तुवालू – समुद्राच्या जबड्यात जाणारा देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

तुवालु हा देश समुद्रसपाटीपासून फारसा उंचावर नाही. जलवायू परिवर्तनाने गेली काही वर्षे इथल्या समुद्राच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे जमिनीचा हिस्सा कमी होत आहे. हळूहळू या संपूर्ण देशालाच हा समुद्र गिळून टाकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये जगभरातील सर्व प्रमुख देशांचे मोठमोठे नेते एका चर्चेसाठी एकत्र आले होते. ‘जगभरात वाढत चाललेले जलवायू परिवर्तन आणि त्याचे होणारे दुष्परिणाम’ या विषयावर ही चर्चा झाली. Glasgow Climate Change Conference (COP26) असे या चर्चेचे नाव. या चर्चेदरम्यान ‘तुवालू’ या देशाच्या न्याय, पर्यटन आणि विदेश अशी तीन महत्त्वपूर्ण खाती सांभाळणाऱ्या ‘सिमोन कोफे’ या नेत्याने एक भावुक संदेश जगभरातील नेत्यांसाठी पाठवला होता. गुडघाभर पाण्यात उभे राहून त्यांनी दिलेल्या या संदेशाने सारेच उपस्थित हेलावले आणि ‘तुवालू’ हा छोटासा देश मोठय़ा प्रमाणावर चर्चेत आला. ज्या ठिकाणच्या गुडघाभर पाण्यात उभे राहून इथल्या मंत्र्यांनी संवाद साधला, तिथे एकेकाळी सपाट अशी कोरडी जमीन असायची हे विशेष.

‘तुवालू’ खरे तर प्रशांत महासागरामध्ये स्थित असलेले एक बेट आहे. ज्या देशांवर जलवायू परिवर्तनाचा थेट परिणाम होत आहे; अशा राष्ट्रांपैकी ‘तुवालू’ एक आहे. ऑस्ट्रेलिया आणि हवाई बेटांपासून ‘तुवालू’ साधारण 4 हजार किलोमीटर दूर आहे. 26 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या या देशात 12 हजार लोक वास्तव्य करतात. हा देश समुद्रसपाटीपासून फारसा उंचावर नसल्याचादेखील त्याला फटका बसत आहे. जलवायू परिवर्तनाने गेली काही वर्षे इथल्या समुद्राच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत चालली असून त्यामुळे जमिनीचा हिस्सा कमी होत चालला आहे. हळूहळू या संपूर्ण देशालाच हा समुद्र गिळून टाकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जोडीलाच या देशाला भयानक वेगवान चक्रीवादळे आणि दुष्काळाचादेखील सामना करावा लागत आहे.

जलवायू परिवर्तनाच्या दुष्परिणामामुळे समुद्राचे तापमानदेखील वाढत असून त्यामुळे हे बेट ज्याने बनले आहे; त्या प्रवाळाच्या भिंतींचेदेखील मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याचा थेट फटका बेटाच्या संरक्षणाला आणि इथल्या माशांच्या प्रजननाला बसत आहे. हे समुद्राचे पाणी थेट जमिनीत शिरत असल्याने इथल्या भूगर्भातील पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीचेदेखील या खाऱया पाण्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. या सर्व संकटांचा सामना करण्यासाठी ‘तुवालू’च्या सरकारने हर प्रकारे प्रयत्न चालवले आहेत. याचाच एक भाग म्हणून सदर व्हिडीओ शूट करण्यात आला आणि जलवायू शिखर परिषदेच्या वेळी तो प्रसारित करण्यात आला. हा व्हिडीओ ‘तुवालू’ची राजधानी असलेल्या ‘फुनाफुती’च्या ‘फोंगफले’ भागात पब्लिक ब्रॉडकास्ट पंपनी असलेल्या ‘टीवीबीसी’ने शूट केला आहे.

सध्या प्रदूषण वाढवण्यात आघाडीवर असलेल्या अनेक देशांनी आणि मोठय़ा उद्योजकांनी येणाऱया दशकांमध्ये कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात मोठी घट करण्याचा संकल्प सोडला आहे. काहींनी तर 2050 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचा संकल्प सोडला आहे. मात्र आता आपल्या अस्तित्वावरच प्रश्न उभा राहिल्याने ‘तुवालू’तर्फे या प्रदूषणासंदर्भात तातडीने काही पावले उचलण्याची विनंती जोरदार पद्धतीने समोर मांडली आहे. ‘तुवालू’ आज ज्या संकटांचा सामना करतो आहे, त्या संकटांना उद्या सर्व जगालादेखील सामोरे जावे लागणार आहे. ‘तुवालू’च्या अनुभवावरून तरी जगभरातील प्रमुख देश काही धडा घेतील आणि प्रदूषण मुक्तीच्या दिशेने अजून वेगाने प्रयत्न करतील हीच आशा!

[email protected]