
>> रोहिणी निनावे, [email protected]
संतोष अयाचित. आजचा दिग्दर्शक… विचार… अभ्यास… चिंतन यातून काम करणारा!
जय मल्हार, रात्रीस खेळ चाले, हंड्रेड डेज, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, लक्ष्मीनारायण यासारख्या यशस्वी मालिकांशी ज्यांचे नाव जोडलेले आहे असे लेखक, दिग्दर्शक संतोष अयाचित यांची मुलाखत घ्यायचं ठरवलं…! फिल्म सिटी गोरेगाव येथे त्यांच्या बाळूमामा आणि लक्ष्मीनारायण या दोन्ही मालिकांचे सेट्स लावले आहेत तिथे गेल्यावर आपण खरोखरच एखाद्या गाव खेडय़ात गेलो आहोत की काय असा आभास होत होता. तिथल्याच ऑफिसमध्ये बसून आम्ही बोलायला सुरुवात केली.
संतोषशी माझी फारशी आधीची ओळख नसल्याने मला त्याच्या या क्षेत्रामधल्या प्रवासाची कल्पना नव्हती. मी म्हटलं, ‘सुरुवातीपासूनच सांगा.’ संतोष म्हणाले, ‘मी मूळचा उरळी कांचनचा. दहावीपर्यंतचं शिक्षण तिथे घेऊन मी पुण्यात आलो. पुण्यात ललित केंद्रात नाटय़शास्त्रात एम.ए. करायला सुरुवात केली. या क्षेत्राबद्दल औत्सुक्य होतंच, परंतु मध्येच वडिलांचा मृत्यू झाल्याने मी शिक्षण सोडून दिलं. तेव्हा ई टीव्हीची जुळवाजुळव चालू होती. मी तिथे नोकरी करायला लागलो. ऐकून गंमत वाटेल, अगदी शेवटची पोस्ट होती माझी! स्क्रिप्ट रायटर ग्रेड थ्री! टीव्ही या माध्यमाची गंमत अशी वाटली की, रोज नवीन काहीतरी करण्याची संधी असते. पण मग वाटायला लागलं यापलीकडे जाऊनही काहीतरी करायला हवं. कारण इथे मी खूप प्रगती करून बरंच काही शिकलो होतो. वेगवेगळे टी.व्ही. प्रोग्रॅम्स, विजय तेंडुलकरांवर कॉमेंटरी, हिंदी मालिकांसाठी घोस्ट रायटिंग अशी अनुभवाची शिदोरी हातात होती. अशा वेळेसच जय मल्हारचा प्रोजेक्ट माझ्या हातात आला. जे काही आजवर वाचलं, पाहिलं, अनुभवलं होतं ते सगळं इथे मांडता येणार होतं. मला नेहमीच वाटतं की, आपण जे लिहितो ते तितक्याच प्रभावी रूपाने मांडता येण्यासाठी तुम्ही स्वतःचं दिग्दर्शन करायला हवं आणि म्हणूनच बाळूमामाच्या नावाने चांगभलं, जय मल्हार, लक्ष्मीनारायण या मालिकांमधले कित्येक महत्त्वाचे सीन्स मी दिग्दर्शित केले आहेत. अर्थात सगळय़ाच इतर दिग्दर्शकांची आणि टीमची मला साथ मिळाली आहे!’
मी विचारलं, ‘मालिका करताना दिग्दर्शकाचं काम काय असावं असं वाटतं तुम्हाला?’ संतोष म्हणाले, ‘मालिका लेखक लिहीत असतो. दिग्दर्शकाने त्याला व्हिजुअली ट्रीट करायला हवं. व्हिजुअल लँग्वेज बदलायला हवी, कॅरेक्टरचं साऊंड टेक्श्चर बदलायला हवं. लेखकाच्या मनातली प्रत्येक गोष्ट पडद्यावर चितारता आली पाहिजे.’ मी विचारलं की, ‘जय मल्हारनंतर तुम्ही ब्रेक घेतलात?’ संतोष म्हणाले, ‘मला वाटलं की, इतकं काम केल्यावर थोडं थांबावं. पुन्हा वाचावं, बघावं, फिरावं आणि फिरता फिरताच माझ्या हाती लागली ती बाळूमामांची गोष्ट. या अद्वितीय माणसाने महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये पालथी घातली. वाडय़ावस्त्या फिरलेला, ऊन, पाऊस, थंडी, वारा कशाचीही तमा न बाळगता तिथल्या माणसांमध्ये साधेपणाने जागृती करणारा…!
