लेख – न्यूटनचा तिसरा नियम

>> विजय पांढरीपांडे

प्रत्येक क्रियेच्या बरोबरीने तितक्याच सामर्थ्याची प्रतिक्रिया असते, पण ती विरोधी असते. हा न्यूटनचा तिसरा नियम आपण सगळेच आपापल्या आयुष्यात अनुभवतो. प्रत्येक ‘अरे’ला त्याच आवाजात ‘कारे’ने उत्तर दिले जाते. आपण पूर्व म्हटले की, समोरची व्यक्ती त्याच जोशात पश्चिम म्हणते. घरातील भांडणे, मैत्रीतील वाद, नवरा-बायकोतील विसंवाद, कामाच्या जागी होणारे मतभेद याचा नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की न्यूटनचा तिसरा नियम प्रत्येक ठिकाणी लागू होतो.

तुम्ही सायन्सचे विद्यार्थी नसला तरी न्यूटनचा तिसरा नियम तुम्हाला कदाचित माहिती असेल. तसे विज्ञानाचे नियम समजायला, पचवायला जड असतात. कारण त्यामागचा गणिती आधार किचकट असतो अन् बहुतेकांचे गणिताशी जमत नाही, पण हा न्यूटनचा तिसरा नियम समजायला सोपा आहे. कारण प्रत्यक्ष आयुष्यात या नियमाचा प्रत्येकाला पावलोपावली प्रत्यय येत असतो.

आधी हा नियम काय ते बघू…

For every action (force), there is equal and opposite reaction (force).

असा हा साधा नियम आहे. म्हणजे प्रत्येक क्रियेच्या बरोबरीने तितक्याच सामर्थ्याची प्रतिक्रिया असते, पण ती विरोधी असते.

हे विधान पुनः पुन्हा वाचले तर तुमच्या लक्षात येईल, आपण सगळेच हे आपापल्या आयुष्यात अनुभवतो. प्रत्येक ‘अरे’ला त्याच आवाजात ‘कारे’ने उत्तर दिले जाते. आपण पूर्व म्हटले की, समोरची व्यक्ती त्याच जोशात पश्चिम म्हणते. आपण हिरिरीने एक मत मांडण्याचा प्रयत्न करतो, तर समोरची व्यक्ती त्याला तितक्याच जोरात विरोधी मत व्यक्त करीत आपले मत खोदून काढण्याचा प्रयत्न करीत असते. न्यूटनच्या नियमात दोन भिन्न वस्तू असतात. अन् क्रिया-प्रतिक्रिया मूळ वस्तूवर नव्हे, तर समोरच्या वस्तूवर बळाचा परिणाम करीत असतात. आयुष्यात आपली क्रिया अन् दुसऱ्याची प्रतिक्रिया ही एक दुसऱ्यासाठी असते, स्वतःसाठी नसते.

घरातील भांडणे, मैत्रीतील वाद, नवरा-बायकोतील विसंवाद, कामाच्या जागी होणारे मतभेद याचा नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, न्यूटनचा तिसरा नियम इथे प्रत्येक ठिकाणी तंतोतंत लागू होतो. शब्दशः खरा ठरतो.

या वादात कुणाचीही माघार घ्यायची तयारी नसते. ‘मेरे मुर्गी की एकही टांग’ असाच दोन्ही पक्षी एकाच आवाजात आग्रह असतो. कारण आपल्याला अन् न्यूटनलादेखील स्वतःचा तिसरा नियम खोटा ठरवायचा नसतो.

