असा बालगंधर्व आता न होणे

>> शिरीष कणेकर

लेख म्हणून खपून जाईल असा लांबलचक मेल किंवा मोबाईलवरील मेसेज वाचण्याच्या फंदात सहसा मी पडत नाही. तेवढा ‘पेशन्स’ माझ्याकडे आता नाही. आपल्याकडे कमी वेळ राहिलाय या जाणिवेचं हे द्योतक आहे की काय कोण जाणे! तुम्हाला जे काही सांगायचंय ते थोडक्यात सांगता येत नाही का? तुमची हौस एवढी उतू चालली असेल तर थेट कादंबरीच लिहा नं. त्यासाठी मेल आणि मेसेज कशाला वापरताय? नाना पाटेकर मला म्हणेल, ‘‘कंट्रोल-कंट्रोल…’’

परवा एक मोठा ‘मेसेज’ मात्र मी संपूर्ण वाचला. तो बालगंधर्वांच्या संदर्भात होता म्हणून की काय कुणास ठाऊक! दरवेळेला आपल्या वागण्याची पटण्यासारखी कारणे देता येतातच असे नाही. दुसऱ्याला नाही आणि स्वतःलाही नाही.

(कै.) वसंत शांताराम वैद्य या माहितगार व अभ्यासू माणसानं ‘विचित्र विश्व’ या मासिकात 1985 सालच्या जुलै महिन्याच्या अंकात बालगंधर्वांच्या अखेरच्या काळावर एक विदारक लेख लिहिला होता. तो कोणीतरी ‘व्हॉटस् अॅप’वर टाकला. एका महामानवाची परवड, फरफट व अवहेलना वाचवत नव्हती. त्यांचं असं होऊ शकतं तर तुमची आमची काय कथा! हा विचार मनाला डंख मारीत राहिला.

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व हे मराठी संगीत रंगभूमीला पडलेलं मधूर स्वप्न होतं. ते स्वप्नाप्रमाणेच विरून गेलं. त्यांच्या पुण्यातील एका प्रयोगाला लोकमान्य टिळक उपस्थित होते. नाटक पाहून ते उत्स्फूर्तपणे म्हणाले – ‘‘अरे, हा तर बालगंधर्व!’’ त्या दिवसापासून नारायणराव बालगंधर्व झाले ते कायमचे. ती टिळकांनी दिलेली उपाधी होती. कोणा फटीचर ब्लॉग काँग्रेस कमिटीत लटपटी करून मिळवून दिलेली ‘पद्मश्री’ नव्हती. ती काय सैफ अली खानलाही मिळते.

‘मानापमान’, ‘स्वयंवर’, एकच प्याला’, ‘संगीत शारदा’, ‘मृच्छकटिक’… बालगंधर्व स्त्रीभूमिका समस्त मराठी मनांवर छा गये. नुसता ऑर्गन वाजला तरी येणाऱया अद्भुत संगीतानंदाच्या चाहुलीत अवघ्या नाटय़गृहात थरार पसरायचा. बालगंधर्वांच्या नुसत्या ‘एंट्री’ला प्रेक्षकांना उचंबळून येई.

कविवर्य ग. दि. माडगुळकरांचे शब्द वाचा-
जसा जन्मतो तेज घेऊन तारा
जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई घेऊन कंठात गाणे
असा बालगंधर्व आता न होणे

रतीसारखे ज्याला रुपलावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे
सुधेसारखा स्वाद, स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे

