प्रासंगिक – नवरात्रोत्सव

>> प्रज्ञा कुलकर्णी

सृष्टीतील आदिशक्तीच्या स्वरूपाच्या पूजनाचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव होय. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा नवरात्रोत्सव सर्व देशभर उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. शरद ऋतूच्या काळात हा उत्सव साजरा होतो म्हणून याला ‘शारदीय नवरात्र’ असेही म्हणतात. चातुर्मासाच्या काळात म्हणजे आषाढ ते आश्विन अशा चार महिन्यांच्या काळात सर्व देवदेवता निद्रिस्त असतात असे मानले जाते. या निद्रितावस्थेतून देवीला जागे करण्यासाठी ही देवीची पूजा केली जाते. आसुरी शक्तींचा प्रकोप जेव्हा वाढतो तेव्हा देवीशक्ती जागृत होते आणि आसुरी शक्तींशी युद्ध करून त्यांचा बीमोड करते. आसुरी शक्तींवरील देवीशक्तीचा हा विजयाचा उत्सव म्हणजेच नवरात्रोत्सव! ज्या ज्या दैवीशक्तींनी असे विजय प्राप्त केले त्यांचे नवरात्र साजरे होतात. राम, कृष्ण, दत्त, खंडोबा ही दैवते शक्तीची प्रतीके आहेत. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी, महालक्ष्मी ही देवीची सौम्य रूपे आहेत, तर दुर्गा, चंडी, कालभैरवी, चामुंडा, महाकाली ही उग्र रूपे आहेत. पृथ्वीतलावर महिषासुर नावाच्या असुराचा प्रकोप वाढला. तो प्रजेला त्रास देऊ लागला. प्रजेचे जीवन दुःसह झाले तेव्हा सर्व प्रजा देवांकडे गेली आणि महिषासुराचा वध करण्याची त्यांना विनंती केली. त्या वेळी सर्व देवांनी मोठा यज्ञ करून शक्तीला आवाहन केले. तेव्हा त्या यज्ञातून शक्तीचे म्हणजेच दुर्गादेवीचे रूप प्रकट झाले. दुर्गेने महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. हे युद्ध नऊ दिवस चालले. देवीच्या या विजयाचे प्रतीक म्हणून हा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा होऊ लागला. दुर्गेचे नऊ अवतार आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदा. दुर्गा म्हणजे शक्ती, सामर्थ्य, पराक्रम आणि प्राण हे शक्तीचे प्रमुख तीन अर्थ आहेत. सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाने या पराशक्तीचे रहस्य सांगताना म्हटले आहे,

मृदाविना कुलालश्च घटंकर्तू यथाक्षमः
स्वर्णेविना तथाहंच स्वसृष्टि कर्तुमक्षमः

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून नवरोत्सवाची सुरुवात होते. घट हे पृथ्वीचे प्रतीक आहे. आश्विन ऋतूमध्ये शेतात पिके तयार झालेली असतात. या काळात सारी सृष्टी धनधान्यांनी, फळाफुलांनी बहरलेली असते. ज्या धरणीच्या कुशीत बी-बियाणे रुजते, फुलते, फळते त्या काळय़ा मातीविषयी आणि ज्या धान्यावर आपले भरणपोषण होते त्या धान्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून सृजनत्वाचे पूजन करणे हाच यामागचा मुख्य हेतू आहे. भूमातेने दिलेल्या नव्या पिकांची पूजा करून नंतर त्याचे सेवन करणे हाच घटस्थापनेमागील मूळ उद्देश. घटासभोवताली पेरलेल्या नऊ प्रकारच्या धान्यांना नवव्या दिवसांपर्यंत अंकुर फुटतात. तरारून येणाऱया त्या अंकुरांवरून आगामी काळातील पिकं कशी आणि किती प्रमाणात येतील याचा अंदाज येतो, असा एक समज आहे. धान्याचे हे अंकुर विजयादशमीला देवाला वाहिले जातात.

आपला हिंदुस्थान देश शेतीप्रधान देश आहे. घटस्थापना म्हणजे शेतीचे महत्त्व जाणून घेणे होय. नवरात्रीत अखंड तेवणारा दिवा म्हणजे देवीप्रति असलेल्या भक्तीचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. ज्ञानोत्तर भक्तीनेच मनुष्य जन्माचे सार्थक होते म्हणून तो ज्ञानदिवा आहे. नवरात्र काळात केले जाणारे उपवास हे आरोग्यशास्त्र्ा आणि आहारशास्त्र्ााचे महत्त्व सांगणारे आहेत. या काळात श्रीसुक्त, दुर्गासप्तशती, देवी माहात्म्य अशा ग्रंथांचे वाचन, पारायण केले जाते. त्यामुळे आपल्याला मानसिक शांती आणि आरोग्य प्राप्त होते.

आपली प्रतिक्रिया द्या