खरे पाहिले तर सायन्सचे नियम म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते का? तर तसेही नाही. अनेक नियम काळाच्या ओघात चुकीचे ठरवले जातात किंवा आहे त्याच नियमात सुधारणा केली जाते. आपण आधी ज्या गोष्टी गृहीत धरल्या, त्या चुकीच्या होत्या याची जाणीव पुण्या अधिक शहाण्या माणसाला होते. मग ती व्यक्ती नियम सुधारते किंवा नवाच नियम तयार होतो. व्यवहारातदेखील पुणाला तरी आपली चूक उमजते. कुणीतरी अहंभाव सोडून समंजसपणा दाखवतो. वाद विकोपाला जात नाहीत. नियम जागच्या जागीच असतात, पण त्याचे अर्थ बदलत जातात. नवे नियम तयार होतात. म्हणूनच समाज प्रगत होतो. कुटुंब व्यवस्था समंजसपणाच्या पायावर भरभक्कम टिकून राहते.

सायन्समधला असा एकच न्यूटनचा नियम संसारात लागू होतो असे नाही. आमच्या इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगचादेखील एक नियम आयुष्यात पूर्णपणे लागू होतो. कम्युनिकेशनसाठी गरजेचे असते ते एका ठिकाणची माहिती (ज्याला सिग्नल असे म्हणतात) दुसऱया ठिकाणी जशीच्या तशी पोहोचणे. याला

मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर अशी संज्ञा आहे. या प्रक्रियेसाठी अनेक सर्किट्स एकमेकांना जोडावे लागतात. या प्रत्येक सर्किटला आपल्याकडे आलेले सिग्नल जसेच्या तसे पुढे पाठवावे लागतात. त्याकरिता (इम्पिडन्स) मॅचिंग गरजेचे असते. या अवस्थेला रेझोनांस म्हणतात किंवा फ्रिक्वेन्सी टय़ुनिंग असेही संबोधतात. आता प्रत्यक्ष आयुष्यातदेखील आपण दोघांचे छान जुळते यासाठी टय़ुनिंग जमते असेच शब्द वापरतो. अगदी लग्न जुळतानादेखील परफेक्ट मॅचिंग असे आपण म्हणतो. ते शब्द इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमधून आलेले आहेत. विशेष गंमत म्हणजे त्यामागची संकल्पना दोन्हीकडेसारखी आहे. परफेक्ट मॅचिंग, फ्रिक्वेन्सी टय़ुनिंग, रेझोनांसचे अर्थ सायन्समध्ये अन् व्यवहारात सारखेच आहेत. पूर्वी आपल्याकडे रेडिओ असायचा. त्यावर आपल्याला हवे ते स्टेशन गाणी ऐकायला लावायचे, शोधायचे तर आपण समोरचे बटन फिरवतो अन् स्टेशन लागले म्हणजेच फ्रिक्वेन्सी टय़ुनिंग झाले की थांबतो. ते बरं थोडेही इकडे-तिकडे झाले की, गाणे नीट ऐकू येत नाही. घरघर ऐकू येते. त्याला इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगमध्ये नोइझ म्हणजे घरघर किंवा गोंधळ म्हणतात. आहे की नाही गंमत? आपले व्यवहार, आपले वागणे, संवाद सगळे तत्त्वज्ञानाशी सुसंगत असते.
जाता जाता आणखी एक गंमत. शाळेत आपण भूमितीच्या प्रारंभीच बिंदूची व्याख्या शिकतो. ती अशी, ‘ज्याला अस्तित्व असते, पण लांबी, रुंदी, जाडी नाही असे समजतात, त्याला बिंदू असे म्हणतात.’

ही व्याख्या चक्क ईश्वराच्या अस्तित्वासारखीच आहे. शून्यापासून ब्रह्मांड निर्माण झाले असे आपण म्हणतो. तसेच बिंदूपासून सरळ रेषा, वक्ररेषा, वर्तुळ अशी संपूर्ण भूमिती गणिताची निर्मिती झाली.
सायन्स, गणित, तंत्रज्ञान, अध्यात्म, तत्त्वज्ञान हे सगळे खूप काही कठीण नसते. चांगला गुरू मिळाला की, सगळे सोपे होत जाते.अनेकदा स्वतःच स्वतःचे गुरू व्हावे लागते. गुरू-शिष्य असा डबल रोल करणे हे आयुष्याच्या रंगमंचासाठी गरजेचे असते.