
>> शुभांगी बागडे
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठी नाटय़सृष्टीला दीर्घकालीन नुकसान सहन करावे लागणार आहे. मात्र या परिस्थितीतून मार्ग काढत, कोरोनानंतरच्या काळात नाट्यसृष्टीला सावरण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि नाटय़सृष्टीला आता नेमक्या कोणत्या सुधारित धोरणांची आवश्यकता आहे याचा आराखडाच ज्येष्ठ नाटय़ कलाकार आणि निर्माता प्रशांत दामले यांनी मांडला आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीत सगळेच भरडले गेले असले तरी याचा सर्वात मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार आणि या उद्योगाशी निगडित सर्व छोटेमोठे व्यवसाय असे सर्वच अडचणीत आले होते. मागील वर्षीच्या लॉक डाऊन काळात जवळपास नऊ महिने ही मनोरंजन सृष्टी बंद अवस्थेत होती. कोरोनाची पहिली लाट काही अंशी कमी होत गेली आणि मनोरंजन सृष्टीदेखील नव्या जोमाने रसिकांसाठी उभी राहिली. यात प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संबंध येणाऱया नाटय़सृष्टीनेही आवश्यक ते सर्व बदल केले आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांसह नाटय़गृहात प्रयोग सादर होऊ लागले. खरंतर पहिल्या लॉक डाऊननंतर नाटय़सृष्टी अजून म्हणावी तशी काही सुरळीत झाली नसतानाच कोरोनाच्या दुसऱया लाटेने कहर माजवला. लॉक डाऊनमधील कडक निर्बंध जाहीर होताच नाटय़गृहे बंद झाली आणि अगदी काही दिवसांपूर्वीच पूर्ववत होऊ पाहणारं हे क्षेत्र पुन्हा एकदा ठप्प झालं.
मागील वर्षभरापासून बंद असणारी नाटय़गृहं साधारण 2-3 महिन्यांपासून सुरू झाली होती. या काळात प्रेक्षकांचा प्रतिसादही लाभला. परंतु नाटय़ प्रयोगावरील बुकिंगचे गणित तितकंसं रुळावर आलं नव्हतं. याची कळ त्या त्या प्रॉडक्शन हाऊसमधील प्रत्येकालाच सोसावी लागली. मात्र यात खरा भार सोसावा लागला तो निर्मात्याला. कोरोनासंदर्भातील निर्बंध, प्रेक्षकांची बदललेली मानसिकता हे सारं विचारात घेत, नव्या आव्हानांची जोखीम घेत काही निर्मात्यांनी नाटकाच्या प्रयोगांना सुरुवात केली. ही आर्थिक जोखीम अर्थातच फार काळ परवडणारी नव्हती. यात आपल्या संस्थेतील कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांची जबाबदारीही असते. किमान काही प्रयोग झाल्यास या सर्व घटकांचं आर्थिक उत्पन्न सुरू होईल हा उद्देशही पुन्हा प्रयोग सरू करण्यामागे होता. परंतु आता कोरोनाच्या दुसऱया आणि येऊ घातलेल्या तिसऱया लाटेने नाटय़निर्मात्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत नाटकांचं गणित जुळवणं अवघडच. परंतु हा काळ ओसरल्यानंतर नाटक व्यवसाय पुन्हा नव्या दमाने उभा राहावा यासाठीही आत्ताच प्रयत्न होणे गरजेचे आहेत. नाटय़ क्षेत्राला सध्या आर्थिक आधाराची जितकी गरज आहे तितकीच या क्षेत्रातील प्रत्येक घटकाबाबत, भविष्याबाबत शासनाने योग्य विचार करण्याचीही आहे. कोरोनानंतरच्या काळात नाटय़ क्षेत्राला आर्थिक साहाय्यासोबतच ठोस धोरणांच्या अंमलबजावणीचीही आवश्यकता आहे.
