
>> साधना गोरे n [email protected]
राम हे हिंदू धर्मातील एका दैवताचे नाव, पण मराठी जममानसात हे नाव विविध अर्थाने वापरलं जातं. ‘नमस्कार’ या अर्थाने मराठी माणूस ‘रामराम’ म्हणायचा. आताही गावाकडे या प्रकारे अभिवादन करण्याची परंपरा आहे. ‘रामरगाडा’, ‘रामफळ’, ‘रामरट्टा’ अशा शब्दांतही हे नाव वापरलं गेलेलं दिसतं. मग प्रश्न पडतो की, ‘राम’ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे?
गेल्या लेखात आपण पाहिलं की, ‘रम्’ या मूळ संस्कृत शब्दापासून (धातूपासून) ‘आराम’, ‘विराम’ हे शब्द निर्माण झाले आहेत. ‘राम’ हा शब्दही ‘रम्’पासून निर्माण झाल्याचे कोशकार सांगतात. ‘रम्’चा अर्थ आनंद, संतोष, रम्य असा आहे; तोच अर्थ ‘राम’ या नावाचा / शब्दाचासुद्धा आहे. शिवाय ‘गीर्वाणलघुकोशा’मध्ये त्याचे सुखदायक, सुंदर, पांढरा, निळा, काळा हेही अर्थ सांगितले आहेत.
जगन्नाथ विष्णू ऊर्फ बाबा भारती यांच्या पाली-मराठी कोशामध्ये ‘राम’ शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे दिला आहे – ‘राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र याचेच दुसरे नाव राम पंडित होते.’
व्युत्पत्ती कोशात कृ. पां. कुलकर्णी ‘रामरट्टा’ (मोठा आघात) या शब्दाच्या अनुषंगाने म्हणतात, ‘‘यामधील ‘राम’ शब्दाचा आणि ‘राम’ विशेषनाम यांचा काही संबंध नाही. एकतर ‘राम’ हा परकी-द्राविडी शब्द असावा किंवा ‘राम’ हा ‘आराम’ याच्याशी किंवा ‘रान’ याच्याशी संबंध असावा. रामफळ यात तर संशय उरत नाही. सीताफळ म्हणजे थंड फळ.
आराम आणि उपवन, बाग यांचा संबंध आपण गेल्या लेखात स्पष्ट केला होता. वन, रान हे तसे सारख्याच अर्थाचे शब्द आहेत. याचा अर्थ रामायणातील आणि लोककथांमधील राम यांच्या कथा काहीशा वेगळ्या असल्या तरी ‘राम’ शब्दाचा अर्थ रानावनाशी, पर्यायाने सुख-आनंदाशी संबंधित असल्याचा दिसतो.
‘मराठी वाक्संप्रदाय’मध्ये रामावरून कितीतरी शब्दप्रयोग आहेत. इथं त्यातले सगळेच सांगणं शक्य नाही. एखाद्या गोष्टीत अर्थ नाही, उपयोग नाही किंवा योग्यता नाही हे सांगताना ‘काही राम नाही’ असं म्हटलं जातं. वर सांगितलेला सुख – आनंद हा अर्थ इथं लागू होतोच, पण यामागे एक कथाही सांगितली जाते. ती अशी – सीतेने प्रसन्न होऊन मारुतीला तिच्या गळ्यातील रत्नहार दिला. मारुतीने हारातील एक-एक रत्न पह्डून पाहिले, पण त्यात त्याला रामाची मूर्ती दिसेना. यावरून हा शब्दप्रयोग आल्याचं म्हटलं जातं. रामाचा बाण कधी व्यर्थ जात नाही, तो लक्ष्य वेधतोच. त्यावरून कधी व्यर्थ न जाणारे हटकून गुण देणाऱ्या औषधाला, उपायाला ‘रामबाण’ म्हटलं जातं.
नमस्कार, वंदन म्हणून ‘रामराम’ म्हणण्याची आपल्याकडे परंपरा आहे; त्याप्रमाणे निरोप घेतानाही ‘रामराम’ म्हटलं जातं. यावरून ‘रामराम ठोकणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा. त्याचा अर्थ आहे – रजा घेणे, सोडून जाणे, पळून जाणे. उदा. ‘त्याने संसाराला रामराम ठोकला आणि फकीर झाला’. प्राणास मुकणं किंवा मृत्यूला सामोरं जावं लागणं या अर्थाने ‘रामाचं नाव घेणं’ असा शब्दप्रयोग वापरला जातो. उदा. त्याने साहेबांचं हे काम केलं नाही तर त्याला रामाचं नाव घ्यावं लागेल. ‘रामभरोसे काम’ अशी एक म्हण आहे. म्हणजे परमेश्वरावर भरवसा ठेवून काम करणं किंवा कसंही काम उरकणं.
रामनामावरून काही गमतीशीर शब्दप्रयोगही आहेत. त्यातील एक म्हणजे ‘रामापैली रामायण’. राम जन्माला येण्यापूर्वीच वाल्मीकाRनी रामायण रचल्याचं म्हटलं जातं. यावरून एखादी गोष्ट घडायच्या आधीच त्याची प्रसिद्धी केली जाते किंवा बढाया मारल्या जातात तेव्हा ही म्हण वापरली जाते. काही लोक वरवर ईश्वरभक्तीचा आव आणतात आणि आतून कपट-कारस्थान करतात. अशांना उद्देशून ‘रामनाम जपता, केसाने गळा कापता’ ही म्हण वापरली जाते. याच म्हणीची हिंदी आवृत्ती म्हणजे ‘राम नाम जपना, पराया माल अपना’ ही म्हण होय.
‘राम भला, रावण भला, जागा आपल्या हिताला’ अशी एक म्हण आहे. म्हणजे राम व रावण दोन्ही बाजूला ठेवून आपण आपल्यापुरतं पहावं; इतरांच्या भानगडीत न पडता स्वतःचं हित पहावं. ‘रामाकाळी वानरी-वानरांना वाचा’ अशी एक अतिशय समर्पक म्हण आहे. ज्या गोष्टीबद्दल कसलाही प्रत्यक्ष पुरावा नाही, वैज्ञानिक आधार नाही; शिवाय आज त्याचा काही उपयोगही नाही, अशा गोष्टीबद्दल वाटेल ते बोलावं या अर्थाने ही म्हण वापरली जाते.