रंग रंगीली होळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट), [email protected]

पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा होळी सण प्रत्येकाच्या मनात नवनवीन रंग भरण्याचे काम करीत असतो. आपला आनंद या रंगाने साजरा करत असताना इतरांचा रंग बिघडणार नाही किंवा फिका पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

होळी म्हटले की, प्रथम नजरेसमोर येतात ते इंद्रधनुष्याचे सप्तरंग. रंगीबेरंगी रंगात न्हाऊन निघालेला हा सण म्हणजे होळी. महाराष्ट्रात फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्यपंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्याची प्रथा आहे. हा सण मोठय़ा आनंदाने, उत्साहाने सगळीकडे साजरा केला जातो. होळी प्रत्येक राज्यात वेगवेगळय़ा पद्धतीने साजरी केली जाते. तसेच त्या त्या राज्याप्रमाणे या सणाचे महत्त्वही तेवढेच असते. पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा सण प्रत्येकाच्या मनात नवनवीन रंग भरण्याचे काम करीत असतो. पूर्वी राजे, महाराजे आपल्या राजवाडय़ातील उद्यानातून सर्वांसह रंगपंचमी साजरी करत असत.

महाराष्ट्रात होळी पेटवून होळीभोवती रांगोळी काढून होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. महिला व पुरुष विधीयुक्त पूजन करून होळीसमोर गाऱहाणी घालून वाईट विचारांना, वृत्तीला होळीच्या अग्नीत दहन करून मन निर्मळ करण्यासाठी देवाकडे साकडे घालत असतात.

पौराणिक कथेप्रमाणे होलिका राक्षसणीचा होळीमध्ये नाश होतो व भक्त प्रल्हाद जिवंत बाहेर येतो. याचाच विजय म्हणून होळी पेटवून होलिका दहन केले जाते. या कथेप्रमाणेच होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय प्राप्त करणे होय.

पश्चिम बंगालमध्ये ‘गौरव पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा केला जातो, तर गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा सण अगदी आनंदात उत्साहात साजरा केला जातो, तर कोकणामध्ये होळीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोकणामध्ये विजय उत्सव म्हणून देवाची पालखी प्रत्येक घरात फिरविण्याची पद्धत असल्यामुळे कोकणवासीय होळीसाठी गावाकडे धाव घेत असतात. महिला नटून थटून वेगवेगळय़ा रंगांच्या साडय़ा नेसून त्यावर नथ, झुमके, हार असा साजशृंगार करून होळीचे पूजन करण्यासाठी बाहेर पडतात, तर काही ठिकाणी पुरुषांच्या वेशातील स्त्र्ााrपात्र गाणी गाऊन, खेळे खेळून या सणाचा आनंद लुटतात. होळी हा सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठीसुद्धा साजरा केला जातो. झाडेझुडपे, कडक उन्हाळा आणि हिवाळा सोसून वसंताची वाट पाहत असतात.

होळीत वाईट गोष्टींचा, वृत्तींचा नाश केल्यानंतर दुसऱया दिवशी आपल्याकडे रंगपंचमी साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे विविध रंगी जीवनाचे आणि आनंदाचे प्रतीकच आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात व नैसर्गिक, रासायनिक कोरडय़ा रंगांचा वापर करून, तर काही ठिकाणी हळदीपासून काही फळांपासून तसेच पळसाच्या झाडाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग बनवून रंगपंचमी साजरी करतात.

अनेक वेळा आपल्या त्वचेवर रंगांचा परिणाम होत असल्यामुळे काही ठिकाणी हीच रंगपंचमी इको-फ्रेंडली रंगपंचमी म्हणूनही साजरी केली जाते. सगळय़ांना एकत्रित आणणारा हा सण आहे. त्यामुळेच ही रंगीबेरंगी होळी आणि रंगपंचमी साजरी करताना कुठलीही वाईट गोष्ट करून आपल्याच मनातील आपल्या मनाचे रंग उडणार नाहीत, याची काळजी जरूर घेतली पाहिजे. तसेच आपला आनंद या रंगाने साजरा करत असताना इतरांचा रंग फिका पडणार नाही किंवा बिघडणार नाही याची काळजी घेतली तर या सणाचा आनंद जास्त द्विगुणित होईल.