कोरोनानंतरच्या काळात नाटय़सृष्टीला सावरण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि नाटय़सृष्टीला आता नेमक्या कोणत्या सुधारित धोरणांची आवश्यकता आहे याचा आराखडाच ज्येष्ठ नाटय़ कलाकार आणि निर्माता प्रशांत दामले यांनी मांडला आहे… ‘‘कोरोनाचा हा काळ प्रत्येकाचीच मानसिक आणि आर्थिक परीक्षा पाहणारा आहे. या काळात खंबीर राहणं, सकारात्मक राहणं हे एक आव्हानच आहे. यामुळेच कुठेही संतुलन ढळू न देता परिस्थितीवर नेमका उपाय काय हे शोधणं हाच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. सध्या प्रत्येक क्षेत्राला कोरोनाशी सामना करावा लागत आहे. मनोरंजन क्षेत्राला तुलनेने अधिक सामना करावा लागत आहे. अशा वेळी शासनाकडून मदतीची अपेक्षा करणं स्वाभाविक आहे. परंतु त्याहीपुढे जाऊन ही मदत दीर्घ काळापर्यंत मिळत राहील अशी असल्यास त्याचा चांगला परिणाम मराठी नाटय़सृष्टीवर होईल असे वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनाची दुसरी व तिसरी लाट ओसरेलही. परंतु यानंतरचा काळ नाटय़ प्रयोग करण्यास अनुकूल असेल असे नाही. प्रेक्षकांना नाटय़गृहापर्यंत आणणं आव्हानात्मक ठरेल. त्यांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांनाही वेळ देणं गरजेचं आहे. याबरोबरच नाटय़ क्षेत्राच्याही काही मर्यादा याच्या आड येऊ शकतात. जून, जुलैपासून पावसाळा व त्यानंतर येणारे सण यामुळे प्रयोग बंद असतात किंवा तुरळक असतात. या 5-6 महिन्यांच्या कालावधीनंतर म्हणजे नोव्हेंबरपासून नाटय़सृष्टी खऱया अर्थाने सुरू होईल. यानंतरही केवळ 4 महिनेच प्रयोग होतील. त्यामुळे तग धरून राहण्यासाठीचा हा काळ आणि यानंतरचा काळ याचा विचार करता फेब्रुवारी 2023पर्यंतची तजवीज आपण करणं गरजेचं आहे. यासाठी काही गोष्टी आपण निश्चित करू शकतो. किंबहुना या मदतीची वा अशा प्रकारच्या कार्यवाहीची अपेक्षा नक्कीच आहे. या अनुषंगानेच शासनाने नाटय़सृष्टीला देऊ केलेल्या सवलतींमध्ये काही अपेक्षित बदल केल्यास, त्यात लवचिकता आणल्यास आणि काही सवलती नव्याने देऊ केल्यास कोरोनानंतरच्या काळात नाटय़सृष्टी पुन्हा उभारी घेण्यास सज्ज होईल.’’
2021 मध्ये पावसाळा, दिवाळी, दसरा, गणपती, नवरात्र असे 6 महिने आणि 2022 मधले असेच 6 महिने सर्व स्थिरसावर होण्यात जाणार आहे. म्हणून खालील उपाययोजना डिसेंबर 2023 पर्यंत करणे गरजेचे आहे. यासाठी पुढील आठ सूत्री धोरणांचा आराखडा मांडला आहे.
वर्तमानपत्रातील जाहिराती
नाटकाच्या जाहिरातीसाठी, महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांनी सवलत दिली आहे. साधारण दिवाळीनंतर या जाहिराती येऊ लागल्या. जाहिरातीसाठीची ही सवलत फेब्रुवारी 2023पर्यंत तशीच ठेवावी. त्याच सवलतीच्या दराने वर्तमानपत्रात मराठी नाटकांच्या जाहिराती छापल्या जाव्यात.
नाटय़गृह भाडय़ात सवलत
कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर आता तिसऱया लाटेचीही चर्चा आहे. शिवाय मधल्या काळात पाऊस, वेगवेगळे उत्सव यामुळे प्रेक्षक नाटकांकडे फारसा फिरकणार नाही. तेव्हा नाटय़गृहांकडून भाडय़ात दिलेली सवलत फेब्रुवारी 2023पर्यंत तशीच ठेवावी. हे भाडे अल्प दराने असावे म्हणजेच 2000 रुपये हा दर यासाठी आकाराला जावा. सर्व नाटय़गृह पुन्हा एकदा सॅनिटाईझ करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
शासकीय विश्रामगृह
मराठी नाटक सर्वदूर जाण्यासाठी काही विशेष गोष्टी कराव्या लागतील. नाटक मुंबई, पुणे, नाशिक या भागांपुरतं मर्यादित न राहता विदर्भ, खान्देश, कोकण, मराठवाडा या भागांपर्यंत पोहोचावं यासाठी काही विशेष गोष्टी कराव्या लागतील. या सर्व भागांमध्ये महाराष्ट्र शासनाची निवासस्थानं आहेत. ही शासकीय निवासस्थानं फेब्रुवारी 2023पर्यंत अल्प दरात नाटक व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून द्यावीत. मुंबई-पुण्याबाहेर नाटक घेऊन गेले की राहण्यावर बराच खर्च होतो. त्यामुळे नाटय़कर्मींसाठी ही दिलासादायक गोष्ट असेल.
टोलमाफी
सध्या 31 डिसेंबर 2021पर्यंत जी टोलमाफी देण्यात आली आहे तो कालावधी पुढे वर्षभरापर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2022पर्यंत वाढवावा.
