विज्ञान रंजन – जय विज्ञान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

आपले ‘चांद्रयान-3’ चांद्रकक्षेत दाखल झाले आहे. उद्याच 15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत असताना येत्या 23 तारखेला चांद्रयान ठरल्याप्रमाणे चंद्रावर उतरेल आणि आपल्या वैज्ञानिक प्रगतीमधला तो महत्त्वाचा टप्पा ठरेल. लालबहादूर शास्त्र्ााr प्रधानमंत्री असताना त्यांनी ‘जय किसान’ ही घोषणा दिली होती. वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांनी ‘जय विज्ञान’ म्हणत आणखी आधुनिकतेचा पुरस्कार केला. कारण अनेक वैज्ञानिक प्रकल्पांचा आरंभ नेहरूंच्या काळातच झाला होता. देशाच्या स्पेस कार्यक्रमाला गती आली ती 1963 मध्ये. विख्यात शास्त्र्ाज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांनी अनेक वैज्ञानिक संस्थांच्या उभारणीत सहभाग घेतला. सध्या अहमदाबादमध्ये असलेली फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) अगदी प्राथमिक स्वरूपात साराभाईंच्या बंगल्यातच सुरू झाली होती.

सुरुवातीच्या काळात सर्वंकष प्रगतीच्या ध्येयाने भारावलेले डॉ. भाभा, डॉ. साराभाई, एपीजे अब्दुल कलाम आणि अनेक संशोधक अहोरात्र काम करून देशाला जागतिक विज्ञानाच्या शर्यतीत पुढे आणू पाहत होते. रशिया, अमेरिकेसारख्या बलाढय़ आर्थिक सत्ता आणि चीनच्या हडेलहप्पी राजवटीसारखा प्रकार इथे नव्हता. आपल्या नाजूक अर्थव्यवस्थेला अनुसरूनच चिकाटीने प्रयोग केले जात होते. म्हणून आज आपण अनेक देशांचे शंभराहून जास्त कृत्रिम उपग्रह आपल्या यशस्वी अग्निबाण तंत्राने अवकाशात सोडू शकतो, परंतु 1960 च्या दशकात तशी परिस्थिती नव्हती.

1957 मध्ये रशियाने (त्यावेळचा यूएसएसआर) ‘स्पुटनिक’ अवकाशात यशस्वीरीत्या पाठवून ‘स्पेस क्रांती’ची ऊर्ध्व दिशा जगाला दाखवून दिली. मग रशिया-अमेरिकेत स्पेस प्रोग्रॅम ‘वॉर’ही सुरू झाले. परस्परांपेक्षा अधिक काही करून दाखवण्याच्या स्पर्धेतून 1969 मध्ये माणूस चंद्रावर उतरला. आपण त्याकडे अचंबित होऊन पाहत होतो. मात्र आपल्या संशोधकांना या जागतिक अवकाश प्रगतीचा अंदाज आला होता. कारण त्यांच्यापैकी अनेकांनी विदेशात शिक्षण घेऊन त्या ज्ञानाचा देशासाठी उपयोग करण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू केले होते. मर्यादित साधनसामग्री आणि पैसा अशा विषम परिस्थितीतले ते क्षण उत्साहाचे, उमेदीचे मात्र होते.

21 नोव्हेंबर 1963 रोजी साराभाईंच्या नेतृत्वाखाली डॉ. मूर्ती, डॉ. चिटणीस तसेच नवतरुण डॉ. एपीजे अब्दुल कलाम या संशोधकांनी देशाचा पहिला अग्निबाण (रॉकेट) केरळमधल्या थुंबा येथून यशस्वीरीत्या अवकाशात उडवला. या अगदी छोटय़ाशा अग्निबाणाचे भाग बैलगाडी आणि सायकलवरून वाहून नेण्यात आल्याची छायाचित्रे प्रसिद्ध आहेत. परवा 12 ऑगस्टला देशाच्या ‘स्पेस’ कार्यक्रमाचे प्रणेते विक्रम साराभाई यांची जयंती झाली. अवघ्या बावन्न वर्षांच्या जीवनात त्यांनी आपल्या अणुऊर्जा केंद्र आणि अंतराळ संशोधन विकासासाठी कल्पकतेने प्रयोग केले. त्याची फळे आज आपल्याला मिळत आहेत.

डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म 1919 मधला. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी असलेल्या उद्योजक घराण्यांपैकी त्यांचं कुटुंब. सधन कुटुंबातील या तरुणाने विज्ञानाचा ध्यास घेऊन देशात विविध संस्थांच्या स्थापनेत पुढाकार घेतला. ज्या पीआरएल संस्थेचा उल्लेख केला ती तर स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी म्हणजे 1947 मध्ये लहान प्रमाणात सुरू झाली. साराभाईंना भौतिकशास्त्र्ाापासून संख्याशास्त्र्ाापर्यंत (स्टॅटिस्टिक्स) अनेक विषयांत गती होती. त्यातूनच ‘ऑपरेशनल रिसर्च ग्रुप’ आकाराला येऊन अनेक संस्था उदयाला आल्या. त्यांचं कुटुंब वैज्ञानिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर होतं. विक्रम साराभाई यांच्या पत्नी मृणालिनी आणि कन्या मल्लिका साराभाई या विश्वविख्यात कथ्थक नृत्यविशारद.
अशा संपन्न परंपरेतले साराभाई 1966 मध्ये डॉ. होमी भाभा यांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर देशाच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. त्याच काळात सध्या जगात नावाजलेल्या ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ म्हणजेच ‘इस्रो’ची स्थापना झाली. साराभाईंनी या संस्थेची जबाबदारीही स्वीकारली. अखेरपर्यंत ते त्या पदावर होते.

सायकल, बैलगाडीचा वापर करून साऊण्डिंग रॉकेट नेण्याकडून सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (एसएलव्ही) प्रक्षेपित करण्यापर्यंतचा विचार सुरू झाला होता. त्याचसंदर्भात 30 डिसेंबर 1971 रोजी डॉ. साराभाई डॉ. कलाम यांच्याशी फोनवरून बोलले होते, पण ‘एसएलव्ही’ पाहण्यासाठी साराभाई राहिले नाहीत. त्यांचे अकाली निधन झाले. डॉ. भाभा यांच्यानंतर पाच वर्षांतच देशाने एक महत्त्वाकांक्षी संशोधक गमावला. पुढे थुंबा येथील अवकाश संशोधन केंद्राला विक्रम साराभाई यांचं नाव देण्यात आलं. निधनापूर्वी त्यांनी ‘नासा’च्या थॉमस पेइन यांच्याशी करार करून हिंदुस्थानातल्या पाच हजार खेडय़ांपर्यंत उपग्रहाद्वारे शैक्षणिक कार्यक्रम नेण्याचं क्रांतिकारी पाऊल उचललं होतं.

अशा या द्रष्टय़ा संशोधकाचा सन्मान पद्मभूषण आणि मरणोत्तर पद्मविभूषण देऊन करण्यात आलाच, पण 23 तारखेला चंद्रावर उतरणाऱया देशाच्या पहिल्या चंद्रावतरण यानाचं नावही ‘विक्रम’ असं ठेवण्यात आलं आहे. हा विक्रम आपण साध्य करून ‘जय विज्ञान’ ही उक्ती सार्थ करू असा विश्वास वाटतो.