निमित्त – महासत्तेच्या राजधानीत ‘भारतीय’ महापौर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राहुल गोखले

अमेरिकेत स्थायिक झालेल्या रिनी संपथ यांनी वॉशिंग्टन डी.सी. च्या महापौरपदाच्या निवडणुकीत धाडसी उडी घेतली आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या रिनी यांचा सामान्य लोकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर भर आहे. ‘फिक्स द बेसिक्स’ आणि ‘द न्यू डी.सी.’ अशा स्पष्ट आणि थेट निवडणूक घोषणांसह रिंगणात उतरलेल्या रिनी संपथ वॉशिंग्टन डी.सी. च्या महापौरपदी निवडून आल्या तर तो त्यांचा ऐतिहासिक विजय ठरेल.

महासत्तेचे राजधानी शहर असले तरी ते शहरही नागरी समस्यांपासून मुक्त असते असे नाही. वॉशिंग्टन डी.सी. म्हणजे पांढरीशुभ्र स्मारके किंवा धोरणात्मक निर्णय आणि जागतिक मुत्सद्देगिरीचे केंद्र हे खरे, पण जगावर हुकूमत गाजवणाऱया या शहरातही खड्डे, नादुरुस्त पथदिवे, असुरक्षित रस्ते आणि ढेपाळलेल्या आपत्कालीन सेवा यांसारख्या मूलभूत प्रश्नांनी सामान्य नागरिक हैराण आहेत. याच विसंगतीवर बोट ठेवत तामीळनाडूच्या थेनी शहरात जन्मलेल्या आणि वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झालेल्या रिनी संपथ यांनी वॉशिंग्टन डी.सी. च्या महापौरपदाच्या निवडणुकीत धाडसी उडी घेतली आहे. ‘फिक्स द बेसिक्स’ आणि ‘द न्यू डी.सी.’ अशा स्पष्ट आणि थेट निवडणूक घोषणांसह रिंगणात उतरलेल्या रिनी या पहिल्या दक्षिण आशियाई उमेदवार ठरू शकतात.

गेल्या दशकाहून अधिक काळ या शहराच्या रहिवासी असलेल्या रिनी यांचा येथवरचा प्रवास विलक्षण आहे. त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी घेतली असून तेथे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी आपली नेतृत्वक्षमता आणि प्रस्थापित विचारांना आव्हान देण्याची वृत्ती सिद्ध केली होती. विशेष म्हणजे रिनी यांना भारतीय वंशाच्या असल्याने विद्यापीठात निवडणूक लढवताना एका गोऱया विद्यार्थी सहकाऱयासोबत निवडणूक लढवण्याचा सल्ला जाणकारांनी दिला होता. मात्र रिनी यांनी तो सल्ला धुडकावून लावत जॉर्डन फाउलर नावाच्या मैत्रिणीसोबत संपूर्ण ‘महिला पॅनेल’ उभे केले आणि विजय मिळवून दाखवला. त्या निवडणुकीची दखल अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी घेतली होती.

वॉशिंग्टन डी.सी. चे राजकीय स्वरूप अमेरिकेतील इतर शहरांपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे आहे. हे पूर्ण राज्य नाही, तर एक जिल्हा आहे. 1975 पूर्वी येथे लोकनियुक्त महापौर नव्हता, तर राष्ट्राध्यक्षांनी नियुक्त केलेले सदस्य प्रशासकीय कारभार पाहत असत. त्यानंतर येथे महापौर आणि परिषदेची निवडणूक सुरू झाली. सध्याच्या महापौर म्युरियल ब्राउझर या 2015 पासून सलग तीन वेळा निवडून आलेल्या आणि अमेरिकेतील कोणत्याही मोठय़ा शहराच्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला महापौर ठरल्या. ब्राउझर यांनी चौथ्यांदा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने डेमोक्रॅट पक्षात उमेदवारीसाठी चुरस आहे. रिनी यांच्यासमोर अंतर्गत प्राइमरी निवडणुकीत जेनिस लुईस जॉर्ज, केनियन मॅकडफी, गॅरी गुडवेदर, रॉबर्ट एल ग्रॉस आणि रोंडा हॅमिल्टन यांसारख्या अनुभवी राजकारण्यांचे आव्हान आहे.

