मुद्दा – नैसर्गिक संपदा वाचवण्याची हीच वेळ!

>> पद्माकर उखळीकर

वसुंधरा एक दिवस मानवाला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण मानवाच्या अवास्तव विकासाच्या कल्पना त्यालाच घातक ठरणार आहेत. त्यामुळे मानवाने एकत्रित येऊन ‘एक पृथ्वी एक मानव’ या संकल्पनेनुसार स्वतःचा विकास करावा आणि जगाचाही. वसुंधरेला हवा असलेला विकास मानवाने केला पाहिजे. नैसर्गिक संपदा ही पृथ्वीच्या सौंदर्यात भर घालत असते आणि ते सौंदर्य आपण आपल्या सौंदर्यासाठी नष्ट करू पाहत आहोत असे म्हटले तर त्याची सुरुवात बहुधा झाली असावी. कारण पृथ्वीवरील तापमान वर्षानुवर्षे वाढत आहे. त्याची झळ सबंध मानवाला बसत आहे. पृथ्वीचं सौंदर्य म्हणजे वनस्पती, सूक्ष्म जीव, माती, खडक, पठार, पर्वत, वातावरण. या नैसर्गिक संपदा वाचल्या तर मानवप्राणी वाचेल अन्यथा या सौंदर्याबरोबर बुद्धिमान प्राणी असलेला मानव नष्ट होईल, पण ही परिस्थिती खुद्द मानवानेच आपल्यावर ओढवली आहे. त्यामुळे पृथ्वीचे वयोमान मानव स्वतःच्या वयोमानासह घटवतो आहे ही साधीसरळ बाब आपल्या लक्षात येऊनही आपण टाळतो. याला अतिबुद्धिवान मानव म्हणावे? ‘अति तिथे माती’ हे अटळच. त्यामुळे मानवाने वेळीच नैसर्गिक संपदा वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण पर्यावरण रक्षणाच्या गप्पा मारतो, पण झाडांची कत्तल थांबवू शकलो का? लाकूड वापरासाठी झाडांची आवश्यकता असली तरी झाडे लागली तर त्याचा परिणाम दिसून येणार नाही. सद्यस्थितीत पृथ्वीवर लोकांना पूर्णपणे नैसर्गिक वातावरण सापडत नाही. महानगरातील वातावरणात शुद्ध हवा किती मिळते? हा प्रश्न.

हवा आणि पाण्यात प्लॅस्टिक आणि इतर रसायनांमुळे होणारे प्रदूषण झाल्याने पृथ्वी अस्वच्छ होते. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होते. पृथ्वीला वेढून असलेला वायूंचा थर, ज्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायूंचा समावेश आहे. आपण जर सतत पर्यावरणाला बेदखल करत असू तर पर्यावरण आपल्याला बेदखल केल्याशिवाय राहणार नाही हे कटू सत्य. खडक, माती आणि खनिजे यांचा वापर आपण वारेमाप पद्धतीने करतोय. खडकाला धडका देऊन नष्ट करतोय. खडकसुद्धा पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सौंदर्य आहे. पृथ्वीचं जलमंडल हे सजीवांच्या जीवांसाठी जीवन. त्याचा वापरही वारेमाप होत आहे. पृथ्वीवरील पाण्याचे स्वरूप, ज्यात समुद्र, नद्या, तलाव, बर्फ आणि जमिनीतील पाणी यांचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती आणि इतर नैसर्गिक घटक सजीवांना जगण्यासाठी आवश्यक आहेत. त्यावर स्वतःहून कुऱहाड चालवण्याचा मूर्खपणा आपण करत आहोत?

वनस्पती आणि प्राणी अन्न आणि पाण्याचे स्रोत पुरवतात, जे सजीवांच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आर्थिक आणि सामाजिक विकास साधता येतो, जसे की शेती, पर्यटन आणि ऊर्जा उत्पादन, पण या साधनांचा वापर विचारपूर्वक केला तर भविष्यात अधिक विकास साधता येईल. पृथ्वीवरील पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मानवाच्या क्रियाकलापांमुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत आहेत. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करणे, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि वनीकरण करणे आवश्यक आहे. पाणी, ऊर्जा आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करणे आणि पुनर्वापर करणे आवश्यक आहे. वन्य जीवांचे अधिवास सुरक्षित करणे, अवैध शिकार आणि व्यापार थांबवणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे महत्त्व आणि संरक्षणाची आवश्यकता याबद्दल लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे.

पृथ्वीचे वातावरण टिकून ठेवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करता येतील. यात कार्बन उत्सर्जन कमी करणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा यांसारख्या स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापर करणे. सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा चालत जाणे यांसारख्या पर्यायांचा वापर करणे. ऊर्जा वाचविणारी उपकरणे वापरणे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि पर्यावरणास हानीकारक कार्बन उत्सर्जन कमी करणे. उद्योग आणि कारखान्यांकडून प्रदूषण नियंत्रण उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे. प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, प्लॅस्टिक कचरा पुनर्वापर करणे आणि प्लॅस्टिक कचरा योग्य रीत्या व्यवस्थापित करणे. औद्योगिक आणि शेतीसंबंधित पाण्याचा वापर कमी करणे आणि पाण्याचा पुनर्वापर करणे. नैसर्गिक अधिवास आणि वन्य जीव वाचवणे. जास्तीत जास्त झाडे लावून कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करणे. पाण्याचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करणे. हवामान बदल आणि प्रदूषण याबद्दल लोकांना जागरूक करणे.स्थानिक स्तरावर पर्यावरण संवर्धन कार्यक्रम आयोजित करणे. मजबूत पर्यावरण धोरणे आणि कायदे बनवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. याव्यतिरिक्त, आपण आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा वाचवणे, कचरा कमी करणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे आणि पुनर्वापर करणे यांसारख्या गोष्टी करू शकतो. या साध्या उपायांमुळे आपण पृथ्वीचे पर्यावरण टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो.