संघर्षमय टप्प्याचे कथन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सोपान खुडे 

हिंदुस्थानमध्ये मानवनिर्मित जातव्यवस्था असल्यामुळे प्रचंड मोठा जनसमूह सर्व दृष्टीने मागासलेला होता. पशुपातळीवरील जीवन त्याच्या वाट्याला आलेले होते. त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी, विषमता नष्ट करून समता स्थापन करण्यासाठी युगप्रवर्तक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या समाज व्यवस्थेविरुद्ध संघर्ष सुरू केला होता. अस्पृश्यांच्या हक्कांसाठी सत्याग्रह केले. आंदोलने, चळवळी केल्या. या सर्वांमध्ये ‘पुणे करार’ हा एक त्यांच्या संघर्षमय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे.

तो काळ पारतंत्र्याचा होता. आपल्या देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. 17 सप्टेंबर 1932 रोजी गोलमेज परिषदेचे अध्यक्ष इंग्लंडचे पंतप्रधान मॅकडोनल्ड यांनी जातीय निवाडा प्रसिद्ध केला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिश्रमपूर्वक तयार केलेली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी तत्त्वतः मंजूर करण्यात आली होती. या जातीय निवाड्याने अस्पृश्यांना दुहेरी मतदानाचा अधिकार मिळाला होता. म्हणजे त्या मतदारसंघात दोन उमेदवार असतील एक अस्पृश्यांचा अन् दुसरा सवर्णांचा. अस्पृश्यांनी अस्पृश्य उमेदवाराला आणि सवर्ण उमेदवाराला मतदान करायचे. सवर्णांनी फक्त सवर्ण उमेदवारालाच मतदान करायचे. त्यांनी अस्पृश्य उमेदवाराला मतदान करायचे नाही. अस्पृश्यांना आपला उमेदवार निवडून देण्याचा अधिकार मिळालेला होता. असे एकूण 71 मतदारसंघ अस्पृश्यांच्या वाट्याला आले होते. हा जातीय निवाडा गांधीजींच्या जिव्हारी लागला होता. त्यांना हा निर्णय मान्य नव्हता. या निर्णयाविरुद्ध त्यांनी 20 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केले नि सुरू झाला गांधी-आंबेडकर संघर्ष. या नाट्यमय संघर्षावर प्रभाकर ओव्हाळ यांनी छोटेखानी कादंबरी लिहिलेली आहे. कादंबरीचे नाव आहे ‘असा झाला पुणे-करार’.

ओव्हाळ हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी यापूर्वीही आंबेडकरी चळवळीला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल असे लेखन केलेले आहे. पुणे करार तसा समजून घ्यायला नि समजून सांगायलाही क्लिष्ट विषय आहे, पण ओव्हाळ यांनी कुणालाही समजेल अशा साध्या, सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे. कादंबरीचे कथानकच उत्कंठावर्धक असल्यामुळे वाचक पुढे पुढे वाचत राहतो. पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या खणखणीत आवाजात अस्पृश्यांच्या व्यथा-वेदना मांडतात. या प्रसंगापासूनच कादंबरी आपल्या मनाची पकड घेते.

गांधीजी उपोषणाला बसल्यानंतर आता पुढे काय होईल या उत्सुकतेपोटी आपण त्या कादंबरीमध्ये गुंतत जातो. गांधीजी उपोषणाला बसले होते त्यावेळी त्यांनी साठी ओलांडलेली होती. त्यांची तब्येत खालावत चाललेली होती. तरीही ते आपल्या विचारांवर ठाम होते. साऱ्यांचेच लक्ष डॉ. आंबेडकर काय निर्णय घेतात याकडे लागले होते. गांधीजींचे प्राण वाचवावेत का आपल्या विचारांवर ठाम राहावे अशी डॉ. आंबेडकरांची द्विधा अवस्था झालेली होती. हा कादंबरीचा परमोच्च बिंदू आहे. यातील सर्वच घटना प्रसंग लेखकाने आत्मीयतेने लिहिलेले आहेत. या संघर्षामध्ये गांधी-आंबेडकर ही दोनच पात्रे महत्त्वाची आहेत. दोघांचेही चित्रण लेखकाने तटस्थपणे समतोल बुद्धीने केलेले आहे. हे तर या कादंबरीचे यश आहे.

असा झाला पुणे करार
लेखक – प्रभाकर ओव्हाळ
प्रकाशन – प्राजक्त प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या – 128, मूल्य – रु. 150/-
सोपान खुडे