लेख : महाराष्ट्र मरेल तर कोण जगेल?

>> वैजनाथ महाजन

महाराष्ट्रात जे आज घडते ते पन्नास वर्षांनी अन्य प्रांतात घडते असे म्हटले जाते. यातूनच मराठी वृत्तपत्रांची परंपरा, लोकोत्तर समाजसुधारकांची परंपरा आणि पांडुरंगाची ओढ यातून मराठी माणूस घडत आला आणि त्याने संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. अनेक हुतात्मे झाले हे खरेच आहे. पण आज महाराष्ट्राकडे मागे वळून पाहताना असे वाटते की, महाराष्ट्र मरेल तर कोण जगेल? हेच खरे वाटते.

हिंदुस्थानातील अन्य सर्व प्रांतांना भूगोल आहे, पण महाराष्ट्राला त्या भूगोलाबरोबरच उज्ज्वल असा इतिहास आहे आणि हा इतिहास केवळ सनावळ्यांचा आणि नामावळ्यांचा नसून तो जित्याजागत्या माणसांचा आहे. यातूनच महाराष्ट्राची धारकरी आणि वारकरी ही परंपरा निर्माण झाली आणि ती आजतागायत टिकून आहे. महाराष्ट्र वेगळा का? तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हा इतर प्रांतातील माणसापेक्षा वेगळा आहे. तो सहसा कुणासमोर नमणारा नाही. ही शिकवण त्याला प्रत्यक्ष शिवरायांनीच दिलेली असल्यामुळे शिवरायांच्या नावाचा धाक आजही महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांवर दिसून येतो. त्यामुळेच महाराष्ट्र हा वेगळा झाला. त्र्यंबक शिवराम शेजवलकर यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचे खरे श्रेय कोणते असेल तर त्यांनी माणसांचे ताटवे फुलवले हे त्यांचे सर्वात असाधारण असे कर्तृत्व आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे साध्या साध्या मावळ्यांच्या जीवनात शिवरायांनी संजीवन मंत्र फुंकला आणि त्यातून यावनी सत्तेमुळे थोडा उरलेला महाराष्ट्र व्यापक झाला आणि सह्याद्रीचा कडा आपणाशी बोलू लागला. यातूनच महाराष्ट्रात संतभूमीचा अद्वितीय असा लौकिक निर्माण झाला आणि त्यातून भागवत सांप्रदायाची इमारत फळा आली. यामुळे महाराष्ट्र समंजस तर झालाच, पण तितकाच स्थैर्य प्राप्त असलेला असा भूभाग बनला. मराठी माणूस हा जरी स्थितीप्रिय असला तरी आपल्या आजूबाजूच्या प्रांतात त्याने वेळोवेळी डोकावलेलेच आहे. इथल्या अनेक माणसांनी बाहेर जाऊन भीमपराक्रम गाजविलेले आहेत. संशोधनाचे क्षेत्र विस्तारलेले आहे. इथल्या कवींनी इथले मन समृद्ध केले आणि इथल्या संतांनी ते उदार मनस्क बनविले. त्यामुळे संतांच्या काळापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा, अप्रिय रूढी यापासून सातत्याने दूर राहत आला आणि यातून वेगळा बौद्धिक महाराष्ट्र घडला. आजही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशी आधुनिक काळात नवी शिकवण देणारी संत मंडळी आपणासमोर येतात तसेच महाराष्ट्राचे आणि देशाचे विज्ञान पुढे नेणारी रघुनाथराव माशेलकर, अनिल काकोडकर, डॉ. अरुण निगवेकर यांसारख्या वैज्ञानिकांची नावे सहज समोर येतात. महाराष्ट्र हा असंख्य समाजसेवकांचा फार मोठा समूह राहिलेला आहे. म्हणजे, साधा कामगारजगताचा जरी विचार केला तरी त्यात जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, श्रीपाद अमृत डांगे, अण्णासाहेब पाटील, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेकांनी महाराष्ट्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता अथक परिश्रम केलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक न्यायाची शिकवण स्वतंत्रपणे कुणाला सांगावी लागत असेल असे वाटत नाही. म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे या पूर्वाश्रमीच्या कार्लेकर होत. त्यांचे गाव आजच्या सांगली जिह्यातील देवराष्ट्रे हे होय. या गावातील पाण्याचा टोकाला गेलेला तंटा त्या काळी न्यायमूर्तींच्या पुढाकाराने समाप्त झाला होता आणि तोही फक्त सामंजस्यातून. यातून महाराष्ट्राची शिकवण कशी आहे हे आपल्या लक्षात येण्यास हरकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षणाचा गौरव महात्मा गांधींनी केला आणि त्याच वेळी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ असेही सांगण्यास गांधीजी विसरले नाहीत. ही परंपरा महाराष्ट्रात अभ्यासाची आणि अधिष्ठानाची अशी राहिल्यामुळे पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांनीसुद्धा इंदिरा गांधी यांना शिक्षणासाठी पुण्याच्या हुजूरपागा शाळेत आवर्जून दाखल केले होते हे आज आपण मुद्दाम समजून घेतले पाहिजे. याबरोबर महाराष्ट्राला जे सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झाले तेही तितकेच मोलाचे आहे. मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे आणि सांगली हे जरी खरे असले तरी त्याचबरोबर अलीकडेच प्राध्यापक चंदूलाल दुबे यांच्या संशोधनानुसार विष्णुदास भावे हे केवळ मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार नाहीत तर ते हिंदुस्थानी रंगभूमीचे आद्य नाटककार आहेत असे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. एकीकडे परंपरेतील उज्ज्वलाची ओढ आणि त्याचबरोबर नावीन्याचा ध्यास असा मराठी बाणा आहे. यामुळे महाराष्ट्रात जे आज घडते ते पन्नास वर्षांनी अन्य प्रांतात घडते असे म्हटले जाते. यातूनच मराठी वृत्तपत्रांची परंपरा, अनेक लोकोत्तर समाजसुधारकांची परंपरा आणि पंढरीच्या पांडुरंगाची ओढ यातून मराठी माणूस घडत आला आणि त्याने संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. अनेक हुतात्मे झाले हे खरेच आहे. पण आज महाराष्ट्राकडे मागे वळून पाहताना असे वाटते की, महाराष्ट्र मरेल तर कोण जगेल? हेच खरे वाटते. कारण ही मांगल्याची महाराष्ट्र परंपरा अशीच मराठी माणूस तितक्याच अभिमानाने आणि आत्मानंदाने पुढे नेत राहील याबद्दल संदेह नको.