अंधाधुन’ चित्रपटाचा दिग्दर्शक श्रीराम राघवन याला आयुष्यातला काही काळ तोतरेपणाचा त्रास होता. ‘मसाला डोसा’ असा शब्द म्हणताना आपल्याला ‘म’ म्हणायचा आत्मविश्वास नसल्यानं आपण ‘इडली सांबार’ मागवायचो असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

नुकत्याच गाजलेल्या ‘अंधाधुन’ चित्रपटाचा दिग्दर्शक श्रीराम राघवन याला आयुष्यातला काही काळ तोतरेपणाचा त्रास होता. “मसाला डोसा’’ असा शब्द म्हणताना आपल्याला “म’’ म्हणायचा आत्मविश्वास नसल्यानं आपण “इडली सांबार’’ मागवायचो’’ असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण त्याचा हा तोतरेपणा “एक हसीना थी’’ हा चित्रपट बनवताना गेला. “वर्गात माझा हात उत्तर द्यायला कधीही वर नसायचा. पण आता मला स्टेजवर काही बोलायला सांगतात.. मी उठतो आणि जाऊन बोलून येतो.. !’’असंही राघवनचं म्हणणं आहे.

अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींना तोतरेपणाचा त्रास होता. त्यात बॉलिवूडमधलंच एक नाव आहे हृतिक रोशन..! उदाहरणार्थ दुबईमधल्या एका पारितोषिक वितरण समारंभात “आय लव्ह यू दुबई’’ असं मोठय़ा आवाजात संबोधायची त्याची इच्छा होती. पण “दुबई’’ असा उच्चार त्याला जमत नव्हता. त्याचा सराव करायचा तर योग्य ठिकाणही त्याला कुठे सापडत नव्हतं. अखेरीस हॉटेलमधल्या खोलीतल्या एका मोठय़ा कपाटात स्वतःला कोंडून घेऊन हृतिकनं “दुबई’’ असं म्हणायचा सराव केला. मग समारंभात त्याला सहजपणे तो शब्द म्हणता आला. हृतिकनं तोतरेपणावर मात करण्यासाठी लहानपणापासून “स्पीच थेरपी’’ घेतली होती. आजही तो आपल्या आवाजासाठी रोज मेहनत घेतो. विशेष म्हणजे हृतिकनं अनेकदा हे जाहीररीत्या कबूल केलं आहे. तसंच तोतरेपणावर मात करण्याच्या प्रकल्पांसाठी हृतिक रोशन सढळ हातानं आर्थिक मदत करत असतो.

जॅक वेल्श या मॅनेजमेंट गुरूनं “जनरल इलेक्ट्रिक’’ या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये साधा केमिकल इंजिनीअर म्हणून करिअर सुरू केलं आणि तो तिथे सीईओ या पदापर्यंत पोचला. जीईची बाजारपेठेतली व्हॅल्यू त्यानं 1200 कोटी डॉलर्सपासून 28000 कोटी डॉलर्सपर्यंत नेऊन पोचवली होती. अशा जॅक वेल्शला लहानपणी तोतरेपणाचा त्रास होता. तसंच तो लहानखुरा असल्यामुळे त्याला वर्गात कायम डावललं जायचं. तोतरेपणावर मात करून सर्वोच्चपदाला पोचलेल्या व्यक्तींमध्ये वेल्श हे आदर्श उदाहरण आहे.

चारचौघांत बोलता न येणं याला तोतरेपणा हे एकच कारण नसतं. “इंग्लिश विंग्लिश’’ या चित्रपटात याचं एक उत्तम उदाहरण दिसतं. यात श्रीदेवीनं रंगवलेल्या व्यक्तिरेखेला इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसतो. तेव्हा न्यूयॉर्कमध्ये हॉटेलमध्ये जाऊन साधी एक कप कॉफी मागताना तिची खूप तारांबळ उडते. पण नंतर ती इंग्रजी शिकायला जाते. तेव्हा “मिठाईचा व्यवसाय करणारी एक उद्योजिका’’ अशी तिची ओळख इंग्रजी शिकण्याच्या वर्गात करून दिली जाते. यानं तिचा आत्मविश्वास वाढतो. मग एकदा कॉफी मागवताना ती प्रतिक्षिप्तपणे सहजगत्या दोनतीन वाक्यं इंग्रजी भाषेत बोलते.

आपल्या चिकाटीनं गगनाला गवसणी घालणाऱया व्यक्तींमध्ये एक नाव आहे अभिताभ बच्चन! अभिताभच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात आकाशवाणीनं आवाज चांगला नाही म्हणून अभिताभला नाकारलं होतं. आज जगभरात त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या विशिष्ट आवाजासाठी तो गाजतो आहे.

