
>> शिरीष कणेकर
‘लॅब’चा टेक्निशियन माझ्या जिन्याच्या पायऱया चढत असताना माझी लग्नाची बायको म्हणाली, ‘तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी तुम्हाला कोविड झाल्याचं बाहेर कुठे बोलू नका.’
‘का? कोविड म्हणजे गुप्तरोग वाटतो?’
‘तो तुम्हाला असेलही. शिवाजी पार्क वगैरे कुठे कुठे जात असता.’
‘आँ? आमचं शिवाजी पार्क म्हणजे देशभराचं गुप्तरोग केंद्र कधी झालं? कोणी केलं? काय वाटेल ते काय बरळताय?’
थोडी थोडी घोट घोट घेत आमचे परममित्र अविनाश नाईक त्यांचे मित्र चित्राव यांच्याबरोबर वार्तालाप करीत बसले होते. हिंदी चित्रपटातील डाकूपट हा विषय त्यांनी ऐरणीवर घेतला होता. बोलता बोलता चित्राव म्हणाला, ‘इव्हन दिलीपकुमारने डाकू चांगला केला होता.’
‘इव्हन’ या शब्दाने नाईकांचं आधीच मदिरेनं चढलेलं डोकं पार गेलं. इव्हन दिलीपकुमार? इव्हन? ‘ऊठ-ऊठ’ त्यांनी चित्रावला उठवलं व हाकलून दिलं. दारू ढोसताना दारू पाजणाऱया माणसाची तळी उचलून धरायची असते, त्याची सर्वांगीण स्तुती करायची असते, त्यांच्या कुत्र्यालाही वाघ किंवा सिंह म्हणायचं असतं, त्याच्या दीड खोलीच्या घराला म्हैसूर पॅलेस म्हणायचं असतं आणि खुद्द त्याला राजा भोज म्हणायचं असतं एवढं बेसिक त्या चित्रावला कळू नये? एकदा दारू पिताना एकजण मला अमिताभ बच्चन म्हणाला होता (माझी उंची पाच फूट पावणेतीन इंच). वास्तविक तो मला जया भादुरी म्हणाला असता तर निदान त्याला जास्त झालेली नाही असा आपण संशय व्यक्त करू शकलो असतो. पण प्रत्यक्षात तो मला अमिताभ बच्चन म्हणाल्यावर आणखी दोन पेगनंतर ऐश्वर्या राय म्हणाला. शेवटी तो मला अनुक्रमे अमजद खान, ए. के. हंगल व केश्तो मुखर्जी म्हणाल्यावर मी त्याच्या मदिरेचा पुरवठा थांबवला. त्यानंतर तो मला चिडून निर्मिती सावंत म्हणाला.
बघा, दारू माणसाकडून काय काय बोलवून घेते. आमचे एक डॉक्टर मित्र टाइट झाल्यावर) समोर जो कोणी असेल त्याला ‘सर्जरी’ शिकवायचे. त्या काळात सहसा मीच त्यांच्या समोर असायचो. हळूहळू माझा अख्खा मेडिकलचा कोर्स पुरा झाला. मी माझी डॉक्टरची पाटी करायलाही टाकली होती, पण दरम्यान अति मद्यप्राशनाच्या आरोपाखाली आमच्या या डॉक्टर मित्राची पदवी रद्द करण्यात आली. आता तो गुत्त्यात फळा लावून शिकवतो. टाईट प्राध्यापक, टाईट विद्यार्थी! ‘डॉक्टर आत आहेत’ या पाटीच्या जागी तो आता ‘डॉक्टर प्यायलेले आहेत’ अशी पाटी लावेल.
एका बायकोने नवऱयाला विचारलं, ‘तुम्ही सतत का पीत असता?’
‘कारण प्यायल्यावर तू मला सुंदर दिसतेस.’
‘हो, पण समोर मी उभी आहे, शेजारीण आहे की मोलकरीण आहे हे तुम्हाला कुठे कळतं?’
बघितलंत? मदिरा इज अ ग्रेट इक्वलायझर. बायको, शेजारीण व मोलकरीण यांच्यातला असमाजवादी, अन्याकारक फरक ती मिटवून टाकते. दारू उतरल्यावर तिची हकालपट्टी ठरलेलीच आहे. मग तिच्या उन्नतीसाठी, तळागाळातील समाजाच्या विकासासाठी व सामाजिक तोल राखण्यासाठी प्रस्तुत घरमालकानं सतत मदिरेच्या अमलाखाली असणे ही काळाची गरज आहे. आपण काळाची गरज ओळखून ती पूर्ण करायला धडपडायला नको का? त्यासाठी पिऊन धडपडणे अपरिहार्य आहे.
माझा एक मित्र (नाव नको ना गडय़ांनो!) भक्तिभावानं दारू पितो. जणू देवळाच्या गाभाऱयात बसून तीर्थ प्राशन करतोय. आधी तो ओसंडून वाहणाऱया ग्लासात तर्जनी व अंगठा बुडवतो व टिचकी वाजवून पवित्र थेंब दाही दिशांना उडवितो. त्यानंतर भरलेला ग्लास तो मस्तकी धारण करतो.
दारू पिणाऱयाला दारूपेक्षा मोठं आणि महत्त्वाचं काही नसतं. त्याला सांगा, लवकर घरी ये. आज आपल्याकडे अमिताभ बच्चन येणार आहे. तो म्हणेल, मस्तच. तुम्ही त्याला बसवून ठेवा. मी दोन पेग मारून लगेच येतो. प्रत्यक्षात गुत्त्यातल्या प्रत्येकाला ही सनसनाटी बातमी सांगून तो दोनऐवजी चार पेग मारून तरंगत घरी येईल. त्याच्या लक्षात असेल की, आपल्या घरी चंकी पांडे येणार आहे. चंकी पांडे की जॉय मुखर्जी?…
एक मुलगा आईला म्हणतो, ‘आई गं, तुला फार कष्ट पडतात. आज मी तुला थोडी मदत करतो, तुझा भार हलका करतो.’
‘म्हणजे काय करतोस?’
‘तुझी भांडी घासून देतो.’
‘नको-नको, तुझी अजून उतरलेली दिसत नाही.’
‘कशावरून?’
‘ताटं म्हणून तू पत्रावळी घासायला घेतल्यास.’
दारूडय़ांची कड घेणाऱयांनी, बाजू घेणाऱयांनी हा शेर वाचावा-
कौन कहेता है के मयमे नशा होता है
गर मयमे नशा होता तो बोतल न नाचती
z [email protected]