बी पॉझिटिव्ह – रंगभूमीची जादू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उषा राव या मुंबईत राहणाऱया एक साऊथ इंडियन मॅडम 1996 साली ‘ऑल द बेस्ट’ नाटक बघून भेटायला आल्या होत्या. त्या इतक्या भारावल्या होत्या की, नाटकाची, माझी स्तुती करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांचं प्रेम पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. दोघांचेही डोळे पाणावणारी ही आमची पहिली ओळख सांगताहेत नाटय़दिग्दर्शक, लेखक देवेंद्र पेम.

अत्यंत साध्या, सुस्वभावी, प्रेमळ स्वभावाच्या उषा मॅडमशी पुन्हा भेट होईल असं तेव्हा वाटलं नव्हतं, पण काही दिवसांनी त्यांनी मला घरी जेवायला आमंत्रित केलं. हळूहळू त्यांच्याशी, त्यांचे मिस्टर, दोन मुलं यांच्याशी छान मैत्री झाली. ‘ऑल द बेस्ट’ त्यांनी अनेकदा पाहिलं. एवढय़ावरच त्या थांबल्या नाहीत. त्यांच्या घरात त्यांनी मला नाटकाच्या तालमीसाठी जागा उपलब्ध करून दिली. अनेक एकांकिकांच्या तालमी मी त्यांच्या घरी केल्या. सर्वांचं चहा, नाश्ता, जेवण त्याच बघायच्या. भरत जाधव, माधवी जुवेकर, सुहास परांजपे, अतुल काळे अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी तालमी केल्या आहेत. माझी दिग्दर्शनाची शैली पाहिल्यानंतर त्यांनी मला अभिनय शिबीर घेण्याचे सुचवले. मी म्हणालो, मला असं शिबीर घेण्याचा अनुभव नाही. मुलांना तालमीत शिकवणं होतं. उषा मॅडम म्हणाल्या, ‘‘देवेन, तुम अच्छा सिखा सकते हो. वो टॅलेंट तुम मे है!’’ हे बोलून गुजरातमधील एका प्रख्यात शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी माझी अभिनयाची कार्यशाळा ठेवली. मी त्यांना म्हटलं, इंग्लिश मीडियम शाळेत कार्यशाळा घ्यायची तर फाडफाड इंग्लिश बोलायची कार्यशाळा आधी मला करावी लागेल. त्यावर ‘‘ऑल द बेस्ट’ आप हीने लिखा है ना?’’ असं त्यांनी मला तोंडावर विचारलं. मग म्हणाल्या, ‘‘ऑल द बेस्ट’ मे कम्युनिकेशन प्रॉब्लेम ही है ना? गुजराती, हिंदी, इंग्लिश, सिंधी, कन्नड ऐसे कई भाषाओ मे ‘ऑल द बेस्ट’ आपने डायरेक्ट किया. तब वो भाषा बोलने आती थी क्या?’’ मग काय… गेलो गुजरातला. 50 विद्यार्थी आणि शिक्षकांचं

ऑक्टिंग वर्कशॉप घेतलं. अत्यंत यशस्वी झालं. भाषेचा अडथळा झाला नाही. कलेची भाषा जगात सारखीच असते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. या कार्यशाळेतून त्यांना जे मिळालं त्यापेक्षा कितीतरी जास्त मला मिळालं. विविध वयोगटांतील अनोळखी विद्यार्थ्यांना अभिनय करण्यासाठी आत्मविश्वास देण्याचा आत्मविश्वास! त्यातूनच मग ‘ऑल द बेस्ट’ अकॅडमीची स्थापना झाली.

लिखाण, दिग्दर्शन यातून वेळात वेळ काढून मी आजही कार्यशाळा घेत असतो, पण याची सुरुवात उषा मॅडमनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे झाली. आजही त्यांचे फोन येतात. नाटकाचा फक्त एक प्रयोग बघून एका रसिक प्रेक्षकाचं लेखक, दिग्दर्शकाशी तयार झालेलं हे नातं आज 27 वर्षांनंतरही तसंच घट्ट आहे. हा रंगदेवतेचा आशीर्वाद आहे, हीच रंगभूमीची जादू आहे! मी अभिमानाने सांगतो, ‘ऑल द बेस्ट’ नाटकाने मला फक्त नाव, मानसन्मान, पैसा नाही मिळाला, तर पुलंची पाठीवर थाप आणि उषा राव मॅडमसारख्या लाखो रसिकांच्या हृदयात प्रेमाची जागा मिळाली!

संकलन : निनाद पाटील