
>> डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा
कॅनडा. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्रफळ असलेला अतिप्रचंड देश. हिंदुस्थानपेक्षा अडीच पटींनी मोठा आणि लोकसंख्या फक्त साडेतीन कोटी. अमेरिकेसारख्या अतिबलाढय़ राष्ट्राला लागून कॅनडाची 5,000 मैलांची सरहद्द रेषा आहे. त्यावर सुरक्षा पोलीस नाहीत! लाँगेस्ट अनडिफेन्डेड बॉर्डर असे या सरहद्दीचे वर्णन केले जाते. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये त्याची दरवर्षी न चुकता नोंद होते. दोन्ही देशांतला व्यापार कल्पनातीत आहे. दररोज 10 हजार कोटी रुपयांचा! आणि तेही वर्षातले सर्व 365 दिवस कॅनडा हा शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जातो. इतर देशांतून येणाऱयांना त्यांचा धर्म, भाषा, संस्कृती, परंपरा यांचे जतन करण्याकरिता सरकारी अनुदाने दिली जातात. युद्धामुळे किंवा धर्म, लिंग, भाषा यांमुळे जर कोणाच्या जिवाला धोका असेल तर ते लोक दुसऱया देशात आश्रय मागतात. त्यांना राजकीय निर्वासित अशी संज्ञा आहे. कॅनडाने संयुक्त राष्ट्रांशी या बाबतीत करार केला आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो लोक या सवलतीखाली प्रवेश करतात. त्यातले 90 टक्के लोक कोणताही अन्याय मायदेशात झाला नसतानाही केवळ कॅनडातली साधनता, सामाजिक सुविधा, मोफत आरोग्य सेवा यांचा फायदा घेण्याकरिता खोटी कागदपत्रे करून कॅनडात घुसतात.
ट्रंपने 7 मुस्लिम देशांतून अमेरिकेत येऊ इच्छिणाऱयांवर बंदी घातली. अमेरिका हा कॅनडा उत्तरेस तर मेक्सिको दक्षिणेस अशा बेचक्यात वसला आहे. दोन्ही देशांतल्या नागरिकांना एकमेकांच्या देशात जाण्यासाठी व्हिसाही लागत नाही! पण मेक्सिकोतून बेकायदा अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱयांची संख्या प्रचंड आहे. म्हणून ट्रंपने त्या सरहद्दीवर भिंत बांधण्याची त्याच्या प्रचारमोहिमेत अनेकदा घोषणा केली होती. अमेरिकेकडे उदारमतवादी, सर्वसमावेशक देश म्हणून पाहिले जात होते, पण सप्टेंबर 11,2001 ला न्यूयॉर्कमधील दोन व्यापारी मनोरे ओसामा बिन लादेनच्या आतंकवाद्यांनी उडवले व अमेरिका खडबडून जागी झाली. जगात आपला अतीव तिरस्कार करणारी मुस्लिम जमात अग्रक्रमाने आहे याची त्यांना जाणीव झाली. पूर्वी गरीब दक्षिण अमेरिकन देशात संकटे आली, निसर्गाचा कोप झाला की तेथील कित्येक लाख लोकांना अमेरिका टेंपररी राहण्याचा परवाना देत असे. निकराग्वा, एलसॉव्हेडोर, हेअटी, उराग्वे या देशांची आपण कधी नावेही ऐकली नसतील. तेथील लाखो लोक बेकायदा अमेरिकेत घुसले आहेत. कसे? तर टुरिस्ट व्हिसा म्हणून यायचे आणि मायदेशाला परतायचेच नाहीत. या लोकांची मुले अमेरिकेतच जन्मल्याने ती कायदेशीर अमेरिकन नागरिक होतात.
ट्रंपने या बेकायदेशीर लोकांना अमेरिकेत थारा नाही असे जाहीर केले आणि त्यांची हंगामी मुदतीच्या वास्तव्याचा काळ संपला की त्यांनी देशाबाहेर जावे. गेले नाहीत तर आम्ही त्यांना हुलकावून लावू अशी घोषणा केली. या हंगामी व्हिसाचा लाभ उठवणारे सुमारे सव्वा कोटी लोक अमेरिकेत आहेत. देशाची लोकसंख्या आहे 32 कोटी. म्हणजे सुमारे चार टक्के लोक. त्यांच्या पायाखालची भूमीच घसरली. मुले ही जन्मानेच अमेरिकन असल्याने ती राहू शकत होती पण त्यांचे घुसखोर माँ-बाप मात्र हाकलले जाणार होते. त्यांनी नवीन क्लृप्ती शोधली. कॅनडामध्ये घुसायचे. नाहीतरी सरहद्दीवर पोलीस पहारा नसतोच. कॅनडात प्रवेश करायचा. सरळ इमिग्रेशन ऑफिसमध्ये जायचे आणि स्वतःला राजकीय निर्वासित म्हणून घोषित करायचे.
