
>> विलास पंढरी
अस्सल भारतीय परंपरेतून उदयाला आलेल्या योगशास्त्राने आता अधिकृतपणे जागतिक पातळीवर मान्यता मिळवून 10 वर्षे पूर्ण झाली असून कोटय़वधी लोक त्याला जोडले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार केवळ रोगमुक्ती किंवा शारीरिक दुर्बलतेचा अभाव नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था म्हणजे आरोग्य. अशी अवस्था फार कमी लोकांच्या वाटणीला येत असावी. ही अवस्था मिळविण्याचे सर्वात सोपे, सहजसाध्य आणि मोफत असलेले साधन म्हणजे योग. आरोग्याचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाहीच. आरोग्याचे महत्त्व, उपयोग, व्यापकता आणि परिणामकारकता योगदिनाच्या निमित्ताने भारत सरकारकडून दरवर्षी जाहीर केल्या जात असलेल्या अर्थपूर्ण थिम्सद्वारे चपखलपणे लक्षात येतात.
‘जागतिक योगादिनाची’ 2015 ची थीम होती ‘सुसंवाद आणि शांतीसाठी योग’, 2016ची थीम होती ‘शाश्वत विकास उद्दिष्टांच्या साध्यतेसाठी योग’, तर 2017 ची थीम होती ‘आरोग्यासाठी योग’, 2018 ची थीम होती ‘शांतीसाठी योग’, 2019 ची थीम होती ‘हृदयासाठी योग’. कोरोनाचा कहर चालू असताना घराबाहेर पडणे दुरापास्त बनल्याने 2020 ची थीम देण्यात आली होती, ‘घरी योग आणि कुटुंबासाठी योग’, 2021 ची थीम होती ‘योगा फॉर वेलनेस’ म्हणजेच ‘आरोग्य कल्याणासाठी योग’, तर 2022 ची थीम होती ‘मानवतेसाठी योग’, 2023 ची थीम ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही होती. 2024च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ होती आणि यंदाच्या योग दिवसाची थीम आहे ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी’.
योगशास्त्राचे अध्वर्यू महर्षी पतंजलींना वंदन करणारा एक संस्कृत श्लोक आहे, ज्यात योगाची व्याप्ती दिसून येते.
योगेन चित्तस्य पदेन वाचां,
मलं शरीरस्य च वैद्यकेन।
यो।़पाकरोत्त तं प्रवरं मुनीनां,
पतंजलिं प्रांजलिरानतो।़स्मि।।
याचा मराठीत अर्थ योग साधनेने मनातील (चित्त) अशुद्धी दूर करता येते. ‘पद’ म्हणजे व्याकरण, ज्याने वाणी शुद्ध होते आणि ‘वैद्यक’ म्हणजे आयुर्वेदामुळे शरीराची शुद्धी होते. या स्तुतीपर श्लोकाचा मथितार्थ असा आहे की, योग, व्याकरण आणि आयुर्वेद या तीनही शास्त्रांच्या माध्यमातून मानवी जीवनातील अशुद्धी दूर करण्याचा मार्ग दाखवणाऱया पतंजलींना मी वंदन करतो. दरवर्षी साजरा होणाऱया आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आरोग्यदायी जीवन जगण्याच्या दिशेने मोठे महत्त्व आहे. योग हे प्राचीन भारतीय कलेचे प्रतीक मानले जाते. भारतीय सकारात्मकता आणि उत्साही आयुष्य टिकवण्यासाठी योगास महत्त्वपूर्ण मानतात. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. सखोल विचार केल्यास योग ही अशी निरंतर प्रक्रिया आहे, जी कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही पातळींवर स्थैर्य प्रदान करून माणसाला निरोगी ठेवीत सर्वार्थाने समृद्ध करते. सुश्रुत संहितेत ‘अनागताबाधा प्रतिषेध’ नावाचा एक अध्याय आहे. अनागता बाधा म्हणजे अद्याप जी आलेली नाहीत अशी दुखणी किंवा आजार. या अध्यायात दिनचर्येचे सविस्तर वर्णन करून या ‘अद्याप न आलेल्या’ आजारांना दूर ठेवण्याचा मार्ग दाखवला आहे. ‘हेयं दुःखम् अनागतम्।’ असे सांगत असतानाच आचार्य पतंजली योगाची आरोग्यविषयक व्याप्ती दाखवतात. निरोगी राहण्यासाठी योग हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अंग असायला हवे असे सांगताना जितक्या सहजतेने आपण श्वास घेतो तितका सहज योग आपल्यात भिनलेला हवा असे ते म्हणतात.
आयुर्वेदाप्रमाणेच योगाचीदेखील आठ अंगे आहेत. प्रत्यक्षात ही आठ केवळ अंगे नसून मोक्षप्राप्तीच्या दिशेने जाणाऱया आठ पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे चार बहिरंग आपल्या शरीराकडे अधिक लक्ष देतात, तर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग मन आणि आत्मा यांच्या पातळीवर कार्य करून साधकाला मोक्षाप्रत पोहोचवतात. आसने आणि प्राणायाम यांच्यापुरतेच योगाला मर्यादित ठेवणे हे अयोग्य आहे. भारतीय तत्त्वज्ञानात षडदर्शनाचे महत्त्व वादातीत आहे. योगाला स्वतंत्र दर्शन म्हणून दिलेली मान्यता मानवी जीवन सर्वार्थाने उच्च प्रतीचे बनवण्यासाठी योगाच्या योगदानाची असलेली साक्षच आहे. एखाद्या हिऱयाला पैलू पाडल्यावरच त्याचे खरे मोल समोर येते. तसे योगशास्त्र मानवी जीवनाला पैलू पाडून लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही पातळीवर त्याला अनमोल बनवते. प्रत्येकाने योगाशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे.