ठसा – डॉ. रा. द. लेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रदीप म्हात्रे

माणसाने आयुष्यभर विद्यार्थीदशेत असावे असे म्हटले जाते. अर्थात असे सहजी म्हटले जात असले तरी त्या तुलनेत तशी उदाहरणे तुलनेने कमीच आढळतात. हे सांगण्याचे कारण वयाच्या नव्वदाव्या वर्षी संस्कृत शिकायचे ठरवणाऱ्या डॉ. रा. द. लेले यांचे अलीकडेच निधन झाले. तेव्हा त्यांचे वय होते 94 वर्षे.

डॉ. रामचंद्र दत्तात्रेय ऊर्फ रा. द. लेले यांचा जन्म 16 जानेवारी 1928 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांची मातृभाषा मराठी होती, तरी त्यांचे बरेचसे शिक्षण उर्दू आणि इंग्रजीतून झाले. 1949 साली त्यांनी आधुनिक वैद्यकाची पदवी उस्मानिया विद्यापीठातून घेतली. त्यानंतर त्यांनी वर्गबंधूच्या समवेत ग्रामीण भागात पाच वर्षे काम केले. 1955 मध्ये दोन वर्षांकरिता पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. तेथून परतल्यावर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय सेवेत रुजू होणे पसंत करत संभाजीनगर, नागपूर व मुंबई या ठिकाणी रुग्णसेवा केली. संभाजीनगर येथे रुग्णसेवा करताना ते तेलगू भाषा शिकले.

औषधशास्त्राचे अध्यापक, विभागप्रमुख अशा विविध पदांवर करताना 1972 मध्ये त्यांची ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदी त्यांची नियुक्ती झाली. 1973 मध्ये मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अणुवैद्यक विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेथे त्यांच्या नेतृत्वाखाली अणुवैद्यक विभागाची स्थापना झाली. निवृतीनंतरही अनेक वर्षे ते जसलोक रुग्णालयासह इतर संस्थांशी सन्मान्य प्राध्यापक, सल्लागार अशा प्रकारे संबंधित राहिले, तर संशोधन, लेखन, प्रबोधन या माध्यमांतून सातत्याने कार्यरत राहिले. त्यांनी अणुवैद्यक क्षेत्रात केलेल्या मूलभूत कार्यामुळे अणुवैद्यक शास्त्रातले हिंदुस्थानी जनक म्हणून डॉ. लेले यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच निरनिराळय़ा उपचार पद्धतींचा लाभ आपण आज घेऊ शकतो.
त्यांचे सुमारे शंभर एक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ‘प्रिन्सिपल ऍण्ड प्रॅक्टिस ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन’, कॉम्प्युटर इन मेडिसिन व आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक, परस्युट ऑफ एक्सलन्स या पुस्तकांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया ‘गिफ्टेड टीचर्स ऍवॉर्ड’ (1991), पद्मभूषण पुरस्कार (1992), धन्वंतरी पुरस्कार (1997), होमी भाभा जीवन गौरव पुरस्कार यांचा विशेष करून उल्लेख करायला हवा.

2000 साली मुंबईत झालेल्या पस्तिसाव्या अ. भा. मराठी विज्ञान अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉ. रा. द. लेले यांनी भूषविले होते. त्यांच्या ‘आरोग्यम् धनसंपदा’ हे अध्यक्षीय भाषण अस्खलित मराठीत होते (यावरून शिक्षण उर्दूत झाले यावर विश्वास बसेना!). त्यात त्यांनी मांडलेल्या विचारांमध्ये डॉक्टर-रुग्ण संवाद आणि त्यातही भाषेचे महत्त्व यावर प्रामुख्याने भर होता. ‘बिस्तर चुभता है।’ हे उदाहरण ऐकून सभागृहात एकच हशा पिकला होता.

मराठीतून वैद्यकविषयक लिखाणाबाबतही त्यांना विशेष आस्था असल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवले. कारण मराठीतून वैद्यकीय लिखाण करणारे तज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय नियतकालिके आणि पुस्तके भरपूर संदर्भ होता.

वैद्यकशास्त्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल 2017 साली मराठी विज्ञान परिषदेने ‘सन्मान्य सभासदत्व देऊन त्यांचा गौरव केला. त्यावेळी व्यासपीठाशेजारी उभ्या असणाऱ्या माझ्या सहकारी मित्राला – अजय दिवेकर याला बीएमआय तपासण्यास सांगितले. इतके त्यांचे निरीक्षण सूक्ष्म होते.

“तुम्ही विचार करताना दीर्घायुष्य जगणार आहात असा करा! मात्र प्रत्यक्ष कृती करताना मात्र उद्या मरणार आहात अशा पद्धतीने करा!’’ या मतितार्थाची म्हण डॉ. लेले यांना विशेष आवडायची. मला वाटते, लेले सरांनी त्याचा प्रत्यक्ष अवलंब केला आणि त्यांच्या दीर्घायुष्याचे आणि सदैव कार्यरत राहण्याचे गुपित त्यात सामावले असावे.

[email protected]