‘‘इक्बाल’’ या हिंदी चित्रपटातला इक्बाल आपल्या जिद्दीनं आपल्या मुकेपणावर मात करून भारतीय क्रिकेट संघात सामील होण्यापर्यंत मजल मारतो. तसंच “डिस्लेक्सिया’’ या विकारानं ग्रस्त असलेला इशान अवस्थी “तारे जमीं पर’’ या चित्रपटामध्ये त्याच्या कलागुणांना वाव दिल्यावर उत्कृष्ट चित्रं तर काढतोच. पण शाळेतलं शिक्षणही त्याला जमायला लागतं.

या सगळ्याचं कारण म्हणजे मानसिक ताणतणावांचा शरीरावर होणारा परिणाम. एखाद्या व्यक्तीची आपल्याला एखादा शारीरिक आजार असल्याची तक्रार असते. पण जर त्या आजाराला वैद्यकीय चाचण्यांमधून काही पुरावा मिळत नसेल तर बऱयाचदा त्या आजाराला मानसिक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, एका महिलेला आपल्याला अंधत्व आल्यासारखं वाटत होतं. प्रत्यक्षात तिच्या मुलाच्या मोटारगाडीला तिच्या डोळ्यादेखत अपघात होऊन तो मुलगा मरण पावला. मुलाच्या मृत्यूची भयावह घटना पाहिल्यानंतर आता आयुष्यात परत काहीच पाहायची तिची इच्छा संपली होती असा तिच्या अंधत्वाचा अर्थ होता. तिला खरोखर अंधत्व आलेलं नव्हतंच.

या महिलेप्रमाणे ज्यांच्या मनात प्रचंड ताण, अस्वस्थता, भीती, राग, दुःख, शरम अशा भावना लपलेल्या असतात त्यांचा आत्मविश्वास खच्ची झालेला असतो. त्यांच्या शिक्षणावर आणि करिअरवर याचा नकारात्मक परिणाम होत राहातो.

आपल्या शरीरावर नकारात्मक भावनांचा परिणाम कसा होतो? जर आपल्याला भीती, राग किंवा अशा प्रकारच्या ताण वाढवणाऱया भावना जाणवत असतील तर ते विचार मेंदूच्या लक्षात येतातच. त्यानंतर मेंदूत जी रसायनं स्रवतात त्यांचा आपल्या प्रतिकारशक्तीवर प्रतिकूल परिणाम होतो. अशा भावना वारंवार आल्या तर प्रतिकारशक्ती खालावत जाऊन आपण वारंवार आजारी पडतो. यामुळेच सकारात्मक विचारसरणीचे लोक नकारात्मक विचारसरणीच्या लोकांच्या तुलनेत कमी वेळा आजारी पडतात.

याचं एक वास्तव उदाहरण ‘ऍनॉटॉमी ऑफ ऍन इलनेस’ या पुस्तकात वाचायला मिळतं. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमधल्या विद्यापीठातले एक प्राध्यापक कझिन्स यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. कझिन्स हे ‘बायोकेमिस्ट्री ऑफ ह्यूमन इमोशन्स’ या विषयावर संशोधन करत होते. सकारात्मक विचारसरणी आणि दुसऱयाशी स्नेहपूर्ण वागणं ही कझिन्स यांची वैशिष्टय़ं होती. पण अँकिलॉसिंग स्पाँडिलायटिस (Ankylosing Spondylitis) या दुर्धर आजारानं त्यांना ग्रासलं. कझिन्स या आजारातून वाचतील याची आशा डॉक्टरांनी जवळपास सोडली होती. पण कझिन्स यांनी बरं होण्यासाठी स्वतःच एक वेळापत्रक आखलं. ‘दहा मिनिटं पोट धरून हसलं तर ऍनास्थेशियासारखा परिणाम होऊन पुढचे दोन तास मी वेदनारहित अशी शांत झोप घेऊ शकत होतो. तसंच हसण्याचा ऍनास्थेशियासारखा परिणाम ओसरला तर मी प्रोजेक्टरवर सकारात्मक, आनंदी आणि विनोदी चित्रपट पहायचो’ असं आपल्या पुस्तकात कझिन्स म्हणतात. नंतरच्या काळात कझिन्स यांना हृदयरोग झाला. तेव्हाही कझिन्स यांनी व्यायाम, व्हिटॅमिन्सचा योग्य वापर, स्वतःच्या बागेत उगवलेल्या ऑरगॅनिक भाज्या/फळं आणि मुख्य म्हणजे आनंदी मनोवृत्ती या गोष्टींचा वापर करून त्यावर मात केली होती…!

[email protected]