
>> शब्दांकन : शुभांगी बागडे
सुख म्हणजे नक्की काय असतं… असं म्हणत आपल्या निखळ हास्याने प्रेक्षकांना नाटकात गुंतवून ठेवणारा, हाऊसफुल्लची दाद मिळवणारा, विक्रमादित्य असे बिरूद लाभलेला अभिनेता प्रशांत दामले. आपल्या 39 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम केले. येत्या 6 नोव्हेंबरला मुंबईत षण्मुखानंद सभागृहातील प्रयोगात ते 12,500 व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठणार आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगत आहेत ज्येष्ठ नाटय़दिग्दर्शक, लेखक विजय केंकरे.
आंतरमहाविद्यालयीन नाटय़ स्पर्धेत मी प्रशांतला म्हणजेच प्रशांत दामलेला पहिल्यांदा पाहिलं. राज्य नाटय़ स्पर्धेत मी ‘अनाहत’ नावाचं नाटक करत होतो. त्याचे लेखक राजीव नाईक होते आणि अजित भुरे ते दिग्दर्शित करत होता. या नाटकात प्रशांत गायचा. त्याच वेळी पुरुषोत्तम बेर्डेचे ‘टूरटूर’ नाटक सुरू होते. ज्यात सतत बदल व्हायचे. त्यात मंगेश दत्त नावाचे गायक होते आणि ते छान, सॉफ्ट आवाजाच्या गायकाच्या शोधात होते. यासाठी प्रशांतबाबत मी सुचवून पाहिले आणि त्यानंतर ‘टूरटूर’मध्ये आम्ही एकत्र काम करू लागलो. त्या वेळी प्रशांतची सुयोगसोबत ‘मोरूची मावशी’, ‘ब्रम्हचारी’ ही नाटपं सुरूच होती. प्रशांत कलाकार म्हणून परिपूर्ण आहे अगदी सुरुवातीपासून. अभिनयासोबत गाणं हे प्रशांतचं वैशिष्टय़ आहे आणि नाटकातील भूमिकेसाठी तो त्याचा खुबीने वापर करतो. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘ती परी अस्मानीची’ ही गाणी ऐकताना, पाहताना रसिक आपोआप नाटकाच्या प्रेमात पडतो.
असा हा बहुआयामी अभिनेता प्रशांत दामले, हे एक परिपूर्ण पॅकेज आहे, असे म्हणावे लागेल. स्टेजवर खुलून दिसणारा, गात्या गळ्याचा, विनोदाची उत्तम जाण असणारा आणि गंभीर भूमिकाही तितकीच चांगली वठवणारा. प्रशांतने रंगभूमीवरचं चैतन्य स्वतŠच्या रूपात कायम जागतं ठेवलं आहे. त्याच्याकडील या सगळ्या गुणांमध्ये, कौशल्यामध्ये सातत्य कसे राहील याकडे त्याने फार बारकाईने लक्ष दिले. नाटक हे केवळ पॅशन नसून व्यवसाय आहे हे त्याने जाणलं. म्हणून या व्यवसायात टिकून राहण्यासाठी त्याच्या सर्व बाजू त्याने समजून घेतल्या, अंगीकारल्या. फार क्वचित कलाकार असं करतात. ‘सुयोग’मध्ये सुधीर भट, गोपाळ अलगेरीसोबत काम करताना प्रशांतने नाटक व्यवसाय म्हणून समजून घेतले.
एका बाजूला अभिनयातील जाण आणि दुसऱया बाजूला व्यवसायातील समज याने तो अधिक सक्षम झाला. हे करताना त्याने काही दिवसांनी स्वतŠची पंपनी काढली. हे करताना त्याने स्वतŠला ब्रॅण्ड म्हणून तयार केलं आणि हा बॅण्ड अधिकाधिक टिकावा यासाठी त्याने आवश्यक ती मेहनत घेतली. प्रशांतला स्वतŠतील प्लस पॉइंट चांगलेच माहीत आहेत आणि ते तो उत्तम पद्धतीने वापरतो. सुरुवातीला ब्रम्हचारी, मोरूची मावशीसारख्या रिव्हायवलमध्ये काम करतानाच त्याने अभिराम भडकमकरचे पाहुणा सारखे गंभीर नाटकही केले. ते करत असताना चल काहीतरीच काय सारखे धमाल नाटक केले. नंतर आम्ही दोघांनी एकत्र प्रियतमा, शू कुठे बोलायचं नाही, सुंदर मी होणार, आम्ही दोघं राजाराणीमध्ये काम केलं. ही सगळी नाटपं सुयोगची होती. ती करत असताना प्रशांतला लोकांना काय आवडेल, आवडते याची जाण आली आणि ती टिकवून ठेवली. यासाठी तो सदैव तत्पर राहिला. त्याचा सुंदर आवाज, गाता गळा, काम करण्याची उमेद, सातत्य हेच त्याच्या आजवरच्या यशाचं गमक आहे, असं मी म्हणेन.