या निर्वासितांकरिता संयुक्त राष्ट्रांचा नियम आहे. की ते असुरक्षित देशांतून डायरेक्टली आले असले पाहिजेत! आता अमेरिका ही काही असुरक्षित मानता येणार नाही. त्यामुळे तेथून येणारा एकजणही या निर्वासित व्याख्येत बसत नाही. येथे कॅनडाचे बोटचेपे धोरण कामी येते. या मंडळींवर 60 दिवसांच्या आत निर्णय झाला पाहिजे असा कॅनडाचा कायदा. तसे होत नाही. कारण अमेरिकेतून 2017 साली सुमारे 20 हजार एकूणएक बोगस निर्वासित कॅनडात घुसले. अमेरिकेहून आले म्हटल्यावर इमिग्रेशनचा निर्णय त्यांच्याविरुद्ध जातोच. मग त्यांना अपील करण्याची परवानगी असते. तिथेही हरले तर त्यांच चौकशी होऊ शकते. तेथूनही नकारघंटा वाजली की ते हायकोर्टात अपील करू शकतात. या सर्व कायदेशीर गदारोळात सात-आठ वर्षे सहज जातात. तोपर्यंत त्यांना मुले होतात. त्यांना जन्मतःच कॅनेडियन नागरिकत्व मिळते. मग त्यांच्याकरिता म्हणून आम्हाला देशात राहू द्यावे असा दयेचा अर्ज करता येतो. थोडक्यात, एकदा घुसलेला माणूस सहसा कधीच देशाबाहेर जात नाही! या सर्वांचा वकिली खर्च कोण करत असेल? अर्थातच कॅनेडियन सरकार. म्हणूनच एकदा का कॅनेडियन भूमीवर तुम्ही आलात की तुम्हाला अनेक हक्क व अधिकार प्राप्त होतात!
विमानातून टोरांटो – मॉण्ट्रिअलला जायचे, प्रवासात आपला पासपोर्ट कचरापेटीत टाकून नष्ट करायचा आणि आपण निर्वासित म्हणून जाहीर करायचे असा उपक्रम कित्येकांनी राबवला. त्यामध्ये खलिस्तानी समर्थक, श्रीलंकेमधल्या प्रभाकरनचे अनुयायी, कम्युनिस्ट राजवटीतून मुक्तता हवी असणारे व आखाती देशातले लाखो मुस्लिम यांचा भरणा होता. मग कॅनेडियन इमिग्रेशन अधिकारी विमानाच्या दरवाजावरच खडे राहून प्रत्येक प्रवाशाचा पासपोर्ट तपासू लागले.
जेव्हा ट्रंपने डोळे वटारले आणि बेकायदा अमेरिकेत आलेल्या लोकांनो, ‘चले जाव’ असा त्याने नारा दिला त्याबरोबर या लोकांची आसुसलेली नजर कॅनडाच्या सरहद्दीकडे वळली. आता कॅनडात जबर थंडी असते हे तर जगजाहीरच आहे. हिवाळय़ात शून्याच्या खाली 35 अंश इतके तपमान घसरते! पण मायदेशात परतून पुन्हा दारिद्रय़ाचे चटके सहन करत अविकसनशीलतेच्या खाईत होरपळण्यापेक्षा थंडीत का होईना, परंतु उच्च राहणीमान असलेल्या कॅनडात आपली पायरोवणी करावी असा या लोकांनी निर्णय घेतला व अमेरिका कॅनडा सरहद्दीवरून घुसखोरांचा नवा लोंढा अस्तित्वात आला. पूर्वी असे क्वचित व्हायचे. कारण सर्वांचे अंतिम ध्येय व लक्ष्य अमेरिकेत कायम राहणे हेच होते, परंतु तेथून उचलबांगडी होण्याची शक्यता दिसल्यामुळे कॅनडात ‘घुसा रे घुसा’ असा संदेश प्रसृत झाला!
कॅनेडियन सरकारने या बोगस निर्वासितांचा निपटा लवकर व्हावा म्हणून 2018 च्या बजेटमध्ये 173 दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली, पण ती अपुरी आहे. कॅनेडियन कायदे जे अस्तित्वात आहेत त्यांची जरी अंमलबजावणी केली तरी घुसखोरांवर नियंत्रण येईल. पण आपण उदारमतवादी, मोठय़ा मनाचे आहोत असे जगाने म्हणावे ही तळमळ असलेल्या ट्रडोमध्ये कडक धोरण राबवण्याची इच्छाशक्ती नाही. सामान्य कॅनेडियन नागरिक हा मूलतःच क्षमाशील व दयाळू आहे. पण तो देत असलेले कोटय़वधी डॉलर्स जर घुसखोरांना केवळ सवलती व संरक्षण देण्याकरिता खर्च होऊ लागले तर त्याची मनोवृत्ती बदलण्यास वेळ लागणार नाही. फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी या देशांनी यादवी युद्धग्रस्त सीरियामधले हजारो लोक निर्वासित म्हणून घेतले. तेथे सरकारी पक्षांचा निवडणुकीत पराभव झाला हे ट्रडोने लक्षात घ्यायला पाहिजे. गरीबांना मदत करावी. अन्न, ब्लँकेटस्, पैसे, संगणक इत्यादी स्वरूपात. पण त्याला घरातच कायम स्थान दिले तर आधी राहणारे लोक त्याविरुद्ध ओरड करणारच. त्यांच्याही सहनशीलतेला सीमा असतेच. ट्रडोच्या मंत्रिमंडळात इमिग्रेशन मंत्री हा सोमालियात जन्मलेला आहे. कहर म्हणजे तो मुस्लिमही आहे. त्यामुळे त्याच्यावरही टीकेची झोड उठायला लागली आहे. समझनेवालों के लिए इशारा काफी होता है’ असे म्हणतात. म्हणूनच जनता आगामी निवडणुकीत लत्ताप्रहार करेल याची निश्चिंती वाटते!
(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत)
























































