
>> प्रशांत गौतम
‘बालसाहित्य, सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या आठवडय़ात राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. उपेक्षित समजल्या जाणाऱया या विषयावर राष्ट्रीय चर्चा आयोजित करून विद्यापीठाने चांगला पायंडा पाडला. अन्य विद्यापीठांनीही असा उपक्रम राबवायला हरकत नाही.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातर्फे 15 व 16 मार्च या दोन दिवसांच्या कालावधीत ‘बालसाहित्य ः सध्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. आठ सत्रांमध्ये झालेल्या या चर्चासत्रात मान्यवरांनी 45 शोध निबंध सादर केले. विद्यापीठ याचा समग्र गंथ लवकरच प्रकाशित करणार आहे. चर्चासत्राचे उद्घाटन बालसाहित्याच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रख्यात लेखिका माधुरी पुरंदरे यांनी केले तर ‘चकमक’ या हिंदी नियतकालिकाचे संपादक सुशील शुक्ल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी माधुरी पुरंदरे म्हणाल्या, ‘‘मुलांसाठी साहित्याची निर्मिती करणे ही त्यांच्या भावविश्वात जाण्याची अपूर्व संधी असते. मात्र, मुलांसाठी आपण जे काही लिहितो त्यावेळी आपण आपल्या अनुभवांशी अत्यंत प्रामाणिक असायाला हवे. शिवाय मुलांसाठी लिहिताना मोठय़ांनाही रुची निर्माण व्हायला हवी.’’ प्रमुख पाहुणे सुशील शुक्ल चर्चासत्राचे बीजभाषण करताना म्हणाले, बालसाहित्य लिहिताना ठरवून लिहू नये आणि विशेष म्हणजे आपण मुलांसाठी लिहीत आहोत, असे न वाटता आनंदासाठी लिहीत आहोत असे बालसाहित्यिकांना वाटले पाहिजे. मुलांबद्दल लिहिणाऱया मोठय़ा लेखकांना असे उगाच वाटत असते की, आपण लिहितो ते लहान बालकांसाठीच असावे, थोडक्यात, त्यांना समजेल असेच लिहावे, परंतु मुलांची समज ही मोठय़ापेक्षा जास्त असते. त्यामुळे लेखकांनी अहंभाव बाळगू नये.
दोन दिवसांच्या या चर्चासत्रात संस्कृत, पाली, कन्नड, स्पॅनिश, फ्रेंच, हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू या नऊ भाषांतील तज्ञांनी सहभाग घेतला. याशिवाय वाचन संस्कृती, मुलांचे लेखन, वंचितांचे समूह आणि बालसाहित्य, बालसाहित्याची भाषा, बालसाहित्य आणि चित्रकला, बालसाहित्य संमेलन, मुलांचीच मासिकं, बालसाहित्य बोली आणि संस्कृती, शिशू शिक्षण, बालसाहित्य आणि जागतिकीकरण वसाहतिक बालसाहित्य आणि शिक्षण, बालसाहित्य आणि लिंगभाव, बालसाहित्य आणि शालेय अभ्यासक्रम, बालसाहित्य आणि संगीत अशा वैशिष्टय़पूर्ण विषयांवर मान्यवरांच्या सहभागाने राष्ट्रीय चर्चासत्र बहुपदरी, बहुआयामी होत गेले.
या चर्चासत्रातील अध्यक्षस्थान नामदेव माळी, माधुरी पुरंदरे, सुभाष विभुते, विद्या सुर्वे, सुरेश सावंत, प्राचार्य रावसाहेब जाधव, देवीदास फुलारी, प्रा. जगदीश कदम यांनी भूषवले.
परिसंवादातील विविध विषयांत मी स्वतः, ‘किशोर’ या बालमासिकाचे संपादक किरण केंद्रे, सुनीता बोर्डे, फारुख काझी, माया धुप्पड, श्रीनिवास बाळकृष्णन, शिवाजी अंबुलगेकर, नरेंद्र लांजेवार, अनिरुद्ध गोगटे, माधव चुकेवाड यांच्यासह हमीर अशरफ, गिरीश जकापुरे, मुहमद मकबूल अहमद, नाथा चितळे, स्वाती काटे, संजय जोशी, आनंदी विकास, दिलीप चव्हाण, सत्यकाम पाठक, दीपा बियाणी, सुचिता पाटील, अर्चना डावरे, नीना गोगटे, पी. विठ्ठल, योगिनी सातारकर, झिशान अली, विठ्ठल जाधव, सविता गोविंदवार यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतील तज्ञांनी शोध निबंध सादर केले.
बालसाहित्यिकांनी आऊट ऑफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱया साहित्याची वर्तमानात गरज असल्याचे प्रतिपादन साहित्य अकादमी या बालसाहित्य पुरस्काराचे विजेते, प्रख्यात प्रयोगशील लेखक राजीव तांबे यांनी राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोहप्रसंगी केले. यावेळी तांबे यांनी शिशू गटासाठी शब्दरहित पुस्तकांची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता आहे. बालकांना गोष्टी वाचून दाखवणे आणि गोष्टी सांगणे यातून बालकांचे शिक्षण होत असते. बालसाहित्याचे प्रयोजन मुलांना दृष्टी देणे, आनंद देणे, विविध संकल्पांबाबतच्या कक्षा रुंदावणे. बालसाहित्याचा पाया मुलांवरच्या अपार विश्वास आणि निरपेक्ष प्रेम हा असल्याचे सांगितले.
स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा, वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण, संयोजन सचिव डॉ. पृथ्वीराज तौर यांनी या चर्चासत्राचे नियोजन केले. विषय निश्चित केले आणि त्या त्या क्षेत्रातील तज्ञ अभ्यासकांना निमंत्रित केले. खरे तर आज महाराष्ट्रात विपुल प्रमाणात बालसाहित्य संमेलने होतात. अलीकडच्या कार्यशाळा आणि परिषदाही होत आहेत. अलीकडच्या काही दिवसांत कोल्हापूर, पुणे, बुलढाणा येथे बालसाहित्य परिषदा मान्यवर अभ्यासक, तज्ञांच्या उपस्थितीत झाल्या, पण या विषयावर राष्ट्रीय पातळीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले नव्हते. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने याकामी उल्लेखपूर्ण पुढाकार घेऊन बालसाहित्य चळवळ संवर्धन, संगोपनासाठी मौलिक योगदान दिले. बालसाहित्याच्या संवर्धन, संगोपन, प्रसार आणि प्रचारासाठी विद्यापीठाने आयोजित केलेले राष्ट्रीय चर्चासत्र आगामी काळासाठी दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.




























































