
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
आपण काळे, गोरे अशी त्वचेच्या रूपाची चर्चा करत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या अंतरंगातील सौंदर्याला महत्त्व द्यायला पाहिजे. कारण रंगरूप हे चार दिवसांचं असतं. कधी ना कधी त्या रूपावर वृद्धत्वाच्या खुणा उमटणारच. खरं तर निसर्गाने आपल्याला जो वर्ण दिला आहे तो वर्ण म्हणजे उणीव नव्हे, ज्यामुळे ती आपल्याला भरून काढावी लागेल. खरं तर हाच वर्ण आपली ओळख झाली पाहिजे.
अनेक अभिनेत्री आपल्या व्यवसायाची गरज म्हणून अलीकडे स्किन लाइटनिंगची ट्रीटमेंट घेत असतात. त्यानुसार आपल्या त्वचेला गोरं बनवत असतात. अनेक वेळा निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपल्या त्वचेमध्ये आपण केलेली ढवळाढवळ ही आपल्याला त्रासदायकही ठरू शकते. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना या ट्रीटमेंट्स परवडतात, तर ज्यांच्याकडे या ट्रीटमेंटसाठी पैसे नाहीत अशा व्यक्ती मग घरगुती उपाय किंवा काही कमी पैशांतले उपचार आपल्या त्वचेवर करत असतात. असे उपचार घेताना मात्र आपण आपल्या त्वचेशी खेळत असल्यामुळे त्यासंदर्भात डॉक्टरचा सल्ला घेणं जास्त योग्य ठरू शकेल. महागडय़ा ट्रीटमेंट घेणं सगळय़ांना परवडत नाही, तर काहींना ते आवडतही नाही. त्यासाठी मेकअपचा वापर केला जातो आणि मेकअप करून आपल्या त्वचेचा रंग उजळविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे त्वचेची फार हानी न होता काही काळापुरता हा मेकअप ठेवून आणि आपल्याला पाहिजे ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर आपण हा मेकअप उतरवू शकतो. त्यामुळे त्याचे जास्त प्रमाणात तोटे दिसत नाहीत.
सावळय़ा रंगाचा मेकअप करताना काळजी घ्यावी लागते. कारण बऱयाच वेळा जर योग्य प्रकारचे फाऊंडेशन या रंगाला वापरले गेले नाही, तर मात्र हा रंग चॉकी दिसतो आणि मेकअप अगदी थापल्यासारखा दिसतो. तर तसे होता कामा नये.
बाजारात या डस्की स्किनसाठी काही स्पेशल फाऊंडेशन मिळतात. फक्त तुमच्या स्किनला योग्य असं फाऊंडेशन निवडून ते तुम्ही लावू शकता. बेज, डार्क चॉकलेट, डार्क सॅड, ब्राऊनी अशा वेगवेगळय़ा शेड्स या रंगासाठी येतात. त्यातील आपल्या रंगाला योग्य अशी शेड आपल्याला निवडावी लागते.
सावळय़ा रंगाचा मेकअप करताना प्रथम तुम्ही क्लिनिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करून त्यानंतर त्यावर योग्य प्रायमर लावा. हे प्रायमर लावल्यानंतर तुम्ही त्यावर तुमच्या स्किन टोनला मॅच होईल अशा फाऊंडेशनचा वापर करा. नेहमी फाऊंडेशन लावायच्या अगोदर तुम्ही करेक्टर लावून तुमच्या चेहऱयावरील डाग, पिग्मेंटेशन याला प्रथम फील करून घ्या तुमच्या चेहऱयावर जर काही छिद्रं असतील तर तीही योग्य रीतीने भरून घ्या. नंतर त्यावर फाऊंडेशनचा वापर करा. पावडरचा वापर करताना तुम्ही डार्क टोनसाठीची लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट वापरा. बनाना पावडरही वापरू शकता. कॉटुरिंगसुद्धा सावळय़ा त्वचेच्या मेकअपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. त्यामुळे तुमच्या चेहऱयावरील उंचवटे हायलाइट करा.
डोळय़ांच्या मेकअपकडे जास्त लक्ष द्या. कारण सुंदर डोळे सावळय़ा मुलींना आणखी आकर्षक लुक देतात. सावळय़ा रंगावर जर स्मोकी आयचा मेकअप करायचा असेल तर तुम्ही काळय़ा रंगाचा वापर न करता थोडा ब्राऊन स्मोक, ग्रे स्मोक, थोडा रेड किंवा चेरी रेड यांसारखे आर्थि कलर्स तुम्ही जर वापरले किंवा काही कोरल रंगांचा वापर केला तर तुमचे डोळे जास्त आकर्षक वाटू लागतील.
ब्रॉझरचा वापर तुमच्या चेहऱयावर करा. कारण ब्रॉझर हा चेहऱयाला फ्रेश आणि ग्लोइंग लुक देण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. लिपस्टिकचा वापर करताना तुम्ही प्लम, पिंक, कॉफी, डार्क बेरी अशा शेड्स वापरा. ब्लशसाठी अशा ब्लशचा वापर करा जे सावळय़ा स्किन टोनवर चांगले वाटतील. यासाठी ऑरेंज, पीच, कोरल असे शेड्स तुमच्या सावळय़ा त्वचेसाठी परफेक्ट असतील.

























