मी म्हटलं, ‘पौराणिक मालिका करताना दिग्दर्शकावर खास काय वेगळी जबाबदारी असते?’ संतोष म्हणाले, ‘सर्वथाच, सगळय़ाच गोष्टींचं भान ठेवावं लागतं. नेपथ्य, अभिनय, भाषा, कॉस्च्युम्स, ज्वेलरी यात थोडी जरी चूक झाली तरी लोक टीका करतात. मालिका अस्सल वाटावी यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न असतात. नेपथ्य त्या काळाचा भास निर्माण करणारं, तशी घरं, तशा खिडक्या, तसं वातावरण, तसे कपडे, कपडे पेहरण्याची पद्धत, एक विशिष्ट तऱहेने बोलण्याची लकब, त्याच पद्धतीचा अभिनय, पण माझ्या मते सगळय़ात महत्त्वाची आहे ती भाषा. ती जर चुकली तर सगळंच चुकलं. कारण हल्लीच्या काही कलाकारांना प्रमाण भाषाही बोलता येत नाही. क्रियापद विसरलेच आहेत. मी बोलतेय, मी खातेय असं म्हणतात. वाचन नसल्यामुळे बरोबर, चूक कळत नाही. संस्कृतप्रचुर शब्द बोलताना त्यांना त्रास होतो. त्यांच्याकडून मालिकेच्या काळाप्रमाणे संवाद बोलवून घेणं हा एक टास्क असतो. पण अनुभवाने या गोष्टी आपण शिकत जातो आणि हे शिकणं अविरत असतं. मालिकेची मांडणी, रूपबंध साधा हवा. त्यात खरेपणा, प्रामाणिकपणा दिसायला हवा. तो काळ तंतोतंत उभा करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप अभ्यास करावा लागतो. खूप वाचावं लागतं. विशिष्ट बजेटमध्ये या सगळय़ा वस्तू गोळा करणं कठीण असतं. त्या कधी कधी उपलब्धही नसतात. कुठे कुठे जाऊन शोधून आणाव्या लागतात. आता इरकलच्या तशा साडय़ा इथे मिळत नाहीत, मी इंदुरी साडय़ा कर्नाटकात जाऊन आणल्या. ज्वेलरीसुद्धा… त्या पद्धतीचे अदागीने तिथेच मिळतात किंवा ती धनगरी शाल पण कुठे मिळते ते शोधून काढलं. तुम्हाला गंमत सांगतो. बाळूमामाच्या वेळेला आम्ही शूट करत असताना एखादी लोकल गाय किंवा तुरळक प्राणी आम्ही वापरत होतो, पण आमचे एक मनोहर मामा आहेत ते म्हणाले, ‘गडय़ा काही मजा येत नाहीये जास्त प्राणी नसल्याने.’ मग काय एक टेम्पोभर प्राणी दिले की पाठवून त्यांनी धनगर पद्धतीची लाल घोडी पण शोधून काढली. आता त्या प्राण्यांची सगळी जबाबदारी आम्ही घेतो. त्यांना चारा खाऊ घालतो, त्यांच्यासाठी डॉक्टरही आहे. वेळ पडली तर आम्ही त्यांचं शेणही साफ करतो.’
