शिवमंदिरांच्या राज्यात – यादवकालीन स्थापत्याचा वारसा

>> नीती मेहेंदळे

सोलापूर-सातारा सीमेवरचं वडूजहून नऊ किमीवरचं गुरसाळेचं रामेश्वर / रामलिंग, खटावच्या नागनाथवाडीचं नागनाथ आणि कातरखटावमधलं कात्रेश्वर ही अशीच स्वतंत्र तरीही एकमेकांना बांधलेली देवालयं आहेत. यादवांचा सिंघणराजा आणि त्यांचा काळ महाराष्ट्रात अनेक मंदिरं उभारत गेला. हा इथला वैभवाचा काळ म्हणायला हरकत नाही.

काही स्थापत्य त्रिकुटं एकमेकांजवळ राहणं पसंत करतात. वर्षानुवर्षं, शतकानुशतपं. युगानुयुगं. त्यांची निर्मिती समान कालात झालेली असते हा त्यांचा एक जोडणारा दुवा असतो. साताऱयात खटाव तालुक्यात आणि सातारा-सोलापूर सीमेवर अशी मिळून तीन देखणी देवालयं आहेत जी स्वतंत्र पाहिली गेली आणि नंतर त्यांच्या स्थापत्याचा निर्मितीकाल व इतिहास समजला तेव्हा दुवे आपसूक जोडले गेले.

पूर्वी खटाव हे गावच तालुक्याचे मुख्य ठिकाण होते. गावात दिवाणी व फौजदारी न्यायालय होते. भौगोलिकदृष्टय़ा खटाव हे तालुक्याच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणी आहे. खटाव हे प्राचीन ठिकाण असून गावाचे नाव खट आणि वांग ऋषींच्या नावावरून पडले आहे अशी आख्यायिका आहे. खटाव हे पूर्वीच्या वाई देशाचे महत्त्वाचे ठाणे होते. खटावमध्ये यादवकालीन हेमाडपंथी मंदिरे आहेत. गावात एक ऐतिहासिक भुईकोट किल्लाही आहे. त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कराड, वाईप्रमाणे खटाव गावचाही इतिहास खूप जुना आहे.

खटाव येथील मंदिरांचं एक समान वैशिष्टय़ म्हणजे काळ साधारण 1210 नंतरचा व मंदिरांवरची शिल्पकला. काही चिकित्सक त्यातल्या कामशिल्पांची तुलना खजुराहोच्या मंदिरांतील शिल्पांशी करतात. सांगायचा उद्देश हा की, इतकी ती रेखीव आहेत. दुर्दैवाने त्यांची खजुराहोसारखी निगा व दखल मात्र घेतली गेलेली दिसत नाही.

ही सगळी मंदिरं वडूज, साताऱयातील गावापासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत. ही मंदिरं तांत्रिक उपासना सांप्रदायाचा प्रभाव असणाऱया काळात उभारली गेली असावीत असा एक मतप्रवाह सांगतो. पण मिथुनशिल्पं हे शिल्पशास्त्रात समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणून मंदिरांच्या भिंतींवर कामशिल्पं कोरलेली दिसतात. तांत्रिक उपासनेतील मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा व मैथुन या पाच गोष्टींना मिळून जी पंचमकार संज्ञा निर्माण होते त्यापैकी मैथुन या उपासनामार्गाचे शिल्पांकन साताऱयातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते.

गुरसाळेतील पुष्करणी वैशिष्टय़पूर्ण आहे. तिथलं रामेश्वर मंदिराचे छत मोठय़ा दगडी शिळांचे बनलेलं आहे. बाजूच्या भिंती आतून-बाहेरून सपाट आहेत, तर दर्शनी बाजू मात्र सालंकृत आहेत. मंदिराच्या बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, नक्षी, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सुरेख सजवल्या आहेत. यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात मिथुन शिल्पे, वेगवेगळ्या कामक्रीडांचे चित्रण असलेली शिल्पे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पुष्करणी लक्ष वेधून घेते. हे या मंदिरांचे आणखी एक सुंदर वैशिष्टय़. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायऱयांची रचना केलेले पुंड. रामलिंगची पुष्करणी तशी मोठी आणि आकर्षक रचनेची आहे.

कातरखटाव येथील कात्रेश्वर मंदिराची रचनादेखील गुरसाळ्याच्या रामेश्वर मंदिरासारखीच आहे. फक्त याच्या समोरील पुष्करणी देवळाच्या समोर नसून थोडी बाजूला आहे. कात्रेश्वराच्या मंदिराची व पुष्करणीची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील शिल्पपटाचेदेखील नुकसान झाले आहे. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे इथे असणारा कन्नड शिलालेख. तोदेखील भग्न अवस्थेत आहे. हजार एक वर्षांच्या इतिहासाच्या मूक साक्षीदार असणारे वीरगळ, भग्न मूर्ती मंदिर परिसरात उघडय़ावर विखरून पडल्या आहेत. त्यांची दखल घ्यायला हवी.

याच कालखंडातलं खटावच्या नागनाथवाडी या छोटय़ा खेडेगावात नागनाथाचे सुरेख यादवकालीन मंदिर आहे. मंदिराबाहेर मोठा कोरीव नंदी लक्ष वेधून घेतो. मंदिरात तुटलेल्या अवस्थेत रंगशिळा दिसते. तसेच सप्तमातृकांचे एक अखंड शिल्प देवकोष्ठात दिसते. अनेक खांबांच्या रचनेमुळे देवळाला एक निश्चित मजबुती मिळालेली दिसते.
z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या