
>> सुहास मळेकर
‘मम्मी, पप्पांनी बघ चांगले पेरू स्वतःसाठी काढून ठेवलेत!’
त्याला आठवलं, ‘आपण पंधरा-सोळा वर्षांचे होतो तेव्हा वडिलांनी एकदा कामावरून येताना बाजारातून पेरू आणले. आई म्हणाली, ‘धुऊन घे व्यवस्थित!’
आपण ते खाण्यासाठी उतावीळपणानं हातात घेतले, पण वडिलांनी आधी त्यातून पिकलेले दोन-तीन पेरू निवडून बाजूला काढून ठेवले. आपल्याला वडिलांचं हे वागणं कधी कधी अनाकलनीय वाटायचं. कधीतरी रागसुद्धा यायचा…
तो मनात म्हणाला, वडील आणि मुलांमध्ये सुसंवाद असल्यामुळे तसा स्पष्टवक्तेपणा होता. तरी वडील मर्यादा पाळत असत. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन, योग्य तिथे रागे भरीत आणि योग्य तिथे ते दिलखुलास दाद देत असत. कधीही काही खायला आणलं की, वडील पारखून निरखून स्वतःसाठी आधी बाजूला काढून मुलांपासून ते लपवून ठेवीत. हा तर निव्वळ त्यांचा स्वार्थ वाटत होता. ‘त्या तरुण वयात आमच्या बुद्धीची झेप तितकीच होती’ तो मनात म्हणाला.
‘पाखरांनी पिलांसाठी चोचीत धरून काहीबाही आणायचं आणि ते पिलांना भरवायचं’ इतकंच मुलांना ठाऊक असतं. पुष्कळदा असं झालं, ‘वडिलांनी काहीतरी आणायचं, आईने धुऊन खा म्हणायचं, वडिलांनी त्यातलं आधी निवडून स्वतःसाठी घ्यायचं…’
‘आपण सर्वात लहान. ते बघून हातपाय आदळआपट करीत असू’ तो मनाशी केविलवाणं हसला. एकेदिवशी तसे बाजूला काढून ठेवलेले पेरू खाताना त्याने वडिलांना पाहिलं. बराचसा खराब भाग त्यांनी काढून टाकून देऊन ते संपवले. तेव्हासुद्धा आपण त्यांना चिडवलं, ‘तसेच पाहिजे तुम्हांला… आधी तुम्ही चांगले पेरू निवडून घेतलेत ना?’
वडिलांनी गालातल्या गालात हसत तेव्हा फक्त ‘हो’ म्हटलं होतं.
नंतर ते म्हणाले, ‘तुला ते कळण्यासाठी अजून पंधरा वर्षे जातील!’
खरंच आपण मूर्ख होतो का तेव्हा! कारण तेव्हा कळलं नाही, पण त्यांनी म्हटलेलं कायम लक्षात राहिलं. आज त्यानं तसेच पेरू आणले. दोन जास्त पिकलेले, त्यापैकी एकात अळय़ा पडलेल्या असाव्यात. त्यानं ते आधी घाईने बाजूला काढून घेतले आणि बाकी चांगले असलेले बायको-मुलांसाठी ठेवले. त्याच्या धाकटय़ा मुलाने ते पाहिलं, ‘मम्मी, पप्पांनी बघ चांगले पेरू स्वतःसाठी काढून ठेवलेत!’
आज आपणसुद्धा तसेच हसलो वडिलांसारखे गालातल्या गालात.
‘तुला ते कळण्यासाठी अजून पंधरा वर्षे जातील!’ त्याच्या मनात आलं.
‘तूसुद्धा मुलांचा बाप होशील तेव्हा तुला कळेल!’ असं तेव्हा वडिलांना सांगायचं होतं.
बाप समजायला बापच व्हावं लागतं, हेच खरंय!



























































