
>> विक्रम मराठे
प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या कलाकृती, लेख आणि आठवणींवर आधारित ‘बरवे संचित’ या ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले. चिन्ह प्रकाशनाद्वारे संपादित या वैशिष्टय़पूर्ण ग्रंथात प्रभाकर बरवे यांच्या कलाविश्वाचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने चित्रकार प्रभाकर बरवे यांच्याविषयी…
चित्रकार प्रभाकर बरवे (1936- 1995) यांचे स्थान भारतीय चित्रकलेमध्ये खूप महत्त्वाचे आहे. बरवे यांच्या निधनानंतर ज्येष्ठ चित्रकार हुसेन म्हणाले होते की, आजवर भारतात दोनच महान चित्रकार होऊन गेले, एक गायतोंडे आणि दुसरे प्रभाकर बरवे. अवघ्या 59 वर्षांच्या आयुष्यात आपल्या चित्रातील आकार आणि अवकाशाचे विविध प्रयोग करून त्यांनी तत्कालीन अमूर्त कलेमध्ये एक वेगळी वाट निर्माण केली. याबरोबरच दृश्यकलेविषयी आपले विचार त्यांनी ‘कोरा कॅनव्हास’ (1990) या पुस्तकाद्वारे मराठीतून मांडले. बरवे आपल्या रोजनिशीमध्ये त्यांना सुचलेले कलाविषयक विचार, रेखाटने लिहीत असत आणि त्याचेच रूपांतर त्यांनी अत्यंत सजगतेने या पुस्तकामध्ये केले होते. यासाठीच ‘कोरा कॅनव्हास’चे स्थान मराठीतील कलाविषयक साहित्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे.
या डायऱयांवर आधारित ‘चित्र-वस्तुविचार’ हे पुस्तकही 2019 मध्ये त्यांच्या निधनानंतर 24 वर्षांनी प्रसिद्ध झाले आहे. त्यामधून बर्व्यांचे वैचारिक आणि त्याचबरोबर तरल काव्यात्मक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. बरवे कवीसुद्धा होते. त्यांचं निसर्गाचे प्रेम, जीवनाविषयीची कृतज्ञता, आकार, अवकाश, रंग आणि त्यांच्या खेळातून निर्माण होणाऱया विविध रचना यांचा प्रत्यय त्यांच्या कवितांमधून आणि चित्रांमधून येतो.
बरवे यांच्यावर कॉलेज जीवनात चित्रकार पॉल क्ले यांच्या विचारांचा प्रभाव होता, जो तेव्हाच्या बहुसंख्य कलाकारांवर होता. वीव्हर सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरीनिमित्ताने ते बनारस येथे गेले. तेथील तांत्रिक कला त्यांच्या तत्कालीन चित्रात दिसते. पुढच्या टप्प्यात इनॅमल माध्यमातून त्यांची स्वतंत्र अशी चित्रशैली विकासित झाली. भारतीय लघुचित्र शैलीप्रमाणे द्विमितीय अवकाशाचे प्रयोग त्यांनी आपल्या चित्रात केलेले आढळतात. असे असले तरी आपले चित्र कुठल्याही चित्रकाराच्या, शैलीच्या प्रभावापासून मुक्त आणि स्वतंत्र असावे याबाबत त्यांचा कटाक्ष असे. विविध विषयांतले सखोल वाचन, चित्रभाषेवर चिंतन आणि त्याचा चित्रनिर्मितीमध्ये सजगतेने वापर हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे अंग होते.
मी कला महाविद्यालयात शिक्षण घेत असताना 1992 मध्ये ‘कोरा कॅनव्हास’ माझ्या वाचनात आले आणि मी त्यातील विचारांनी भारावून गेलो आणि या विचारवंत चित्रकाराशी पत्राद्वारे संवाद साधू लागलो. अनघड विद्यार्थी दशेतल्या माझ्या अनेक शंका आणि प्रश्नांचे निरूपण त्यांच्या पत्रोत्तरांतून मला मिळाले. माझ्यासाठी तो एक आयुष्यभर पुरेल असा ठेवाच आहे. पुढे दोन-तीन वेळा त्यांच्या घरी जाऊन कलाविषयक गप्पा, चर्चा करण्याची संधी पण मला मिळाली. बरवे यांना सर्वांशी अशा चर्चा करायला आवडायचे असे मला नंतर कळले. ‘बरवे संचित’मध्ये त्यांचे मित्र, विद्यार्थी, सहकारी, कुटुंबीय यांच्या लिखाणातून याचा प्रत्यय येतो.
बरवे यांचे विचारधन सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने मी आमच्या पत्रसंवादावर आधारित कार्यक्रम करू लागलो. मी पुण्यातील झपुर्झा संग्रहालयात काम करीत असताना बरवे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने 2022 मध्ये ‘बरवे संचित’ या नावाने त्याचा पहिला कार्यक्रम केला होता. दोन वर्षांपूर्वी ‘चिन्ह’चे सतीश नाईक यांनी “बरवे यांच्यावर पुस्तक करत आहे. त्यासाठी लेख पाहिजे’’ असं सांगितलं. त्यामुळे या कार्यक्रमाची संहिता मी लेखासाठी रूपांतरित केली आहे. माझ्या ‘बरवे संचित’ या लेखाचे नाव पुस्तकासाठी निवडले जावे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
(लेखक कला समीक्षक आहेत.)
[email protected]




























































