
>> संजय कऱ्हाडे
कालचा तिसरा दिवस ज्यो रूटचा होता. आपल्या कारकीर्दीतलं अडतीसावं आणि हिंदुस्थानविरुद्ध बारावं शतक त्याने फटकावलं. संयमी, धीरोदात्त आणि कणखर फलंदाजीचं उदाहरण घालून देणारं. आता तो सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर (51), पॅलिस (45) आणि पाँटिंगच्या (41) मागे आहे. आणि सर्वाधिक धावांच्या बाबतीत फक्त तेंडुलकरच्या (15,921) मागे! तसंच एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतपं फटकणाऱयांच्या यादीत तो ब्रॅडमन (इंग्लंडविरुद्ध 19), गावसकरच्या (विंडीजविरुद्ध 13) मागे आहे…
स्वच्छ सूर्यप्रकाशात ओली पोप आणि ज्यो रूटने गुरुवारी बुमरा, सिराज, पंबोज आणि शार्दुलचा समाचार घेतला. चौघांपैकी कुणीही फारसा प्रभाव पाडू शकलं नाही. माझं म्हणणं खोटं ठरलं तर मला आनंद होईल. पण बुमरा ही मँचेस्टर कसोटी सुरू होईपर्यंत जगातला सर्वोत्तम गोलंदाज होता असं माझं मत झालंय. छोटय़ा-मोठय़ा देशांविरुद्धच्या मालिकांचं द्या सोडून, पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकासारख्या देशांविरुद्ध त्याच्याकडून फरशा आशा न ठेवलेल्याच बरं. सिराज थकतोय. आणि चेंडू स्विंग होत नसताना शार्दुल आणि पंबोज त्यांच्या सुमार वेगामुळे क्षुल्लक वाटतात.
क्रिकेटचा खेळ मुळात गोलंदाजांचा. ते आपल्या सर्जनशीलतेच्या अन् आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर फलंदाजांसमोर प्रश्न उभे करतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं फलंदाजांचं काम असतं. पण बेन स्टोक्ससारखी खेळपट्टीची समज आणि वास्तव चातुर्य आपल्या गोलंदाजांपैकी कुणीच दाखवलं नाही. फलंदाजांनी चुका करण्याची ते वाट पाहत राहिले.
उपहारादरम्यान वॉशिंग्टन आणि कुलदीप कुठल्या कोपऱयात जाऊन छापा-पाणी खेळायचं अशी चर्चा करत होते तेव्हा बहुदा कप्तान गिलला वॉशिंग्टनची आठवण आली असावी! त्यानंतर चेंडू सुंदरच्या हाती गेला, त्याने दोन बळी मिळवले अन् हिंदुस्थानी संघाला थोडीफार चालना मिळाली.
फारसे चमत्कार झालेले मी पाहिलेले नाहीत. हा सामना अनिर्णित राहिला आणि शेवटी मालिकेत बरोबरी साधता आली तर त्यालाही चमत्कार म्हणायची माझी तयारी आहे!