रिनी यांना कोणताही राजकीय वारसा लाभलेला नाही. सध्या एक सरकारी कंत्राटदार म्हणून काम करणाऱया रिनी या ‘आऊटसाइडर’ उमेदवार मानल्या जातात. त्यांच्याकडे राजकीय पाठबळ किंवा बडय़ा कॉर्पोरेट घराण्यांचा निधी नाही. परंतु पैशांच्या जोरावर निवडणूक लढवण्यापेक्षा सामान्य लोकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर रिनी यांचा भर आहे. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यास फेब्रुवारीमध्ये आलेले भीषण हिमवादळ आणि त्यानंतर प्रशासनाची दिसलेली पराकोटीची अनास्था कारणीभूत ठरली. त्या हिमवादळात संपूर्ण वॉशिंग्टन ठप्प झाले होते. लोक घराबाहेर पडू शकत नव्हते, दिव्यांग नागरिक हतबल होऊन घरात अडकले होते आणि हातावर पोट असणाऱया कामगारांचे उत्पन्न बुडाले होते. पोटोमॅक नदीत मोठय़ा प्रमाणावर सांडपाणी मिसळण्याची आपत्ती ही प्रशासकीय अपयशाचा कळस ठरली. रिनी यांचा सवाल साधा पण टोकदार आहे- आपण मूलभूत नागरी सुविधाही का देऊ शकत नाही?

त्यांच्या प्रचाराचा तोच केंद्रबिंदू आहे आणि ‘फिक्स द बेसिक्स’ हा मंत्र त्यातूनच जन्माला आला आहे. केवळ तक्रारी न करता त्यांनी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. रस्त्यांवरील खड्डे भरणे, पथदिव्यांची सोय करणे, 911 आणि 311 सारख्या आपत्कालीन सेवा अधिक वेगवान करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे, किराणा मालाची दुकाने घरापासून जवळ असणे यांस त्यांनी प्राधान्य दिले आहे. अपघात कमी होतात असा कोपनहेगनमधील रस्ते आराखडा, स्वच्छ हवेचे माद्रिद प्रारूप यांसारख्या जागतिक संकल्पना वॉशिंग्टन डी.सी. च्या स्थानिक गरजांनुसार राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. रिनी यांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाचे उत्तरदायित्व. शहराच्या विविध निकषांचा विदा (डेटा) आधीच उपलब्ध आहे, पण तो विखुरलेला असल्याने कोणीही त्याचा वापर करत नाही असे त्यांचे मत आहे.

वॉशिंग्टन डी.सी. च्या राजकारणात डेमोक्रॅट पक्षाचे वर्चस्व इतके की, 1975 पासून येथे कोणताही रिपब्लिकन महापौर होऊ शकलेला नाही. त्यामुळे 16 जून रोजी होणाऱया प्राइमरी निवडणुकीत जो जिंकेल त्याचाच 3 नोव्हेंबरच्या मुख्य निवडणुकीतील विजय आणि महापौरपदी वर्णी लागणे जवळपास निश्चित मानले जाते. रिनी यांनी ही किमया साधली तर त्या अमेरिकेच्या राजधानीच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महापौर ठरतील व अरुणा मिलर (डेप्युटी गव्हर्नर, मेरीलँड), गजाला हाश्मी (डेप्युटी गव्हर्नर, व्हर्जिनिया), जोहान ममदानी (महापौर, न्यूयॉर्क), राजा साळवान (महापौर, फ्रेमोंट) आणि प्रमिता व्यंकटेश (महापौर, सॅन कार्लोस) यांसारख्या भारतीय वंशाच्या यशस्वी नेत्यांच्या पंक्तीत त्यांचा समावेश होईल. वॉशिंग्टन डी.सी. चे अंदाजपत्रक मोठय़ा प्रमाणावर मध्यवर्ती सरकारवर अवलंबून असतेच, पण बरेचदा प्रशासकीय निर्णयांवरून राष्ट्राध्यक्षांशी (विशेषत ट्रम्प यांच्या सारख्याशी) महापौरांचे खटके उडत असतात. महापौरपदी निवडून आल्याच तर रिनी यांचा कस लागेल यात शंका नाही. बदलाची प्रबळ इच्छाशक्ती आणि सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांना दिलेली प्राथमिकता त्यांच्या प्रचारात प्राण फुंकत आहे. या निवडणुकीत 31 वर्षीय रिनी संपथ यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. त्या वॉशिंग्टन डी.सी. च्या महापौरपदी निवडून आल्या तर तो त्यांचा ऐतिहासिक विजय ठरेल.
(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.) [email protected]