स्वप्न सत्यात उतरवुया!

406

>> वरद चव्हाण

शिल्पा देशपांडे. आपल्यातीलच एक मध्यमवर्गीय मुलगी. मॅरेथॉन धावायचे स्वप्न पाहते आणि पूर्णदेखील करते.

नमस्कार, फिटनेस फ्रीक्स! लेख वाचून तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्यात एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली आणि ती म्हणजे सतत स्त्र्ायांचं असं म्हणणं होतं की कलाकार असो वा क्रीडापटू, त्यांना आम्ही नोकरीला जाणारे किंवा गृहिणींसारखे एकाच जागेवर बसून राहावे लागत नाही. रोज ट्रेन, बस किंवा ट्रफिकमधून वाट काढत गाडी चालवून ऑफिसला पोहोचणं. मग 9 ते 5 एकाच खुर्चीवर बसून काम करणं, डेडलाईन्सचं प्रेशर वेगळंच. हे सगळं करून पुन्हा कंटाळवाणा प्रवास करीत घरी जाणं, संसार सांभाळणं (त्यात नवरा, मुलं, सासू-सासरे) प्रत्येकाच्या वेगवेगळय़ा अपेक्षा पूर्ण करणं या सगळय़ा धावपळीत व्यायामाबद्दल, स्वतःच्या तब्येतीबद्दल विचार करायला वेळ कसा काढायचा? असा प्रश्न मलाच विचारला. मी म्हटलं त्यांचं बोलणं बरोबरच आहे. आपण आता एक असा सेलिब्रिटी शोधायला हवा जिच्या प्रोफेशनची, लाईफस्टाईल साधारणपणे वरील तक्रारींच्या जवळपास असेल. खूप विचार करत होतो, काय वेगळं देऊ तुम्हाला? सहज टीव्ही न्यूज चॅनेल बघत होतो आणि मला माझा आजचा सेलिब्रिटी मिळाला. साधारणपणे 2000 ते 2009 दरम्यान टीव्हीवर बातम्या द्यायला एक अँकर यायची आणि आम्ही मुलं फक्त हिच्यासाठी बातम्या बघायचो. तिचे नाव आहे शिल्पा देशपांडे! कुठल्याही पत्रकाराचं काम खूप मेहनतीचे असते. मग तो पत्रकार वृत्तपत्राचा असो किंवा टीव्ही चॅनेलचा, त्यालाही नोकरी करणाऱयांप्रमाणेच घरातून ऑफिसला पोहोचण्याची धावपळ, मग 9 ते 5 किंवा जी काही त्यांची वेळ असते ती. त्यांच्या डेस्कवर बसून राहणं. त्यात जर तुम्ही शिल्पासारखे न्यूज अँकर असाल तर तुमची शिफ्ट संपली आणि तेवढय़ात एखादी ब्रेकिंग न्यूज आली तर शिफ्ट एक्स्टेंड करणं. मग तर जेवण आणि झोप सगळय़ांचीच बोंब होत असे. पण शिल्पाचे अलीकडचे फोटो बघितले तर थक्कच व्हायला होतं. म्हणजे आपण कॉलेजला असताना जिला टीव्हीवर बघायचो आणि आता जिला एक मुलगा आहे हीच का ती? असा प्रश्न मला पडला. तुम्हाला संतूर साबणाची जाहिरात आठवते का? म्हणजे एक मुलगा एका मुलीकडे फारच प्रेमाने बघतो आणि मागून ‘मम्मी’ म्हणत एक लहान मुलगी तिच्या आईला जाऊन मिठी मारते. मग तो बिचारा मुलगा अगदी हताश होऊन परत घरी जातो. तशी थोडय़ाफार प्रमाणात माझी अवस्था झाली होती. म्हटलं, आता हे फिटनेसचं रहस्य तुमच्या समोर आणायलाच हवं. शिल्पा शाळेत असताना खेळात फार ऑक्टिव्ह नव्हती. अभ्यासात मात्र फार हुशार होती. पण जेव्हा तिने न्यूज अँकर करीअर म्हणून निवडले तेव्हा मात्र आपला चेहरा आणि ओव्हरी बॉडी पोश्चर प्रेझेंटेबल दिसायला हवं म्हणून ती जिमला जात असे. सत आणि योगादेखील करीत. डाएट किंवा फास्टिंग करणं यावर तिचा अजिबात विश्वास नाही. एकदाच आयुष्य मिळतं, त्यात उपाशी का राहायचे? चांगलं खायचं, पण व्यायाम खूप करायचा या मताची ती आहे. न्यूज अँकरिंगसारख्या क्षेत्रात जिकडे कधी कधी 12-16 तास काम करावं लागतं, जर दीर्घकाळ काम करायचं असेल तर आयुष्याला शिस्त लावणं खूप गरजेचं आहे असं ती म्हणते. जवळ जवळ आठ-दहा वर्षे शिल्पाने अतिशय डिसीप्लीन लाईफस्टाईल फॉलो करीत न्यूज अँकर म्हणून काम केलं. पण मुलगा झाल्यावर मात्र तिने तिचं संपूर्ण लक्ष मुलावर केंद्रित करायचे ठरवलं