साय-फाय – ChatGPT, Google MusicLM आणि नैतिकता

>> प्रसाद ताम्हनकर

सध्या संपूर्ण जगात आणि विशेषतः तंत्रज्ञान, संगीत आणि शिक्षण क्षेत्रात ChatGPT आणि Google MusicLM या दोन नावांची प्रचंड चर्चा आहे. यातील ChatGPT हे तंत्रज्ञान वापरासाठी उपलब्ध झाले आहे आणि Google MusicLM लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. खरे तर Google MusicLM हे तंत्रज्ञानदेखील वापरण्यासाठी सज्ज झालेले आहे. मात्र सध्या ChatGPT वरून सध्या सुरू असलेले वादंग बघता गुगल कंपनी कोणतीही जोखीम पत्करण्याच्या तयारीत नाही आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान अजून उपलब्ध केले गेले नसल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी ही दोन तंत्रज्ञानं नेमकी आहेत तरी काय हे आधी आपण जाणून घेऊ. ChatGPT डीप मशीन लार्ंनग बेस्ड चॅट बॉट आहे. त्याचे पूर्ण नाव (Chat Generative Pretrained Transformer) असे आहे. गुगलचा आजवरचा सर्वात प्रबळ शत्रू, गुगलचे अस्तित्व संपवून टाकणारे तंत्रज्ञान, जगाला मिळालेला अभिशाप, संपूर्ण जगाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणारे वरदान अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया या तंत्रज्ञानाला जगभरात मिळत आहेत. हे तंत्रज्ञान वरदान असल्याचे वाटणारे लोक आणि हे तंत्रज्ञान अभिशाप आहे असे मानणारे लोक यांच्यामध्ये सध्या जग विभागले गेले आहे असे म्हणायला हरकत नाही.

हे तंत्रज्ञान नक्की कसे काम करते, तर युजरने एखादा प्रश्न विचारला तर हे तंत्रज्ञान सर्वात प्रथम तो प्रश्न पूर्ण समजून घेते आणि त्याचे सविस्तर उत्तर प्रश्नकर्त्याला सुपूर्द करते. ‘मुंबईचा इतिहास काय आहे?’ या प्रश्नाचे उत्तर ते सात बेटांच्या एकत्रीकरणापासून ते वर्तमानकाळापर्यंतच्या बदलापर्यंत सविस्तर माहितीसह सेकंदात हजर करते. हे तंत्रज्ञान कोडिंग लिहून देऊ शकते, तुम्हाला विविध भाषा शिकायला मदत करू शकते, तुम्हाला कविता, निबंध, गाणीदेखील लिहून देऊ शकते. तुम्ही कल्पनादेखील करू शकणार नाही असे चमत्कार घडवण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे.

शिक्षण क्षेत्राने तर या तंत्रज्ञानाची प्रचंड धास्ती घेतली आहे. विद्यार्थी या तंत्रज्ञानाच्या मदतीने विनाकष्ट दिलेला अभ्यास, प्रोजेक्ट मिनिटात पूर्ण करत आहेत. फ्रान्समधील अग्रगण्य अशा ‘Science Po’ विश्वविद्यापीठाने तर चक्क ChatGPT आणि त्याच्या वापरावर बंदी घातली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणी विद्यार्थी आढळल्यास त्याच्या उच्च शिक्षणावर बंदी घातली जाऊ शकते अथवा त्याला निलंबितदेखील केले जाऊ शकते असे स्पष्टपणे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे. न्यूयॉर्कमधील अनेक शाळांनीदेखील या तंत्रज्ञानावर बंदी आणली असून तिथल्या अनेक शाळांसह अमेरिकेतील काही शाळा, कॉलेजमध्ये लिखित होमवर्क देणे बंद करण्यात आले असून पुन्हा एकदा तोंडी अभ्यासाची सुरुवात करण्यात आली आहे.

इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, ChatGPTची सुरुवात सॅम ऑल्टमन आणि एलोन मस्क यांनी 2015साली केली होती. त्यानंतर ही एक ‘ना-नफा’ कंपनी होती, परंतु 2017-18 दरम्यान एलोन मस्क तिच्यापासून वेगळे झाले. एलोन मस्क यांनी हा प्रकल्प सोडल्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांनी यात मोठी गुंतवणूक केली. सध्या हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसून ते मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र हे तंत्रज्ञान पूर्णपणे विश्वासार्ह नाही असे काही तज्ञांचे मत आहे. कारण अजूनही हे तंत्रज्ञान काही वेळा चुकीची उत्तरे देणे, एखाद्या प्रश्नावर गोंधळून जाणे अशा कमतरता दाखवत आहे.

गुगल आणत असलेल्या Google MusicLM ची फारशी माहिती उपलब्ध नसली तरी दिलेल्या शब्दांपासून गाणे तयार करण्याचे काम हे तंत्रज्ञान करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्याचबरोबर त्याला संगीतबद्ध करण्याचे कामदेखील हे तंत्रज्ञान काही क्षणांत पूर्ण करू शकणार आहे. प्रचंड मोठय़ा अशा संगीताच्या डेटाबेसवर याची रचना करण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या आणि भविष्यात उपलब्ध होणाऱ्या अशा या दोन्ही तंत्रज्ञानांनी नैतिकतेचे अनेक प्रश्न उभे केले आहेत हे मात्र खरे!
[email protected]