नाटकांच्या बसेसची वयोमर्यादा
आपल्याकडे नाटकाच्या साधारण 12-14 बसेस आणि 8-10 टेम्पो आहेत. केंद्र सरकारच्या नियमानुसार या वाहनांचा आयुष्य मर्यादा कालावधी 8 वर्षांचा आहे. हा नियम नियमित प्रवास करणाऱया प्रवासी गाडय़ांसाठी लागू होतो; परंतु नाटकाची बस इतका प्रवास करत नाही. साधारण 35-40 लाख खर्च करून घेतलेल्या बसचा मर्यादा कालावधी लवकर संपतो. यासाठी घेतलेलं कर्जही तोपर्यंत फेडले जात नाही. निर्मात्यांसाठी हे मोठं नुकसानच आहे आणि नाटकाच्या टेम्पोमधून फक्त नाटकाचे सेट्स आणि बाकीच्या सामानाचीच वाहतूक होते. त्यामुळे परिवहन विभागाने नाटकांच्या बसेस व टेम्पोचा मर्यादा कालावधी आणि नाटकाची बस मुंबईत आणण्याचा मर्यादा कालावधी 15 वर्षांचा करावा ही अपेक्षा आहे.
बस व टेम्पो पार्किंग आणि नाटकाचे सेट्स ठेवण्याची जागा
नाटकाच्या बसेस व टेम्पोच्या पार्किंगच्या मुद्दय़ाचा उल्लेख अनिवार्य आहे. सध्या नाटकांच्या बसेस आणि टेम्पो बीपीटीच्या जागेत पार्क केल्या जातात. यासाठी प्रतिमहिना प्रत्येक बसमागे 4000 रुपये व 3500 रुपये टेम्पोसाठी इतके भाडे आकारण्यात येते. प्रयोग सुरू नसल्यास हे भाडे परवडणारे नाहीच. सध्या उत्पन्न शून्य असताना गाडय़ांची देखभाल आणि वाहनतळाच्या खर्चापोटी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. तेव्हा गाडय़ांच्या पार्किंगसाठी हक्काची जागा हवी. हक्काची जागा मिळाल्यास निर्मात्यावरचा ताण कमी होईल. नाटकाच्या नेपथ्याचे व इतर सामान ठराविक ठिकाणी ठेवले जाते. परंतु ते सुरक्षित नसल्याने नाटकाचे सामान भिजून दरवर्षी 25-30 लाखांचे सेट खराब होतात. म्हणूनच नेपथ्यासाठी अशा सुरक्षित जागा देण्याबाबत शासनाने विचार करावा. ज्या ठिकाणी बस आणि टेम्पोचे पार्ंकग आहे तिथेच जर गोडाऊनची जागा उपलब्ध करून दिली तर वेळ, श्रम आणि इधनाचीही बचत होईल..
3/4 वर्ष रखडलेले निर्मात्यांचे अनुदान
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या निर्मात्यांना अनुदान जाहीर झालं आहे ते लवकरात लवकर देण्यात यावं. अनेक निर्मात्यांची त्यांच्या नाटकांसाठी जाहीर झालेली अनुदानं तीन-तीन वर्षे थकलेली आहेत. ही अनुदानं वेळेवर मिळाल्यास निर्मात्यांसाठी तो एक आधारच ठरेल. सध्याच्या परिस्थितीत शासनाकडून मदत मिळणं कितपत शक्य आहे याचा अंदाज नाही, परंतु किमान या उल्लेखलेल्या गोष्टींची पूर्तता झाल्यास निश्चितच नाटक व्यवसायाला त्याचा हातभार लागेल.
प्रायोगिक रंगभूमी
प्रायोगिक रंगभूमी ही क्याकसायिक रंगभूमीचा पाया आहे त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीसाठी आपण नक्याने काही करू शकतो का ह्याचाही अग्रक्रमाने किचार क्हाका.
नोव्हेंबरपासून जेव्हा नाटक व्यवसाय खऱया अर्थाने मार्गावर येण्यास सुरुवात येईल तेव्हा या सवलतींचा आधार मिळाल्यास नाटक व्यवसायाला उभारी मिळेल. मराठी नाटय़सृष्टी लॉकडाऊनमुळे पुन्हा कोलमडली आहे. रंगमंच कामगार, निर्माते आणि कलाकार सारेच पुढे काय हे प्रश्नचिन्ह घेऊन वावरत आहेत. मात्र असे असले तरी हा काळ ओसरल्यानंतर नव्या नियमांसह सुरुवात करताना मराठी नाटय़ क्षेत्र पूर्वपदावर आणण्यासाठी शासनाच्या मदतीची नितांत गरज आहे. या काळात नाटय़ क्षेत्राला आधारभूत ठरणाऱया गोष्टींची ठोस अंमलबजावणी होणं, अनुकूल धोरणांचा कार्यकाळ वाढवणं आणि आवश्यक गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. आत्ताच काही ठोस निर्णय घेतले गेले तर मराठी रंगभूमीची इतक्या वर्षांची परंपरा पुढे चालू राहील नाहीतर या कोरोनात रंगभूमीचाही बळी जाईल हे निश्चित.





























































