स्वच्छंद

>> विद्या कुलकर्णी,  vidyakulkarni251@yahoo.in

सतत शेपटी हलवत राहण्याची सवय म्हणून हा चिमुकला थिरथिरा. नारिंगी, लाल, निळय़ा मखमाली रंगात माखून निघालेला.

पक्ष्यांची फोटोग्राफी करण्याकरिता मी हिंदुस्थानभर फिरले, परंतु हिमालयातील चोपटा, सत्ताल, चाफी, पांगोट येथील नैसर्गिक सौंदर्य काही अनोखेच, निराळेच आहे. अशा ठिकाणी छोटे छोटे रंगीत चंचल पक्षी वावरताना दिसले की, त्यांची फोटोग्राफी करण्यास अधिकच उत्साह वाटतो.

अतिशय नटवे रूप असलेला छोटासा थिरथिरा हा पक्षी गोंडस, मनोहर, आकर्षक आहे. कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील.

थिरथिरा हे पक्षी त्यांच्या भडक ‘नारिंगी–लाल’ रंगाच्या शेपटीमुळे लगेच ओळखू येतात. आपली शेपटी ते सतत हलवत असतात. म्हणूनच त्यांना ‘थिरथिरा’ असे संबोधले जाते, तर इंग्रजीत त्यांना लाल शेपटीमुळे ‘रेडस्टार्ट’ म्हणतात. त्यांच्या पंधराहून अधिक उपप्रजाती आहेत. बहुतेक सगळ्या उपप्रजाती स्थलांतर करतात. उत्तरेकडच्या प्रजाती जास्त लांबवर स्थलांतर करतात. दक्षिणेकडील प्रजाती प्रजननाच्या काळात जास्त उंचीवर वास्तव्य करतात. हिवाळ्यात मात्र कमी उंचीच्या ठिकाणी स्थलांतर करतात.

हे पक्षी मुख्यत्वे आपला उदरनिर्वाह किडे खाऊन करतात. नर थिरथिरा बहुदा लाल, निळा, पांढरा आणि काळ्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांमध्ये आढळतो. मादीचे अंग फिकट तपकिरी असून शेपटी लाल असते. थिरथिरा पक्ष्याच्या प्रजाती सर्वत्र विखुरलेल्या आहेत.

काळा थिरथिरा / Black Redstart

उन्हाळ्यात उत्तर हिंदुस्थानात हिमालयाच्या  गढवाल भागापासून ते नेपाळपर्यंत राहणारा हा पक्षी हिवाळ्यात मात्र उर्वरित हिंदुस्थान व बांगलादेशात आढळतो. काळ्या थिरथिराचे काही जातभाई युरोपमध्येही आढळतात. ते रंगाने वेगळे आहेत, पण आकार आणि सवयी साधारणपणे सारख्याच आहेत.

काळा थिरथिरा दगडी माळराने, बागा, जंगलाच्या बाहेरील हद्दीत राहणारा पक्षी आहे.

मे ते ऑगस्ट हा याचा प्रजननाचा काळ असून मादी एकावेळी निळसर हिरवट रंगाची 4 ते 6 अंडी देते. त्यांचे घरटे गवत, केस, कापूस, पिसे इत्यादी वस्तूंपासून बनवलेले असते. सहसा घरटे एखाद्या मोठय़ा खडकाखाली किंवा जमिनीत असते. युरोपियन काळ्या थिरथिराचे घरटे जुनाट घरांच्या भिंतींमध्येही आढळले आहे.

पांढऱया टोपीचा थिरथिरा / White Capped Redstart

या पक्ष्यांचे वास्तव्य अफगणास्तान, बांगलादेश, भुतान, कंबोडिया, हिंदुस्थान, लाओस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, ताजिकिस्तान, थायलंड, तिबेट आणि व्हिएतनाममध्ये आढळते. समशीतोष्ण जंगले त्यांचे नैसर्गिक निवासस्थान आहे. खडकाळ भागातील झरे, नद्या, कुरणे इत्यादी ठिकाणी ते अनेकदा वावरताना दिसतात.

प्लमबियस थिरथिरा / Plumbeous Redstart

हे पक्षी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, हिंदुस्थान, लाओस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाम येथे आढळतात. हे पक्षी झरे, नाले, नद्या, झाडाझुडुपांनी भरलेले नदीकाठ इत्यादी ठिकाणी राहणे पसंत करतात. कारण त्यांना तिथे भरपूर कीटक, माश्या वगैरे खाण्यास मिळतात. हिमालयात हे पक्षी 2000 – 4100 मीटर्स उंचीपर्यंत आढळतात. हिवाळ्यामध्ये ते कमी उंचीच्या प्रदेशात स्थलांतर करतात.

हे पक्षी स्वतःच्या सुरक्षेसाठी खूप जागरुक असतात आणि त्यांच्या जागेमध्ये कोणी आल्यास ते अतिशय आक्रमक होतात. उडत असताना नदीतील माश्या हेरून ते नदीपासून 20 फुटांपर्यंत सूर मारून लगेच गोलाकार फिरून माश्यांना पकडतात.

हिमालयाच्या वास्तव्यामध्ये या पक्ष्यांचे भरभरून फोटो काढता आले. आपल्या दागदागिन्यांच्या खजिन्यामध्ये एखादा दागिना जास्तच लाडका असतो, तसेच काहीसे या पक्ष्यांबद्दल मी सांगेन. या पक्ष्यांचे फोटो काढून माझ्याकडील पक्षी वैभव समृद्ध झाले.