मी बालगंधर्वांना रंगभूमीवर व निवृत्त विकलांग अवस्थेतही बघू शकलो नाही. 15 जुलै 1967 रोजी ते गेले तेव्हा नाटय़ संगीताची थोरवी कळण्याचं माझं वय नव्हतं. नंतर पुढे केव्हातरी एस. पी. कॉलेजच्या प्रांगणात असलेल्या लेडी रमाबाई हॉलमध्ये पु. ल. देशपांडेंचं बालगंधर्वांवरील रसिलं भाषण ऐकण्याचा योग आला. मला तिकडे जाण्याची देवानं बुद्धी दिली याबद्दल मी देवाचा ऋणी आहे. एका फार मोठ्या माणसाबद्दल दुसरा फार मोठा माणूस बोलत होता. आजकाल दोन्हीही सापडत नाहीत. महात्मा गांधींवरील आपल्या त्रिभाषण धारेत शेवटी आचार्य दादा धर्माधिकारी म्हणत, ‘‘हे जग मूर्ख माणसांनी घडवलंय. या मूर्खांचा शिरोमणी होता मोहनदास करमचंद गांधी.’’ अंगावर सरसरून काटा यायचा, डोळय़ांच्या कडा नकळत ओल्या व्हायच्या…

मी रुसी करंजियाच्या ‘द डेली’मध्ये असताना बालगंधर्वांना शालू नेसवणाऱ्या ननावरे नावाच्या माणसाची मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली. तो हाडाचा सापळा उरला होता. जखमी हरणासारखे त्याचे नेत्र अस्थिर होते. पंजाची नुसती हाडं राहिली होती, पण याच हातांनी तो हळुवारपणे बालगंधर्वांना चोपून-चापून शालू नेसवायचा. दोन-दोन, तीन-तीन तास लागायचे. कुठे एक सुरकुती दिसता कामा नये. असंख्य पिना लावाव्या लागत. सगळा जामानिमा झाल्यावर एका ताम्हणात ‘कनोज’ अत्तराच्या बाटल्या ओतल्या जात. मग ननावरे त्यात दोन्ही हात सावकाश बुचकळत व बाहेर काढून नाजूकपणे बालगंधर्वांच्या अंगातल्या शालूवरून फिरवीत. बालगंधर्व रंगमंचावर आले की, नाटय़गृहात अत्तराचा घमघमाट पसरायचा. तो दरवळ अत्तराचा आहे, त्यांच्या लावण्याचा आहे की स्वर्गीय आवाजाचा हेच प्रेक्षकांना कळत नसे.

कालचक्र फिरले. वय झालं, गाणं संपलं, रंगभूमी दुरावली. ऐश्वर्य रसातळाला गेलं. ज्या कंपनीत पेशवाई थाटाच्या भोजनाच्या पंक्ती झडत, तिथं खुद्द बालगंधर्वांचे खायचे वांधे आले. कर्जाचे डोंगर वाढत गेले. गोहरजान या गुणी यवनी कलावतीशी लग्न केल्याबद्दल व त्यासाठी धर्म सोडल्याबद्दल सनातनी मंडळींचा कमालीचा रोष बालगंधर्वांनी ओढवून घेतला होता. ती पतिव्रतेसारखी त्यांची सेवा करीत होती, पण समाज दुरावला होता.

वसंत शांताराम वैद्य त्यांच्या लेखात सांगतात की, या हलाखीच्या काळातही सोलापूरकरांची बालगंधर्वांवरची भक्ती कमी झाली नव्हती. त्यांना मदत व्हावी म्हणून सोलापूरवाले त्यांचे सत्कार करीत व त्यांना थैल्या देत. अशाच एका सत्कारात त्यांना दिलेली थैली परस्पर विंगेत उभ्या असलेल्या सावकाराकडे गेली. कर्जाची परतफेड म्हणून. सत्काराला उत्तर देताना विकलांग बालगंधर्व हात जोडून थरथरत्या आवाजात म्हणाले, ‘‘जोहार मायबाप जोहार. मी तुमचं उष्ट खाणारा xxx आहे…’’

मला पुढे वाचवेना. आता नाही हो असं काही सहन होत. या सत्यावाचून आमचं काहीही अडलेलं नाही. शांतपणे जगू द्या आणि शांतपणे मरू द्या. बालगंधर्वांचे शब्द माझ्या कानात दाभणासारखे घुसलेत त्यांचं काय करू?…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या