युवा शक्तीचे सामर्थ्य आणि आव्हान

>> प्रसाद पाटील

दरवर्षी जगभरात 12 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंपरेनुसार यंदा या दिवसासाठी ‘इंटरजनरेशनल सॉलिडॅरिटी ः क्रिएटिंग ए वर्ल्ड फॉर ऑल एजेस’ म्हणजेच आंतरपिढी एकता ः सर्व वयोगटासाठी एक जग तयार करणे’ अशी थीम ठेवण्यात आली आहे. कारण आज संपूर्ण जग शाश्वत विकास या संकल्पनेभोवती केंद्रित झाले आहे. शाश्वत विकासासाठी सर्व पिढय़ांमधील एकजूट महत्त्वाची आहे. सध्या जगातील एकूण लोकसंख्येत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. यापूर्वी इतक्या प्रमाणात तरुणांची लोकसंख्या नव्हती. त्यामुळे आता आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली प्रचंड क्षमता निर्माण झाली आहे.

‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ असा मौलिक आणि प्रेरणादायी संदेश देणाऱया स्वामी विवेकानंदांची जयंती समस्त भारतभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. तशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. लिस्बन येथे 8 ते 12 ऑगस्ट 1998 दरम्यान पार पडलेल्या युवकांशी संबंधित मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या दिवसाची शिफारस करण्यात आली आणि 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने त्यावर शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून हा दिवस जागतिक युवा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. दरवर्षी या दिनाच्या निमित्ताने युवकांशी निगडीत असणाऱया अनेक मुद्दय़ांवर, घटकांवर आणि भविष्यातील आव्हांनावर चर्चा घडवून आणली जाते. यंदाच्या ‘जागतिक युवा दिना’ची थीम ‘इंटरजनरेशनल सॉलिडॅरिटी ः क्रिएटिंग ए वर्ल्ड फॉर ऑल एजेस’ म्हणजेच ‘आंतरपिढी एकता ः सर्व वयोगटासाठी एक जग तयार करणे’ अशी ठेवण्यात आली आहे. कारण आज संपूर्ण जग शाश्वत विकास या संकल्पनेभोवती केंद्रित झाले आहे. शाश्वत विकासासाठी सर्व पिढय़ांमधील एकजूट महत्त्वाची आहे.

तारुण्य म्हणजे ऊर्जा! ती एका जागी स्वस्थ कधीच बसत नाही. तरुण रक्तच क्रांती घडवून आणते, परिस्थितीत बदल करते हा जगाचा इतिहास आहे. आधुनिक मानवी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर युवकांचे योगदान हे मोलाचे राहिले आहे. देदीप्यमान यश लाभलेल्या आणि अत्युच्च कामगिरी केलेल्या जगभरातील असंख्य व्यक्तींच्या जीवनकथा पाहिल्या तर त्याची बीजे त्यांच्या तारुण्यकाळात सापडतील.

सुरक्षा परिषदेने आपल्या 2015 आणि 2016 च्या ठरावात शांतीस्थापनेच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे. सध्या जगातील एकूण लोकसंख्येत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. यापूर्वी इतक्या प्रमाणात तरुणांची लोकसंख्या नव्हती. त्यामुळे आता आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली प्रचंड क्षमता निर्माण झाली आहे. 15 ते 29 वर्षे वयोगटात येणाऱया तरुणांची संख्या जगात 1.8 अब्ज इतकी आहे. वयोगटांतील सुमारे 1.8 अब्ज तरुणाई सध्या जगात आहे. यापैकी सर्वाधिक तरुणाई विकसनशील देशांमध्ये एकवटलेली आहे. एवढेच नाही, तर जगातील किमान विकसित असलेल्या 48 देशांतील लोकसंख्येत मुले किंवा किशोरवयीन मुलेच बहुसंख्येने आहेत. जगातील एकूण तरुण लोकसंख्येपैकी 20 टक्के लोकसंख्या भारतीय आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतामध्ये तरुण आणि कार्यक्षम लोकसंख्या तब्बल 40.1 टक्के इतकी आहे. तरुण लोकसंख्या ही समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. 35 वर्षांपर्यंतचे 65 कोटी युवा आपल्या देशात आहेत. 2022 ते 2034 या काळात सर्वात मोठे कार्यदल भारताकडे असणार आहे. तरुणांच्या ऊर्जेने आपला देश ओसंडून वाहत आहे. या ऊर्जेचा योग्य वापर केला तर भारत नक्कीच महासत्ता बनू शकेल, हा विश्वास आपण जगापुढे मांडत आहोत. भारताची युवाशक्ती इतर देशांच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यात योगदान देऊ शकते.
समाजव्यवस्थेत, राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यामध्ये युवाशक्ती महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. आज जगभरात युवाशक्तीचा बोलबाला आहे. राज्य संस्थांमधील महत्त्वाच्या पदांपासून ते दिग्गज कॉर्पोरेट बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुख पदाची धुरा युवा पिढीच्या हाती आहे. गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांची स्थापना करणारे आणि ती जगभरात अग्रणी कंपनी म्हणून नावारूपाला आणणारे तरुण हे आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणा ठरणारे आहे. खरे पाहता भारतासारख्या देशातील तरुणांसाठी या मायभूमीतच असंख्य प्रेरणास्थाने, आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि रायरेश्वराची शपथ घेतली तेव्हा ते तरुणपणाच्या उंबरठय़ावर होते. भवताली असणाऱया अशा असंख्य उदाहरणांमधून प्रेरणा घेऊन आयुष्याचे सोने करण्याचा काळ म्हणजे तारुण्य.

