
>> प्रदीप निफाडकर
वृत्तानुसार बोट हलवत ऐकविण्याची इलाही जमादार यांची स्वतःची एक शैली होती. गझल मराठीत गणवृत्तात लिहिली जाते. क्वचित मात्रा वृत्तात. पण इलाही यांनी बहुतांशी गझला मात्रा वृत्तात लिहिल्या. एखादी ओळ सुचली की त्याचे वृत्त पाहायचे आणि त्याच अंगाने शेवटपर्यंत जायचे, ही सोपी पद्धत त्यांनी अंगिकारली होती. उर्दू गझलेचा पूर्ण समुद्र मराठीत यावा असे त्यांना वाटत होते. त्यामुळे कधीकधी त्यांनी उर्दू गझलेची रुपांतरे मराठीत केली. त्यांना बाकी कसली नव्हती, तरी माणसांची भूक होती. गझलेची तहान होती. ते एक गझलेने झपाटलेले झाड होते.
रहता नहीं इन्सान तो मिट
जाता है गम भी
सौ जाएँगे इक रोज जमीन
ओढ के हम भी
– एहसान दानिश
(जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याच्यासोबत त्याची व्यथाही जाते. आपणसुद्धा एक दिवस या जमिनीला ओढून कायमचे झोपणार आहोत.)
येणारा माणूस जाणार ही जगरहाटी आहे. त्यामुळे इलाही गेला आणि त्याच्यासमवेत त्याचे दुःखही गेले. नुसते दुःख एकटे जात नाही. ते सोबत त्याचे मैत्र आणि त्याचे वैरही घेऊन जाते. आता सारेच संपले आहे. आता फक्त त्या आठवणी उगाळणेच आपल्या हाती असते. इलाही प्रथम भेटल्याची आठवण मला आहे ती साधारणतः 1978-79 मधली. तो नेहमीच साध्या कपडय़ात असायचा. पुढे त्याने नेहमीच सफारी परिधान केला. पण कधीही तो झब्बा-कुर्ता घालत नव्हता. तो भेटला (कै.) अनिल कांबळे यांच्यासोबत.आम्ही गझलेच्या वाटेवरचे सहप्रवासी. मग त्याच्या भेटी होत राहिल्या. मी व अनिल त्याच्या पाषाण येथील कार्यालयाजवळ सायंकाळी 5-6 वाजता जायचो आणि तो कामावरून बाहेर आला की जवळच्या टपरीवर चहा घेत एकमेकांना गझला ऐकवायचो. कधी ही मैफल अनिल कांबळे याच्या घराजवळच्या अभिनेता रुपेशकुमार यांच्या इराणी हॉटेलातही सुरू व्हायची. छान दिवस होते. दूरचित्रवाणी नव्हती. सायंकाळी सुरेख होत्या. पुढे नाशिकला मी फेब्रुवारी 2002 मध्ये गझल संमेलन घेऊन इलाहीला बोलावले होते. ते दुसरे संमेलन. पहिले मुंबईत झाले होते. त्याला इलाही नव्हता. तेव्हा त्याचे गझलगायक भीमराव पांचाळे यांच्याशी काही मतभेद झाले होते. पण मी हट्टाने इलाहीला नाशिकला बोलावले आणि माझ्या घरात दोघांचा अबोला तोडायला लावला. दोघांनी मोठेपणा दाखवला. वास्तविक, भीमरावने त्याचे पहिले पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी कष्ट घेतले होते. त्याच्या ‘अंदाज आरशाचा,’ ‘घर वाळूचे बांधायाचे’ वगैरे बऱयाचशा गझला गायल्या होत्या. माझ्या घरी हा अबोला इतका छान तुटला की, पुढच्याच वर्षी भीमरावने त्याला संमेलनाध्यक्ष केले.
