
>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)
सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वच जण आरोग्य जपण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सर्वच अनेक प्रयत्न करत आहेत. मग ते विविध काढे असोत, विविध प्रकारचा आहार असो, पण हे सर्व करताना अनेक जण नकळत आरोग्याला हानिकारक असलेल्या गोष्टी करत असतात. अशा काही गोष्टींकडे आपण पाहुयात.
– वजन कमी करण्यासाठी विविध आहार किंवा फॅड डाएट्स ः अनेक जण वजन कमी करण्यासाठी विविध फॅड डाएट्स करतात, पण अशी डाएट्स करताना आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता शरीरात निर्माण होते. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. म्हणूनच संतुलित आहाराने वजन कमी करणे योग्य आहे. आहार तज्ञांकडून योग्य सल्ला घेऊनच आहारात बदल करावा.
– शुगर फ्री किंवा लो फॅट पदार्थ ः सध्या शुगर फ्री आणि लो फॅट खाण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो, पण जरी मार्केटमध्ये अशा गोष्टी मुबलक उपलब्ध असल्या तरी त्या आरोग्यदायी असतातच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने असे पदार्थ विकत घेण्याआधी त्याचे घटक तपासून घ्यावेत.
– पॅकेज्ड पदार्थ ः बाहेरचे पॅकेज्ड पदार्थ अनेक वेळा हेल्थी म्हणून सांगतिले जातात, परंतु त्यात साखरेचा समावेश कोणत्या प्रकारे आहे, सोडियम किती आहे, प्रथिने आहेत का व इतर कृत्रिम पदार्थांचा समावेश किती आहे याचा तपास महत्त्वाचा असतो. विशेष म्हणजे रक्तदाबाच्या, मधुमेहाच्या व कॉलेस्टेरॉलच्या किंवा इतर आजार असलेल्या रुग्णांनी याची अधिक काळजी घ्यावी.
– मानसिक तणाव ः हल्ली बरेच जण काही ना काही कारणामुळे मानसिक तणावाखाली सतत असतात. असा वरचेवर असणारा मानसिक तणाव आरोग्यासाठी योग्य नव्हे. त्यामुळे आपल्या पचनक्रियेवर, झोपेवर, खाण्यापिण्याच्या सवयींवर विपरीत परिणाम होतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग्य उपाय करून तो आटोक्यात ठेवावा.
– योग्य व्यायामाचा अभाव आणि अतिरेक ः नियमित व्यायाम नक्कीच आरोग्यदायी असतो हे सर्वांनाच माहीत आहे, पण योग्य व्यायामाचा अभाव व त्याचा अतिरेक आरोग्याला घातक असतो. व्यायामाचे अनेक प्रकार असतात तर काही जण जिममध्ये जातात, पण नेमका कोणता व्यायाम आणि किती वेळ करावा याबद्दल योग्य सल्ला घेणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा व्यायाम करणे अयोग्य आहे. त्याचबरोबर गरजेपेक्षा कमी किंवा जास्त वेळ व्यायाम केल्यास तो आरोग्यदायी ठरत नाही.



























































