
>> प्रसाद ताम्हनकर
या वर्षीचा ऑलिंपिक हिंदुस्थानसाठी अत्यंत आनंददायी ठरला. पदकांची कमाई तर झालीच, पण अनेक नव्या खेळाडूंनी पदकाच्या जवळपास भरारी मारण्याची कामगिरीदेखील केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूचे प्रत्येक हिंदुस्थानीयाने भरभरून कौतुक केले. पदक न मिळवू शकलेल्यांनादेखील तेवढीच कौतुकाची वागणूक देण्यात आली. मात्र दुसरीकडे जागतिक पदक तक्त्यात वरचे स्थान प्राप्त करूनदेखील चीनचे खेळाडू आपल्या देशाची आणि देशवासीयांची माफी मागताना दिसून आले. चीनसाठी पदक जिंकणाऱया खेळाडूंनादेखील देशवासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘यांग कियान’सारखी सुवर्ण पदक जिंकणारी खेळाडूदेखील यातून सुटली नाही. चिनी तरुणाईचा हा ‘उन्माद’ बघून संपूर्ण क्रीडाविश्व हादरून गेले. चीनचे अनेक खेळाडू तर स्वदेशी परतण्याच्या विचारानेदेखील घाबरले होते, यावरून आपण या भीतीचा अंदाज करू शकू.
असे नक्की काय घडले की या पदकाला गवसणी घालणाऱया खेळाडूंनादेखील स्वदेशात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले? याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तथाकथित ‘राष्ट्रवाद’ होय. आणि या राष्ट्रवादाला साथ लाभली ती ‘सोशल मीडिया’ या धोकादायक हत्याराची. ‘‘तुम्ही पदक जिंकू शकला नाहीत म्हणजे तुम्ही देशाला धोका दिला आहेत,’’ अशा विचारांनी भारलेल्या चिनी तरुणाईने सोशल मीडियावर आपल्या संघाची जोरदार हेटाळणी सुरू केली आहे. हे तथाकथित ‘राष्ट्रवादी’, ‘लिटिल पिंक्स’ अशा उपरोधिक नावाने ओळखले जातात. खेळात मिळवलेल्या प्रावीण्यापेक्षाही पदकांची संख्या या ‘लिटिल पिंक्स’साठी जास्ती महत्त्वाची आहे.
चीनचे खेळाडू जर ‘जपान’ आणि ‘तैवान’सारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांकडून हरले असतील तर या ‘लिटिल पिंक्स’चा गदारोळ बघायलाच नको. ‘जपान’ आणि ‘तैवान’विरुद्ध कोणताही खेळ हा ‘स्पर्धा’ नसतो तर ते ‘धर्मयुद्ध’ असते. चीनच्या ‘मिक्स्ड डबल्स’च्या टेबल टेनिस संघाने ‘रौप्य’ पदक जिंकले. मात्र ते त्याचा आनंद साजरा न करता देशवासीयांची माफी मागण्यासाठी आधी धावले. ‘रौप्य’ जिंकल्यानंतरदेखील या खेळाडूंची ‘‘मी देशाची आणि संघाची मान खाली घातली’’ ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. कारण ते फक्त पराजित झाले नव्हते तर जपानसारख्या देशाकडून पराभूत झाले होते हे जास्त मानहानिकारक होते.
‘लिटिल पिंक्स’च्या या तथाकथित राष्ट्रवादाच्या आसुडातून ‘यांग कियान’सारखी सुवर्ण पदक विजेतीदेखील सुटली नाही. यांग कियानने पदक जिंकल्यानंतर त्याच्या एका जुन्या सोशल मीडियावरील पोस्टवरून लोकांनी तिला दोष द्यायला सुरुवात केली. या पोस्टमध्ये तिने आपल्याकडील ‘नाईके’ कंपनीच्या बुटांच्या जोडांचे प्रदर्शन केले होते. चीनच्या राष्ट्रवाद्यांमध्ये ‘नाईके’ कंपनीविरुद्ध प्रचंड रोष आहे. ‘नाईके’ कंपनीने चीनच्या शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांकडून सक्तीने मजुरी करून घेतली जाते, असा आरोप करीत त्या प्रांतातून कापूस खरेदी करणे बंद केले आहे. ‘‘हा आमच्या देशाच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे,’’ अशी ‘लिटिल पिंक्स’ची भावना आहे.
सोशल मीडियाचे शस्त्र्ा हाती आल्यानंतर जगभरची तरुणाई हरखून गेली. अनेकांनी त्या आधारे स्वतःच्या आणि इतरांच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र या शस्त्र्ााचा वापर करून अनेकांच्या मनावर, आनंदावर वार करता येतात हे लक्षात आल्यावर अनेकांनी या विकृत आनंदाचा फायदा लुटायला सुरुवात केली. या उन्मादाला तथाकथित राष्ट्रवादाची जोड मिळाली आणि मग एका माऊस क्लिकवर कोणाला ‘देशद्रोही’ घोषित केले जाऊ लागले; तर कोणावर वर्णद्वेषी टिपणी केली जाऊ लागली. अशा ‘उन्मादा’ला जेव्हा ‘राष्ट्रवाद’ समजले जाते; तेव्हा मात्र चिंता निर्माण होते. हा उन्माद देशासाठी अहितकारक असतो.



























































