प्रासंगिक – दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा

>> विलास पंढरी

पवित्र चातुर्मासात येणारा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला, आनंद आणि सौहार्द वाटणारा सण म्हणजे दसरा. याला विजयादशमी किंवा दसरा म्हणण्यामागेही आख्यायिका आहेत.

’दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या काव्यातच या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा, असत्यावर सत्याचा विजयाचा सण आहे. या सणात सगळय़ा जातीचे लोक एकत्र आलेले दिसतात. या दिवशी शस्त्रपूजनही केले जाते.

दसरा किंवा विजयादशमी या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुर या राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासूनच देवीला महिषासुरमर्दिनी हे नाव पडले. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले व विजयी झाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराट राजाच्या घरी गेले त्या वेळी त्यांनी आपली शस्त्रs शमीच्या झाडावर ठेवली होती, तीही याच दिवशी व अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रs परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्त्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱया राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस असे समजले जात असे.

फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ’कौत्स’ नावाचा एक शिष्य होता.त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, ‘‘मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तुम्ही मागाल ते मी देईन.’’ ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे 14 विद्यांबद्दल 14 कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.

कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला; परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपटय़ाच्या पानांची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाडय़ात पाडली.

कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी 14 कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपटय़ाच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या. लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढय़ा मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱयाचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली.

दसऱयाच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपटय़ाची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तीना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती आजही आपटय़ाची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक आहे.

आपटय़ाच्या झाडाची महती पुढील श्लोकात वर्णिली आहे.

अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम्।।

याचा अर्थ असा की, हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे विकल्पाने तांब्याचे नाणे ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. प्रचंड मंदीतून अर्थव्यवस्था बाहेर पडत असतानाचा यंदाचा दसरा आहे.हिंदुस्थानी अर्थव्यवस्था चीन व अमेरिकेला मागे टाकून जगात सर्वात जास्त वेगाने, 8.5 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे असे आयएमएफ म्हटले आहे. ऐन दसऱयाच्या पार्श्वभूमीवर हे शुभवर्तमान आले असून दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असल्याने ग्राहक मोठय़ा प्रमाणावर वाहन आणि घरखरेदी करतील असे वाटते. कोरोना संक्रमितांची देशभरातील घटणारी संख्या बघता ‘दसरा सण मोठा नाही, आनंदा तोटा’ या उक्तीनुसार यंदाचा दसरा खरंच आनंद देणारा ठरो अशा देशवासीयांना शुभेच्छा!