
>> प्रांजल वाघ, [email protected]
शतकानुशतके आपलं सामरिक महत्त्व राखणारा दुर्ग तोरगळ हा प्रचंड भुईकोट. कल्याणी चालुक्यांच्या राजा भूताशय यानं तोरगळ येथे ही चौकीवजा गढी उभारत कदंब-चालुक्य शैलीतील भूतनाथाची 14 मंदिरं उभारली. आज त्यातील सहा अस्तित्वात आहेत.
मलप्रभा नदी ही कृष्णा नदीची एक उपनदी; पण या नदीच्या खोऱयात एकापेक्षा एक सरस दुर्गरत्न सापडतात! तोरगळ नावाचा एक प्रचंड असा भुईकोट त्यातलाच एक!
खरंतर 12व्या शतकापासून अस्तित्वात असलेला तोरगळ हा एक मिश्र-दुर्ग आहे. मलप्रभा नदीचं पात्र जिथे वळण घेते त्या ‘ण्’ आकाराच्या भूभागात वसलेला किल्ला हा भुईकोट आहे आणि उत्तरेकाद्तील टेकडीवरही याचे अवशेष सापडतात. चौकोनी आकाराचे तब्बल 32 बुरुज आज टेकडीवर भग्नावस्थेत आहेत. आठ दरवाजे आणि जवळपास 100 बुरुज असलेला हा प्रचंड दुर्ग शतकानुशतके आपलं सामरिक महत्त्व राखून होता.
इ.स. 1100-1187 दरम्यान कल्याणी चालुक्यांच्या राजानं- राजा भूताशय यानं तोरगळ येथे एक चौकीवजा गढी उभारली. तिथेच त्याने कदंब-चालुक्य शैलीतील भूतनाथाची 14 मंदिरं उभारली. आज त्यातील सहा अस्तित्वात आहेत. मलप्रभा नदीच्याच काठावर असलेल्या पत्तदक्कल आणि ऐहोळे येथील मंदिर पण याचं शैलीतील. पुढे या दुर्गावर सौंदत्तीचे रट्ट, देवगिरीचे यादव आणि विजयनगर यांची सत्ता राहिली. प्रत्येक राजसत्तेत किल्ल्याचा विस्तार होत गेला. 15व्या शतकात या परिसरावर आदिलशाहीची सत्ता बसली. बहुदा आज जे किल्ल्याचे महाद्वार आहे ते तेव्हा बांधलेले असावे. किल्ल्याच्या मागे EID Parry यांचा साखर कारखाना आहे. येथील दरवाजे चालुक्यांनी बांधलेले असावेत.
पुढे 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम आखली. जिवाजीराव शिंदे, अप्पाजी हुबळीकर आणि मालोजी भोसले या सरदारांना या परिसरावर सोडले. त्यांनी तोरगळ स्वराज्यात आणला. पुढे औरंगजेब दक्षिणेवर कोसळला. 1687मध्ये त्याने 400 वर्षं टिकलेली आदिलशाही गिळंकृत केली तेव्हा तोरगळ मुघलांकडे गेला. पण 1690 मध्ये नरसोजीराव शिंद्यांनी तोरगळ पुन्हा स्वराज्यात आणला. छत्रपती राजाराम महाराजांनी यासाठी त्यांना तोरगळची जहागीर कायम केली. पुढे शिंद्यांचीही शाखा तोरगळवरून आपले राज्य करू लागली ते थेट 1949पर्यंत!
कोल्हापूरच्या गाडीशी त्यांनी नेहमीच इमान राखलं. आजही शिंद्यांचा वाडा किल्ल्यात दिमाखाने उभा आहे. इथून पुढे किल्ल्यावर मराठी शैलीच्या बांधकामाचा पगडा दिसून येतो. किल्ल्याचा बालेकिल्ला तर एखादा मराठा वाडाच. या वाडय़ापर्यंत पोहोचायला पूर्वेकडून 4 दरवाजे आणि पश्चिमेकडून 4 दरवाजे ओलांडावे लागतात. पूर्वेच्या बाजूस मलप्रभा वाहत असल्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभलं आहे, म्हणून इथे फक्त दोन पदरी तटबंदी आहे. मात्र पश्चिमेची बाजूला सपाटीवर असल्यामुळे इथे तिहेरी तटबंदी आणि खंदक अशी संरक्षण फळी तयार करण्यात आली आहे. मलप्रभा नदीचे पाणी पूर्वी या खंदकात वळवले जायचे, पण कालौघाने खंदक आता बुजला आहे.
तोरगळचा दुर्ग पाहायला एक दिवसही अपुरा पडावा इतका विस्तीर्ण असा हा दुग. इथला इतिहास, स्थापत्य, वास्तुकला आणि अर्थात शिवाजी महाराजांचा इतिहास नक्की अनुभवावा असाच आहे.


























