अभिनेता वा कलाकार याची वर्तणूक कशी असावी याचं एक आदर्शवत उदाहरण म्हणून प्रशांतकडे पाहायला हवं. कारण कलावंत कलंदर वृत्तीचा असतो असा समज असणाऱया काळात त्याने स्वतŠची वेगळी छाप उमटवली होती आणि आजवर ती तशीच आहे. शिस्तबद्ध सौजन्यपूर्ण वागणूक आणि सामाजिक जाण त्याने कायम राखली. चित्रपट, टीव्ही या माध्यमात त्याने काम केलं खरं, परंतु तो फारसा रुळला नाही. कारण स्वतŠला व्यक्त होण्यासाठी नाटक हेच माध्यम आहे हे त्याने जाणलं. प्रेक्षकांची पटकन मिळणारी दाद त्याला नाटकाकडे कायम आकर्षित करत राहिली. म्हणूनच 12500 प्रयोग करणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही, जे त्याने साध्य पेंलं केवळ नाटकाच्या वेडापायी, ध्यासापायी. नाटक हे केवळ अभिनयाचे माध्यम न राहता ते व्यवसाय म्हणून, आपली ओळख म्हणून जपले गेले पाहिजे हा प्रशांतचा ध्यास त्याला इथवर घेऊन आला. यासाठी प्रचंड कष्ट, सातत्य, चिकाटी, नियोजन आणि गुणसंपदा लागते जी प्रशांतकडे आहे आणि त्याचा योग्य वापर त्याने केला आहे.
कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात एक अस्वस्थता येते. ती अस्वस्थता आल्यानंतर आपण काहीतरी चाकोरीबाहेरचं करावं असं वाटू लागल्यानंतर प्रशांतने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. शेखर ढवळेचं मंगेश कदम दिग्दर्शित बहुरूपी नाटक त्याच्याकडे आल्यानंतर त्याने ते यशस्वी पद्धतीने केलं. ते करताना त्याच्यातील अभिनेत्याने त्याला अधिक खुणावलं असावं. त्यानंतर त्याने लोकांना आवडतील अशी मनोरंजन करणारी नाटकं केली. यात त्याने सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून काही प्रयोगही केले. नकळत सारे दिसले हे नाटक त्याचाच एक भाग. असे प्रयोग करता येण्यासाठी आर्थिक गणित स्थिर असावं या विचाराने नेहमी चालणारी नाटकं जसं सासू माझी ढासू, ओळख ना पाळख अशी नाटपंही केली. या नाटकांमधील वेगळं नाटक म्हणून तेजश्री प्रधानसोबतच्या कार्टी काळजात घुसली या नाटकाचा उल्लेख करायला हवा. वयानुसार वेगळी भूमिका निवडायला हवी हे या नाटकातून त्याने लक्षात आणून दिले.