मी म्हटलं, ‘पौराणिक मालिकांमध्ये आजकाल खूप स्पेशल इफेक्टस् वापरताना दिसतात. हे खूप वेळखाऊ काम असतं नाही, मग याचं प्लॅनिंग कसं करता?’
संतोष म्हणाले की, ‘थोडं ऍडव्हान्समध्ये काम करावं लागतं. आपण सीन कसा दाखवणार आहोत याचा विचार करावा लागतो. आधी डिझाईन्स बनवावी लागतात. मग त्यात कुठले रंग वापरायचे याचा विचार करावा लागतो. कुठल्या अँगलने कॅमेरा असावा, सीनचं टेक्श्चर बघावं लागतं. सगळं अचूक असावं लागतं. व्हीएफएक्सचं तंत्रज्ञान खूप विकसित झाल्याने आज आपण काहीही दाखवू शकतो. मी विचारलं, ‘एवढं काम करून, श्रम करूनही लेखक, दिग्दर्शकांना आपल्याकडे महत्त्व नाही याचं वैषम्य तुम्हाला वाटत नाही का?’ तेव्हा हसत संतोष उत्तरले की, ‘एकदा आम्हाला महेश केळुस्कर म्हणाले होते लेखक जोपर्यंत लिहून देत नाही तोपर्यंतच त्याचं महत्त्व असतं. एकदा लिहून झालं की त्याच काम झालं. ते ऐकल्यावर मी मनाशी खूणगाठ बांधली की, जे काम करायचं ते स्वान्तसुखाय! आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. मनाला आनंद मिळाला पाहिजे बस!’
मी विचारलं, ‘तुमच्यावर कुठल्या दिग्दर्शकांच्या कामाचा पगडा आहे?’ संतोष म्हणाले, ‘माझ्यावर प्रभातच्या चित्रपटांनी संस्कार केले. शांताराम बापू, दामले, फत्तेलाल हे माझे आवडते दिग्दर्शक. त्यांनी दिग्दर्शित केलेले सीन्स आजही अफलातून वाटतात.’
मी विचारलं, ‘आज ज्या तऱहेने प्रत्येक वाहिनीने आपले असे टीव्ही प्रोग्रॅम्स बनवले आहेत ते पाहता टीव्ही इंडस्ट्रीला धोका आहे असं वाटतं का?’ संतोष लागलीच म्हणाला, ‘छे अजिबात नाही. अहो अजून खेडोपाडी धड टीव्हीसुद्धा पोहोचला नाही. मी फिरलो आहे ना खेडय़ापाडय़ात. साधी वीज नाही तर मुळात अजून टीव्ही बघायला मिळत नाही त्यांना. मोबाईलवर कार्यक्रम बघणंही खूप पुढची गोष्ट झाली. आजही आपण संस्कार, भावना यांना महत्त्व देतो आणि ते कधीच मिटणार नाहीत आणि हे फक्त टीव्हीवरच बघायला मिळतं.’
तेवढय़ात संतोष यांची पत्नी काही विचारायला तिथे आली तेव्हा त्यांची ओळख करून देत संतोष म्हणाले, ‘ही माझी पत्नी दर्शना. ही माझ्या मालिकेचे कॉस्च्युम्स बघते आणि एकूणच मला माझ्या कामात हिची खूप मदत होते.’ माझ्याशी दोन शब्द बोलून त्या कामाच्या गडबडीत असल्याने सेटवर गेल्या. मी विचारलं, ‘मालिकांखेरीज आणखी काही करण्याच्या योजना आहेत का?’ संतोष म्हणाले, ‘हो, एक मेगा प्रोजेक्ट आहे फिल्मचे. स्क्रिप्टिंग झाले आहे. पूर्ण चित्रपट क्रोमवर शूट करतो आहे. अगदी हाय एण्ड टेक्निक वापरतो आहे. बघूया.’ संतोषला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन मी त्यांचा निरोप घेतला!






















