नाशिकला एका गझलकाराला बोलवायचे व त्याच्या मनसोक्त गझला नाशिककरांना ऐकवायच्या मी ठरविले. तर इलाही म्हणाला, ‘‘पुढच्याच महिन्यात एक मार्चला माझा वाढदिवस येतो. तर मीच पहिला येतो’’. मी होकार दिला आणि त्याने नाशिककर रसिकांना तृप्त करून सोडले. त्याची ही दोन वैशिष्टय़े होती. एक भरपूर लिहायचे आणि भरपूर ऐकवायचे. सतरा दिवसांत पन्नास गझला लिहिल्याचे त्यानेच एका मुलाखतीत लिहिले आहे. वृत्तानुसार बोट हलवत ऐकविण्याची इलाही जमादार यांची स्वतःची एक शैली होती. गझल मराठीत गणवृत्तात लिहिली जाते. क्वचित मात्रा वृत्तात. पण इलाहीने बहुतांशी गझला मात्रा वृत्तात लिहिल्या. एखादी ओळ सुचली की त्याचे वृत्त पाहायचे आणि त्याच अंगाने शेवटपर्यंत जायचे, ही सोपी पद्धत त्याने अंगिकारली होती. उर्दू गझलेचा पूर्ण समुद्र मराठीत यावा असे त्याला वाटत होते. त्यामुळे कधीकधी त्याने उर्दू गझलेची रुपांतरे मराठीत केली. उदाहरणच द्यायचे तर बडोद्याच्या खलील धनतेजवी यांचा शेर आहे-
अब मैं राशन की कतारों में
नजर आता हूँ
अपने खेतों से बिछडने
की सजा पाता हूँ
त्याचे त्याने केलेले भाषांतर पाहा-
मी रेशनच्या रांगेमध्ये
उभा राहतो आता
शिवार विकून आल्याची
मी सजा भोगतो आता
किंवा
तुम्हारे शहर का मौसम
बडा सुहाना लगे
मैं एक शाम चुरा लूँ,
अगर बुरा ना लगे
हा कैसर उल जाफरी यांचा शेर. त्याने त्याचे भाषांतर केले-
मधुमासासम दरवळणारे
कळय़ाफुलांचे गाव तुझे
तुझ्या गावची रोज घ्यायची
खुडून संध्याकाळ मला
किंवा अंदलीब शादानी यांचा शेर आहे-
देर लगी आने में तुमको शुक्र है
फिर भी आये तो
आस ने दिलका साथ न छोडा
वैसे हम घबराये तो
त्याने तो मराठीत केला होता.
उशीर झाला तुला यायला
अखेर तू आलास तरी
तगमग झाली जरी जिवाची
तुटली नाही आस तरी
अर्थात हे सारे सर्वप्रथम गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहून सांगितले होते. पण इलाहीला वाटायचे की, उर्दूचा साराच खजिना आलाच पाहिजे. मराठीवर त्याचे इतके प्रेम होते. पण हे योग्य नसल्याने व तो चांगल्या गझला लिहीत असल्याने त्याने हे काम करू नये याविषयी मी त्याला नेहमी छेडायचो. अगदी त्याच्या घरी जाऊन बोलायचो. काही त्याच्या शिष्यांनी मात्र त्याचे कान भरले आणि आमच्यात दुरावा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या घरी मी न सांगताही जात होतो आणि तोही मैत्र जपून माझ्या मुलीच्या लग्नाला आला होता. त्याने कविता लेखनास 1964 मध्ये सुरुवात केली. जवळपास सोळा वर्षे तो लिहीत होता. पण 1980 मध्ये त्याला गझल सापडली आणि तो गझलेने झपाटलाच गेला. गझलेचे उर्दूत असलेले सारे प्रकार आणण्याचा त्याने चंगच बांधला होता. मग ते प्रकार उर्दूत आता वापरले जात नाहीत असेही प्रकार त्याने आणले. तमस, तुरबतसारखे उर्दू हिंदी शब्द मराठीत वापरत असे. कधी काफियासाठी तो मरण, सरण काफिया (यमक) आला तर त्यात कफन काफिया बसला नाही तर तो बिनदिक्कत कफण करे. कधी मात्रापूर्तींसाठी ‘अट्टाहास’चे ‘अट्टहास’ करीत असे. कित्येकदा त्याने जुन्या मराठीतील शब्दही वापरले. अगदी कशा(चाबूक)सारखे. जे साधारणतः लोकांच्या वापरातून गेले आहेत. कधी या झपाटलेपणामुळे त्याने –
एबीसीडी फॅशन झाली
बुरख्यामधली उघडी झाली
अशा हझलही लिहिल्या. गझलेत नवे, हवे, आसवे अशी यमके असतील तेव्हा अवे असेच यमक वापरणे बंधनकारक आहे. पण त्याने दुवेसारखे यमक वापरले पण गझल पूर्ण केली. खरे सांगायचे तर, इलाही जमादार यांच्या व्यथेला गझल नावाचे खेळणे मिळाले होते. कारण त्याच्या अगदी उमेदीच्या वयात त्याचे गावाकडचे घर वादळात उद्ध्वस्त झाले होते. सांगलीला असणारी पत्नी व मुलगा यांचे त्याच्या डोळय़ादेखत निधन झाले होते. आता जगायचे ते कुणासाठी म्हणून त्याने नोकरीत स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. त्याला निवृत्ती वेतन मिळत होते त्यात तो गुजराण करीत होता. पण त्यात त्याला वेगवेगळय़ा आजारांनी जर्जर केले. त्याला बाकी कसली नव्हती, तरी माणसांची भूक होती. गझलेची तहान होती. ते एक गझलेने झपाटलेले झाड होते.
(लेखक ज्येष्ठ गझलकार आहेत)
n [email protected]



























































