विज्ञान रंजन – राख कुठे नि ताप कुठे!

>> विनायक

आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचं तर ‘गेल्या दहा हजार वर्षांत घडली नव्हती’ अशी घटना परवा म्हणजे 23 नोव्हेंबरच्या सुमारास घडली. इथिओपिया नावाच्या पूर्व आफ्रिका खंडातला ‘हेली गब्बी’ नावाचा ज्वालामुखी दहा सहस्र वर्षांनी आग ओकू लागला. ती एवढी भीषण आहे की, त्या ज्वालामुखातून आगीच्या लोळांसह बाहेर पडणारा धूर भयंकर स्वरूप धारण करत पूर्वेकडच्या देशांकडे पसरत चालला. हिंदुस्थान, चीन, कोरिया अशी त्या राखयुक्त धुराची एक नदीच आकाशात तयार झाली. म्हणजे वाऱ्याच्या पूर्वेकडील प्रचंड वेगाने हा राखेचा आकाशी पट्टा तयार केला. अलीकडच्या काळात रात्री आकाशगंगेचा धूसर पट्टा दिसेल की नाही ते सांगता यायचं नाही, पण प्रदूषणाचे पट्टे दिवसरात्र खूप आढळतील. त्यातले काही निसर्गनिर्मित तर काही मानवनिर्मित. नैसर्गिक परिणाम ही ठरवून केलेली कृती नसते, तर ती आपोआप घडलेली निर्हेतुक गोष्ट असते. माणसाने निर्माण केलेले प्रदूषण विविध हव्यासांपायी निर्माण झालेलं असतं हा फरक नेहमीच लक्षात ठेवायला हवा.

या वर्षी आपल्या देशातला पाऊस जवळपास पाच महिने रेंगाळला. भातासारखी तरारलेली पिकं पार आडवी होईपर्यंत अवकाळी पाऊस पडला. ठिकठिकाणी ‘ढगफुटी’ झाली. त्याने कमी वेळात अपरिमित पाणी बरसले आणि अनेक ठिकाणची शेती खरडल्यासारखी नष्ट झाली. या आपत्तीत जेवढा भाग निसर्गाचा तेवढाच माणसाने निर्माण केलेल्या ग्लोबल वार्ंमगचासुद्धा. निसर्गाच्या महाउत्पातांना थोपवण्यात माणसाचे प्रयत्न तोकडे पडतात ते समजू शकतं, पण मानवनिर्मित प्रदूषणाचं, वननिर्दालनाचं काय? अर्थात काही जणांना क्लायमेट चेंज किंवा वातावरणीय बदलच मान्य नाही. कारण तो त्यांना समजत नाही की स्वीकारायचाच नाही? असे कूट प्रश्न आहेतच. परिणाम मात्र एकच. बिघडत चाललेलं वातावरण.

आपल्या देशाची राजधानी असलेली दिल्ली प्रदूषणाचीसुद्धा ‘राजधानी’ झाली आहे. बरं, ‘दिल्ली तो बहोत दूर है’ म्हणत आपण स्वस्थ बसावं असंही नाही. मुंबईतलं प्रदूषण किंवा आपल्या राज्यातल्या महानगरांमधले प्रदूषणही सातत्याने नवनवे उच्चांक नोंदवतंय. त्यात आणखी भर नैसर्गिक आपत्तीची. नको तेवढा पाऊस किंवा सुका दुष्काळ, कुठे सुनामी तर कुठे भूकंप आणि त्यात भरीस भर म्हणून ज्वालामुखीचे अग्नितांडव. त्याचा ‘आ’ जेवढा वासलेला तेवढी त्यातून बाहेर पडणारी राख आणि धूर अधिक.

तेव्हा कधी नव्हे ती इथिओपियातल्या हेली गब्बी ज्वालामुखीला अचानक जाग आली आणि तो काल्पनिक ‘ड्रगन’सारखा भयानक आग ओकू लागला. प्रचंड वेगाने उसळणाऱ्या त्या अग्निकांडातून हजारो टन दगडगोटे तप्त लाव्हारसाबरोबर फेकले जाऊ लागले. त्याच वेळी राख आणि धुराचे लोटच्या लोट (प्लूम) वातावरणात दिवसा ‘रात्र’ करू लागले. 1110 मध्ये तर हेल्का ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या राखपटलाने 5 मेच्या रात्री पौर्णिमेचा चंद्रच काही तास ‘अदृश्य’ केला होता. हा चमत्कार घडवला होता.

आताचा जागतिक आकाशी राखरांगोळी रेखाटून लाखो लोकांच्या श्वासाचा घास घेणारा ज्वालामुखी मात्र इथिओपियामधला. या हेली गब्बी ज्वालामुखीने 23 नोव्हेंबरला अशी काही आकस्मिक उसळी घेतली की, त्यातील धूर आणि राख 45 हजार फूट उंच उडत राहिली. परिणामी येमेन, ओमान, हिंदुस्थान आणि हिमालयापलीकडचे चीन-कोरिया या देशांचे आभाळ या विचित्र राखेने काजळले. सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाली. हवेची आधीच ढासळलेली ‘गुणवत्ता’ अधिकच (!) ढासळली. या ज्वालामुखीच्या उसळण्याचं (इरप्शनचं) चित्रण नेटवर पाहायला मिळतं.

गेली 12 हजार वर्षे सुप्तावस्थेत (डॉर्मन्सीमधे) असलेला हा ज्वालामुखी अचानक आग ओकू लागेल याची तो जिथे आहे त्या इथिओपियातल्या अफारवासीयांनाही कल्पना नव्हती. तिथल्या लोकांना ‘डोंगराला आग लागली पळा पळा पळा’चा भयावह अनुभव आला. अर्थात डोंगराला बाहेरून लागलेला ‘वणवा’ नव्हता, तर डोंगराच्या आतूनच आग-राख-धुराचे लोट वेगाने उत्सर्जित होत होते. ते लाल समुद्र ओलांडून थेट आपल्यापर्यंत पोचले.

ज्वालामुखी असे अचानक आग ओकायला लागले की, वस्तीवर संकटच येतं. भूकंप, सुनामीचा जसा तंतोतंत अंदाज करणं अजून विज्ञानाला साध्य झालेलं नाही तसेच या अवकाळी ज्वालामुखीचे. विश्वाचा धांडोळा घ्यायला सज्ज झालेले आपण, आपली पृथ्वीही नीट समजू शकलेलो नाही याची वारंवार प्रचीती येत असते.

देशात गुलाबी थंडीची चाहूल लागते न लागते तोच इथिओपियन ज्वालामुखीने लाल डोळे वटारले आणि जगाला वेठीस धरले. हवेतली उष्णता एकाएकी वाढली, सर्दी, खोकला, घसा बसणे आणि डोळे चुरचुरणे असे आजार बळावले. साधारण 1970 च्या दशकापर्यंत जग बऱ्यापैकी सुखाचा ‘श्वास’ घेत होतं. नंतर वननिर्दालन आणि रासायनिक प्रदूषणाने जोर धरला. त्याचे ‘स्लो पॉयझनिंग’सारखे परिणाम लक्षात आले, पण लक्षात घेतले गेले नाहीत. त्याची कारणं अनेक, पण त्रास साऱ्या जीवसृष्टीला. तशातच कोणा ज्वालामुखीचं ‘डोकं’ फिरलं की, तो आपला ‘ताप’ अधिकच वाढवणार!