आणि पोटासाठी करावी लागणारी नोकरी सोडून एक आवड म्हणून इव्हेंटच्या माध्यमातून लोकांसमोर जायचं ठरवलं. कोकणातलीच असल्यामुळे तिला मासे खायला फार आवडतं. आपल्या पूर्वजांपासून जो चालत आलेला आहार आहे तो चौरस आहार आहे आणि कुठल्याही प्रकारचं डाएट न करता आपण त्याचं सेवन केलंच पाहिजे असं तिला वाटतं. शिल्पाला ब्रेकफास्ट मात्र व्यवस्थित लागतो. म्हणजे ब्रेकफास्टला 2 एग्ज व्हाईटस्, ज्वारीची भाकरी, पालेभाज्या, दुपारी जेवणात वरण भात, ताक किंवा मासे असतील तर फिश करी, राईस, संध्याकाळी फ्रुटस् आणि रात्रीच्या जेवणात सूप आणि सलाड असा आहार असतो. शिल्पा जरी आधीपासून फिटनेस फ्रीक असली तरी तिच्या आयुष्यात फिटनेसची व्याख्या तेव्हा बदलली जेव्हा तिने मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचं ठरवलं. शिल्पा लहान असताना तिने दूरदर्शनवर एक मॅरेथॉनची रेस पाहिली होती. तेव्हा लोक इतकं कस धावू शकतात या प्रश्नाने तिला हैराण केलं होतं. या प्रश्नाचं उत्तर तिने मूल झाल्यावर, वयाच्या तिशीत शोधायचे ठरवले. पण तिला त्यासाठी योग्य ट्रेनिंग घेणं गरजेचं होतं. कारण अनेक हौशी लोकांनी पाच कि.मी.च्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन आयुष्यभराची इंजुरी करून घेतल्याचे किस्से तिने ऐकले होते. त्याशिवाय ‘अगं, तुला मूल झालंय, आता तिशीत कुठे रस्त्यावर धावायचे वेध लागले आहेत तुला?’ असं बोलणारे हितचिंतक होतेच, पण जेव्हा अनेक जण आपल्याला एका गोष्टीसाठी विरोध करतात तेव्हा तीच गोष्ट आपल्याला करायची असते. त्यामुळे स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि नवऱयाने साथ दिली म्हणून शिल्पाने 2 कि.मी. धावून बघितले. नवीन असून कमी वेळेत तिने हे टार्गेट पूर्ण केलं होतं म्हणून तिने योग्य ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं. नेरूळला पाम बीच रनर्स या ग्रुपमध्ये गोल्ड मेडलिस्ट प्रीतम सिंग चौहानच्या मार्गदर्शनाखाली तिने शिकायला सुरुवात केली. आठवडय़ातून सहावेळा ए-बी-सी वर्कआऊट म्हणजे ऑजिलिटी- बॅलन्स – कोऑर्डिनेशन म्हणजेच चपळता, संतुलन, समन्वय यासाठी कसरती असतात. याशिवाय तुमचे कोअर मजबूत असणं खूप गरजेचं आहे. धावताना पोटात कळा आल्या तर आपण धावूच शकत नाही. म्हणून पोटाचे व्यायाम. याशिवाय लाँग डिस्टन्स रनिंग, शॉर्ट डिस्टन्स रनिंग, स्लो फास्ट रनिंग त्यामुळे आपला वेग वाढतो. याशिवाय सायकलिंग किंवा स्विमिंगची आवड असेल तर क्रॉस ट्रेनिंगचा खूप उपयोग होतो. यामुळे तुम्ही जीव काढून न धावता शरीराला ताकद देऊन धावता. आज जवळ जवळ वर्ष-दोन वर्षांत शिल्पाने पाच कि.मी.च्या पाच, दहा कि.मी.च्या जवळपास 10-15 व 25 कि.मी.च्या 4 मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. 25 कि.मी.च्या एकामध्ये चौथी तर एकामध्ये रनरअपची जागासुद्धा कमावली आहे. शिल्पाला तिच्या चाहत्यांना सांगावेसे वाटते की, सकाळी उठून व्यायाम करणं कधीही चांगलं. सकाळच्या व्यायामाने आपले शरीरच नव्हे तर मनसुद्धा तरोताजा होते. याशिवाय उसेन बोल्टचं एक वाक्य तिला नेहमीच प्रेरणा देत आलंय ते म्हणजे – ‘ड्रीम्स आर फ्री, बट गोल्स हॅव कॉस्ट’. अर्थात स्वप्न फुकट असतात, पण ध्येय साध्य करण्याची किंमत मोजावी लागते. शिल्पाचं हे नवीन रूप अनेकांना प्रेरणा देईल अशी आशा करतो. भेटूया पुढच्या शनिवारी एका नवीन सेलिब्रिटीसह.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या