स्वामी विवेकानंदांना युवकांबद्दल नितांत आकर्षण होते. त्यांना मनापासून वाटायचे युवा ही राष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची, पण विधायक शक्ती आहे. कोणत्याही राष्ट्राची जडणघडण त्या राष्ट्रातील युवा चारित्र्यसंपन्न असेल तर उत्कृष्ट प्रकारे होते. म्हणून स्वामी विवेकानंदांनी युवाची व्याख्या ‘जो आपल्या कर्तव्याचा विसर न पडता, सतत विधायक कामात गुंतून राष्ट्र उभारणीच्या कार्याला आपला सकारात्मक श्वास देतो, त्याला युवक म्हणतात,’ अशी केलेली आहे. ज्याच्या व्यक्तित्त्वामध्ये ज्ञान, बल, शिल, करुणा आणि पुरुषार्थ हे पाच गुण असतात त्याला ते युवकांची पंचपदी म्हणत.

गेल्या काही वर्षांत युवकांच्या आत्महत्येची आकडेवारीही वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे युवा पिढी आधुनिक झाली असली तरी त्याचे दुष्परिणामही यथावकाश समोर येऊ लागले आहेत. आभासी विश्वात सतत रममाण झाल्यामुळे मनोविश्वावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. मानसिक पातळीवर एकाकीपणा वाढीस लागला आहे. ताणतणाव सहन करण्याच्या क्षमता कमी होत आहेत. तशातच बेरोजगारी, प्रेमभंग, विरह, आर्थिक अडचणी यांसारख्या तारुण्याच्या टप्प्यावर येणाऱया घटनांना धिरोदात्तपणाने सामोरे जाण्यास अनेक तरुणांना अपयश येताना दिसत आहे. याबाबत केवळ मंथनच नव्हे तर त्या दिशेने काम सुरू झाले पाहिजे. नवी पिढी नव्या प्रकारच्या रोजगारांसाठी उपयुक्त असणे यापुढे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे गरजेनुसार युवकांना प्रशिक्षण देऊन सुसज्ज आणि प्रतिभावंत बनविले तरच पुढील पिढी विकासाच्या रस्त्यावर आगेकूच करू शकेल आणि त्यातूनच सर्व वयोगटासाठी जग ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकेल.

आज जगभरातील युवा पिढी आजही शिक्षण, रोजगार आणि सामाजिक, कौटुंबिक जीवनाशी संबंधित निर्णय घेण्याच्या बाबतीत अनेक आघाडय़ांवर झुंजताना पाहायला मिळते. त्यांच्यासाठी संधी निर्माण करणे आणि जीवनाशी संबंधित सर्वच पैलूंमध्ये सहजता आणणे हे मोठे आव्हान आहे. परंतु आव्हानांशी दोन हात करूनच संधींचे नवीन दरवाजे उघडता येतात, हेही तितकेच खरे आहे. आगामी काही वर्षे भारताच्या श्रमशक्तीत युवकांचीच भागीदारी अधिक असणार आहे. 2017 मध्ये आलेल्या भारत सरकारच्याच यूथ इन इंडिया या अहवालानुसार, दहा वर्षांपर्यंत म्हणजे 2030 पर्यंत चीनमध्ये युवकांची संख्या लोकसंख्येच्या 22.31 टक्के असेल. जपानमध्ये युवकांची लोकसंख्या 20.10 टक्के असेल तर भारतात अन्य देशांच्या तुलनेत ती कितीतरी अधिक म्हणजे 32.26 टक्के असेल. म्हणजेच, आपल्याकडे श्रमशक्तीत युवकांची हिस्सेदारी इतर देशांच्या तुलनेत बरीच जास्त असेल. या युवा लोकसंख्येच्या बळावर देशाची अर्थव्यवस्था नवी उंची गाठू शकेल. समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणता येऊ शकेल. कामकाजाच्या संस्कृतीत नवीन बदल सहजपणे स्वीकारले जाऊ शकतील. युवा लोकसंख्या अधिक असण्याचा हा काळ आपल्या देशासाठी सोनेरी काळ आहे.

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)