उद्याची शेती – शेतीपलीकडील संधीचे निर्माण

>> रितेश पोपळघट

गुणवत्तापूर्ण आणि रोगमुक्त रोपे तयार करण्याच्या दृष्टीने नारायणगाव येथे ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांनी सुरू केलेली ‘व्हर्सटाईल आग्रोफर्स्ट फार्मर प्रोडय़ुसर कंपनी’ देशातील नर्सरी उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.

भारतीय शेती आता कात टाकत आहे. अधिक उत्पादन देणारे सक्षम वाण, जैव तंत्रज्ञान, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि डिजिटल तंत्रज्ञान यामुळे शेतीमध्ये अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग घडत आहेत. उत्पादनपूर्व आणि उत्पादनपश्चात प्रत्येक घटकात नवीन व्यवसायवृद्धीच्या संधी निर्माण होत असून त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळत आहे.

भाजीपाला आणि फळ उत्पादन क्षेत्रातील उत्पादनपूर्व घटकांमध्ये ‘गुणवत्तापूर्ण रोपे’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. अलीकडेच केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने बागायती पिकांचे उत्पादन व नफा वाभारताची फळ निर्यातीतील जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे आणि ग्राहकांसाठी अन्न सुरक्षा अधिक सक्षम करणे या उद्दिष्टांवर आधारित ‘क्लीन प्लाण्ट प्रोग्राम’ जाहीर केला आहे. या उपक्रमासाठी तब्बल 1,750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रातील विविध विभागांच्या या सक्षमीकरणामुळे शेतकरी ते ग्राहक अशा सर्व हितधारकांना अनेक फायदे मिळतील हे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसून येते. रोपवाटिका क्षेत्रात होत असलेली ही मोठी गुंतवणूक पाहता 2030 पर्यंत भारतातील हा उद्योग 500 दशलक्ष डॉलर्सच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचेल असे चित्र दिसत असून नर्सरी क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण नांदी आहे.

कृषी क्षेत्रातील रोपवाटिका हा आता केवळ रोपे विकण्याचा व्यवसाय नसून भविष्यातील शेतीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनत आहे. गुणवत्तापूर्ण आणि रोगमुक्त रोपे तयार करण्याच्या दृष्टीने पुणे जिह्यातील नारायणगाव येथे ग्रामीण महाराष्ट्रातील उत्साही तरुणांनी ‘व्हर्सटाईल आग्रोफर्स्ट फार्मर प्रोडय़ुसर कंपनी’ची स्थापना केली आहे. आज ही संस्था देशातील नर्सरी उद्योगासाठी कृषी नवोपक्रमाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.

ग्रामीण भागातील महिला, तरुण आणि शेतकरी गट हे कायम शेतीआधारित व्यवसायांची चाचपणी करतात; परंतु त्यांना प्रक्रिया किंवा हस्तकला यांसारखे उद्योग सुचवले जातात. त्यांच्या निकडीसोबत त्यांच्या व्यावसायिक उन्नतीस सहाय्य करणारे तसेच शेती उपक्रमाशी थेट निगडित व्यवसाय सुचवले जात नाहीत. यासाठी ‘रोपवाटिका’ हा एक उत्तम पर्याय आहे हे ओळखून या तरुणांनी पुरवठा साखळी आधारित नर्सरीचे एक व्यावसायिक मॉडेल उभे केले आहे.

सुरुवातीच्या काळात जर्मन संस्था जीआयझेडच्या ‘ग्रीन इनोव्हेशन सेंटर’ प्रकल्पाच्या अंतर्गत दहा सभासद घेऊन या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. स्थापनेच्या आठव्या वर्षात प्रवेश करताना दीडशेहून अधिक सभासदांच्या बळावर कंपनीने तब्बल 15 कोटी रुपयांच्या उलाचा टप्पा गाठला आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता ग्रामीण भागातील संयुक्त प्रयत्न आणि व्यावसायिक सहभागातून कोटय़वधींची उलासाध्य होऊ शकते हे या समूहाने सिद्ध केले आहे.