नाटय़ व्यवसायातील सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे अर्थकारण. हे अर्थकारण प्रशांतला नीट समजलं आहे. कुठल्या वेळी कोणाबरोबर काम करायचं हे त्याला बरोबर कळतं. दिग्दर्शक म्हणून त्याने प्रकाश बुद्धिसागर, पुरुषोत्तम बेर्डे, माझ्यासोबत काम केलं तसंच नव्या पिढीच्या संतोष पवार, अद्वैत दादरकरसोबतही काम केलं. प्रशांतने स्वतŠ काम करतानाच पुढची पिढीही घडवली. त्याचं आजपर्यंतच्या प्रवासातलं महत्त्वाचं योगदान म्हणून टी स्कूल या त्याच्या संस्थेचा उल्लेख करायलाच हवा. जे समाजाने आपल्याला दिले आहे त्याची परतफेड केली पाहिजे हाच यामागचा प्रशांतचा हेतू. टी स्कूल म्हणूनच महत्त्वाचे ठरते. इथे मुलांना नुसतं अभिनयाचं शिक्षण देऊन न थांबता त्यांना संधी दिली जाते. टी स्कूलमधील प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख अशा कलाकारांना त्याने स्वतŠच्या नाटकातून पुढे आणले आहे. तिथल्या संहिता व्यावसायिक मंचावर आणण्यासाठीही तो प्रयत्न करतो. साखर खाल्लेला माणूससारखं स्पर्धेतलं नाटक करायला घेण्यामागचा उद्देशही हाच होता. शुभांगी गोखलेसोबतचं हे नाटक चंद्रकांत कुलकर्णीने दिग्दर्शित केलं आणि त्याचे भरपूर प्रयोगही झाले. नव्या पिढीला घडवण्याचं त्याचं हे काम तू म्हणशील तसं या नाटकाच्या निमित्ताने आपण पाहू शकतोच. संकर्षण कऱहाडे, भक्ती देसाई हे तरुण कलाकार यातून घडले.
कोरोना संसर्गाच्या काळात अवघी नाटय़सृष्टी ठप्प होती. कलाकारांपासून तंत्रज्ञ, रंगमंच कलाकार सर्वांसाठी ती अवघड परिस्थिती होती. मात्र या काळात रंगमंच कलाकारांना मदतीचा हात देत प्रशांतने स्वत:चा आदर्श घालून दिला. रंगमंच कलाकारांसाठी मोठे आर्थिक साहाय्य त्याने उभे केले. रंगमंच कलाकार ही एक मोठी फळी आहे जिच्यावर नाटय़सृष्टी उभी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी हा व्यवसाय पूर्वपदावर आणणं गरजेचं होतं. लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात नाटक सुरू व्हावं यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात प्रशांत आग्रही होता. अशा प्रकारे कलाकारांकडे बघण्याची दृष्टी बदलण्यातही प्रशांतचे काम महत्त्वाचे आहे.
नाटकांची परदेशवारी हा एक वेगळा अनुभव आहे. सुधीर भटांच्या सुयोगची नाटकं घेऊन आम्ही परदेशात जात होतो. याबरोबरच प्रशांतचा चाहतावर्ग जगभर आहे आणि म्हणूनच त्याच्या नाटकांचे परदेशात प्रयोग झाले आहेत, होत असतात. अभिनेता व निर्माता म्हणून अशा दौऱ्यामधील आव्हानं, आर्थिक गणित, नियोजन जुळवून आणण्याचं कसबही त्याच्याकडे आहे. म्हणूनच प्रशांत दामले स्वत: च एक इंडस्ट्री आहे, पॅकेज आहे असं म्हणावयाला हरकत नाही.
प्रशांतबरोबर काम केलेल्या सर्व सहकलाकारांना त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी भावल्या असतील. मी त्याच्याबरोबर काम केलेल्या प्रत्येक नाटकातला त्याचा प्रियतमा मधला रोमँटिक हीरो, शू कुठे बोलायचं नाहीमधला सात्विक स्वभावाचा नवरा या भूमिका कायम आवडल्या; परंतु आम्ही दोघं राजाराणीमधला मूल होत नसलेला बाप ही त्याची भूमिका जी त्याने लेकुरे उदंड झालीपेक्षाही वेगळी केली होती ती माझी अत्यंत महत्त्वाची आणि आवडती भूमिका आहे.
प्रशांत विक्रमादित्य आहे आणि कायम राहणार. एकाच दिवसात तीन वेगळ्या नाटकांचे पाच प्रयोग करणे, नाटकाचा पन्नासावा प्रयोग असो वा पाचशेवा तो उत्साहाने साजरा करणे आणि हा आनंद स्वत:बरोबर इतरांना देणे ही प्रशांतची खासियत आहे. हा आनंद वाटण्यात तो अतिशय उत्साही असतो. त्याचा हा उत्साह 12500व्या प्रयोगानंतरही पुढच्या विक्रमासाठी सज्ज राहणार आहे. आपलं निखळ हसू दर्शवत उत्साहाचा हा झरा नाटय़रसिकांसाठी सदोदित तत्पर असेल यात शंका नाही.

























