‘नर्सरी’ पुरवठा साखळी व्यवसायाला आवश्यक असणारे सर्व साहित्य, जसे की बी-बियाणे, जैव खते, कोकोपिट, शेडनेट, कीटक जाळी आणि तण मॅट्स यांसारख्या आवश्यक प्रत्येक गरजेसाठी त्यांनी अत्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी उभी केली आहे. केवळ पुरवठादार न राहता ‘नर्सरी बांधणी आणि व्यवस्थापन’ या क्षेत्रात निर्णयक्षम भूमिका घेत शेतकरी उत्पादक कंपनीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महिला, तरुण आणि नवउद्योजकांना नर्सरी उभारणीपासून व्यवस्थापन, विपणन आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांसंबंधी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील शेकडो तरुण आज केवळ शेतीतच नव्हे, तर कृषी उद्योजकतेतही आत्मनिर्भर झाले आहेत.

शेतकरी कंपनी एवय़ावर मर्यादित न राहता नवकल्पना आणि संशोधन क्षेत्रातही सतत पाऊल पुटाकत आहे. दोन वर्षांच्या अथक संशोधनानंतर ‘झेंडू’ फुलाचे वाण तसेच कोकोपिटचा स्वतचा ब्रँड बाजारात आणला असून त्याची विक्रमी विक्रीदेखील केली आहे. नर्सरी आणि फुलबाग क्षेत्रातील सर्वात किचकट मानले जाणारे काम सभासदांच्या सामूहिक प्रयत्नांनी शक्य होऊ शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. संस्थात्मक आणि तांत्रिक प्रगतीचा एक भाग म्हणून शेतकरी कंपनीने नवीन, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे कार्यालय उभारले आहे. कार्यालयात सीड सेल काऊंटर, मीटिंग रूम आणि सुसज्ज गोडाऊन्सची व्यवस्था असून त्यामुळे शेतकरी कंपनीच्या वैभवात आणि कार्यक्षमतेत मोठी वाझाली आहे.

कोणताही व्यवसाय वायासाठी संस्थात्मक पातळीवर भागीदारी महत्त्वाची असते. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने देशातील प्रतिष्ठित संशोधन संस्था असलेल्या भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थान (बंगळुरू), आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (हैदराबाद) आणि वसंतदादा साखर संस्था (पुणे) यांच्याशी भागीदारी केली आहे. या संस्थांचे शास्त्रज्ञ सल्लागार सदस्य म्हणून कार्य करत असल्याने नर्सरीचे उत्पादन आणि व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक व तंत्रशुद्ध झाले आहे. सध्या कंपनीचे बारापेक्षा जास्त बियाणे कंपन्यांसोबत थेट करार आहेत.

सभासदांच्या कल्याणासाठी कंपनी दरवर्षी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देते. सभासद मंडळींच्या उपक्रमात नावीन्य यावे याकरिता जगभर अभ्यास दौरे आयोजित केले जातात. आगामी काळात राज्यातील विविध ठिकाणी नवीन आऊटलेट सुरू करण्याचे नियोजन असून त्यामुळे त्या भागातील नर्सरीधारकांना थेट आणि त्वरित सुविधा उपलब्ध होतील असा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आजच्या सर्व उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाला आहे. कंपनीने डिजिटल व्यवस्थापन, वैज्ञानिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता यावर भर देत राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे.

नफा मिळवणे हे उद्दिष्ट असले तरी शेतकऱयांना शाश्वत व्यवसायाची साधने उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागात कृषी उद्योजकता यशस्वी करणे हे ‘कृषी नवोपक्रम केंद्र’ म्हणून त्यांनी प्रभावीपणे साध्य केले आहे.

(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून ‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)

[email protected]